सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानभा मतदारसंघातून विधानसभा लढण्याची तयारी माजी आ. दिलीप माने यांनी सुरू केली आहे. त्यासाठी ते जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. Baba Mistry’s claim to South Solapur; Congress’s move, Dilip Mane’s politics are waiting for him मात्र आता अचानक गतवेळी विधानसभा निवडणूक लढलेले माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी दक्षिणमधून आपण इच्छुक असल्याचे सांगितले आहे. बाबा मिस्त्री यांचे हे वक्तव्य म्हणजे काँग्रेसचीच पर्यायाने माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचीच खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिणमधून आ. सुभाष देशमुख आणि बाबा मिस्त्री यांच्यात थेट लढत झाली होती. यामध्ये आ. देशमुख जरी विजयी झाले असले तरी चर्चा मात्र ६० हजारांच्या आसपास मते घेणाऱ्या बाबा मिस्त्री यांचीच झाली होती. दुसरीकडे २००९ आणि २०१४ मध्ये याच मतदारसंघातून दिलीप माने यांनी निवडणूक लढली होती. २००९ मध्ये ते विजयी झाले होते तर २०१४ मध्ये ते सुभाष देशमुखांकडून पराभूत झाले होते. २०१९ मधून त्यांनी शहर मध्यमधून निवडणूक लढवली होती. मात्र येथेही त्यांचा पराभव झाला होता. दक्षिणमधून न लढणे ही चूक लक्षात आल्यानंतर माने यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा दक्षिणकडे वळवला आहे. ते आता राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.
हा मतदारसंघ पूर्वीपासून काँग्रेसकडे आहे. त्यामुळे आघाडी जर झाली तर हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळे माने यांची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माने हे ऐनवेळी पुन्हा काँग्रेसवासी होतील, अशी चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. मात्र आता त्यापूर्वीच काँग्रेसने एक नवी खेळी करत बाबा मिस्त्री यांना पुन्हा एकदा दक्षिणवर दावा करण्यास सांगितल्याची चर्चा आहे.
दिलीप माने यांनी शहर मध्यमधून आ. प्रणिती शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढली होती. त्यावेळी माने यांच्याकडून शिंदे यांच्यावर टीकाही करण्यात आली होती. ही बाब सुशीलकुमार शिंदे यांच्या चांगलीच लक्षात आहे. त्यामुळे माने यांची राजकीय गोची करण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांनीच बाबा मिस्त्री यांना दक्षिणवर दावा करण्यास सांगितल्याची चर्चा सुरू आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● यंदाही दक्षिणमधून इच्छुक : बाबा मिस्त्री
मागच्यावेळी आपण दक्षिणमधून निवडणूक लढवली होती. त्यानंतर आपण सातत्याने या मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क ठेवला आहे. यंदाही आपण येथून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे, असे बाबा मिस्त्री यांनी सांगितले.
● आ. शिंदेंचेही दक्षिण दौरे वाढले
आ. प्रणिती शिंदे यांनीही आपले दक्षिण मतदासंघातील दौरे वाढवले आहेत. त्यांनी माजी जि.प. सदस्य सुरेश हसापुरे यांच्यापाठीमागे ताकद लावली आहे. हसापुरे हेही या मतदारसंघातून इच्छुक आहेत. एकंदरित काँग्रेसकडून दिलीप माने यांची गोची करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.
● दिलीप मानेंच्या भूमिकेकडे लक्ष
माने यांनी अद्यापपर्यंत आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. काँग्रेसचा हा डाव ओळखून दिलीप माने आता कोणता प्रतिदाव डाव टाकणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.