● स्वच्छता व नेटकेपणासाठी महापालिका आयुक्तांनी घेतला निर्णय !
सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या विविध कार्यालय व इमारतींमध्ये पान तंबाखू गुटखा खाऊन थुंकण्यासह अस्वच्छतेचे विदारक चित्र दिसून येते. Indrabhuvan will give power to clean five municipal buildings including council hall! Deciding on cleanliness यामुळे महापालिकेच्या इमारती स्वच्छ व नेटक्या राहण्यासाठी अखेर इंद्रभुवन, कौन्सिल हॉल , महापालिका प्रशासकीय इमारतसह 5 इमारतींच्या साफसफाईच्या कामाचा मक्ता देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी घेतला आहे. यामुळे महापालिकेच्या या इमारती स्वच्छ आणि सुंदर दिसतील.
स्वच्छ सोलापूर – सुंदर सोलापूर हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या सोलापूर महापालिकेच्या प्रशासकीय इमारत व इतर कार्यालयांमध्ये अस्वच्छतेचे दर्शन घडते. वास्तविक पाहता स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या महापालिकेची कार्यालये स्वच्छ व नेटकी असणे आवश्यक आहे मात्र तसे दिसत नाही. पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकल्याने महापालिका आवारातील प्रशासकीय इमारत व इतर कार्यालयांमध्येही अस्वच्छतेचे विदारक दर्शन घडते. यामुळे महापालिकेच्या या इमारती स्वच्छ सुंदर व नेटक्या दिसाव्यात या उद्देशातून साफसफाईचा मक्ता व्यावसायिक कंपनीला देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी घेतला आहे.
● या 5 इमारतींच्या साफसफाईचा मक्ता देणार !
महापालिका आवारातील इंद्रभुवन, कौन्सिल हॉल, प्रशासकीय इमारत तसेच हुतात्मा स्मृती मंदिर, डफरीन चौक येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृह या 5 इमारतीच्या साफसफाईचा मक्ता देण्यात येणार आहे. साफसफाईची कामे करणाऱ्या व्यावसायिक संस्थेला 3 वर्षासाठी हा मक्ता देण्यात येईल. यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सोलापुरकरांना हक्काचे पिण्याचे पाणी द्या अन्यथा आंदोलन : दिलीप माने
● दुहेरी पाईपलाईनसाठी दिलीप माने यांचे आंदोलन
सोलापूर : मागील पाच वर्षात उजनी धरण 110 टक्के भरले पण, सोलापूर शहाराला 5 दिवसाआड पाणी मिळते, समांतर जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ होऊन 4 वर्ष होत आली. अद्यापही काम सुरू नाही. कामाची किंमत दुपटीने वाढली आहे. याला स्मार्ट सिटीचे प्रशासन जबाबदार आहे. टेंडर कुणालाही द्या पण सोलापूरकरांना हक्काचे पिण्याचे पाणी द्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा माजी आमदार दिलीप माने यांनी दिला.
सोलापूर ते उजनी या समांतर जलवाहिनीचे काम रखडले आहे. त्याबद्दल माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या समर्थकांसह जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू केले आहे. यावेळी माने बोलत होते.
दिलीप माने म्हणाले की, शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी केंद्र शासनाच्या स्मार्ट योजनेअंतर्गत उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ ९ जानेवारी २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. मात्र चार वर्षात या योजनेचे काम महानगरपालिकेच्या लहरीपणामुळे अद्यापही सुरु झाले नाही. याला पूर्णपणे प्रशासन आणि अधिकारी जबाबदार आहेत.
वास्तविक पाहता स्मार्ट सिटीचे चेअरमन असीम गुप्ता यांनी याबाबत बोर्ड मीटिंग घेणे आवश्यक आहे. मात्र ते सोलापुरात फिरकत नाहीत आले तरी ते तोंडी आदेश देतात. या जलवाहिनी साठी सरकारने दोनशे कोटी रुपये दिले आहेत. एनटीपीसीचे 250 कोटी पडून आहेत. तरीही हे काम का सुरू होत नाही, असा सवाल दिलीप माने यांनी उपस्थित केला.
उजनी जलाशय गेली पाच-सहा वर्षापासून १०० टक्के भरलेला असताना सोलापूर शहरवासियांना गेल्या अनेक वर्षापासून चार ते पाच दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा वेळी-अवेळी पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे सोलापूर शहरवासियांना पिण्याच्या पाण्यापासून वंचीत रहावे लागते. महानगरपालिका वर्षाला सुमारे ४० कोटी रुपये पाणीपट्टी वसुल करते, परंतु वर्षातील १०० दिवससुध्दा पाणी पुरवठा करीत नाही. समांतर जलवाहिनीचे काम त्वरीत करुन नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, अशी आमची मागणी आहे. मागणी मान्य न झाल्यास आणखीन तिव्र आंदोलन करण्यात येईल, असेही माने सांगितले.
या आंदोलनात जयकुमार माने, केदार उंबरजे, नागेश ताकमोगे, पृथ्वीराज माने, अजित माने, संभाजी भडकुंबे, अनिल वाघमारे, समीउल्ला शेख, सुनील जाधव, अजय सोनटक्के, सचिन चौधरी, शैलजा राठोड, गंगाधर बिराजदार, महेश घाडगे यांच्यासह नागरिक सहभागी होते.
● स्मार्ट सिटीच्या बैठकीत निर्णय होईल : आयुक्त
आपल्याकडे स्मार्ट सिटीचे प्रभारी सीईओ पद आहे. हा विषय आपल्या अखत्यारीत येत नाही. ही बाब आपण स्मार्ट सिटी चे चेअरमन असीम गुप्ता यांना कळवली आहे. त्यांना बोर्ड मीटिंग त्याची मागणी केली आहे. बोर्ड मीटिंग झाल्यावरच समांतर जलवाहिनीचा निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी दिली.