मुंबईचा श्वास, मराठी माणसाचा कणा म्हणजे शिवसेना. जय शिवाजी; जय भवानी म्हटल्याबरोबर अंगावर रोमांच प्रकट करणारी घोषणा म्हणजे शिवसेनेचा आवाज. मराठी माणसाचा स्वाभिमान म्हणजे शिवसेना आणि मराठी मावळ्यांचा अभिमान म्हणजे शिवसेना. मुंबई म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे मुंबई. Neither Thackeray’s nor Shinde’s Shiv Sena but Atre’s?; Had the differences been resolved, Atre would have been the first Shiv Sena chief मुंबईला वाचवलं शिवसेनेनं आणि शिवसेनेला वाढवलं मुंबईनं. मुंबई आणि मराठी माणूस यांच्यातील अतूट नाते म्हणजे शिवसेना. अन्यायावर आघात करणारी संघटना म्हणजे शिवसेना. मराठी, मराठी माणूस, हिंदुत्व म्हणजे शिवसेना.
महाराष्ट्राच्या राजकारणाला मराठी अस्मितेची दिशा देणारा पक्ष म्हणजे शिवसेना. बलाढ्य अशा राष्ट्रीय पक्षांनाही ज्या पक्षाची दखल घ्यावी लागते; तो पक्ष म्हणजे शिवसेना. पण ही शिवसेना आहे कुणाची? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची? की उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची? का शिवसेनेतून बंडखोरी करून आम्हीच शिवसेना आणि शिवसेना आमची म्हणणार्या एकनाथ शिंदेंची? स्व. बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे संस्थापक होते, हे शंभर टक्के सत्य. तरीदेखील शिवसेना त्यांची होती किंवा आहे का? निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिले म्हणून शिवसेना त्यांची का? तसे निश्चितच नाही. मग प्रश्न पुन्हा तोच; शिवसेना कोणाची? शिवसेना ना ठाकरेंची; ना शिंदेंची. शिवसेना तर आचार्य प्र.के. अत्रे यांची. काय? दचकलात? खोटं….? अजिबात नाही. शिवसेना ही अत्रेंचीच. ती कशी? हे ‘सुराज्य’च्या तमाम वाचकांना समजावून सांगण्यासाठीच आजचा हा लेखन प्रपंच.
जसे बाळासाहेब निर्भीड. तसे अत्रेही कोणाला न घाबरणारे अन् कोणाचीही भीडभाड न बाळगणारे? जसे बाळासाहेब रोखठोक. तसे अत्रे सडेतोड. जसे बाळासाहेबांचे शब्दप्रहार, तसे अत्रेंचे शाब्दिक वार. जसे बाळासाहेब एकदा बोलले की बोलले. पुन्हा माघार नाही. तसे अत्रे बोलले की बोलत पुढेच जाणार. मागे वळून बघणारच नाहीत. बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे आणि अत्रे यांची दोस्ती. तीसुध्दा पक्की. लेचीपेची नव्हे. त्यामुळेच अत्रे आणि बाळासाहेब यांचेही संबंध मैत्रीचेच. जितकी दोस्ती जिगरी, तितकीच दोघांमध्ये मतभिन्नतेची दरी. दोस्ती तर दोस्ती; नाही तर कुस्ती, या मतावर दोघेही नुसतेच ठाम नव्हे तर अढळ असायचे.
टोकाचे मतभेद असले तरी मतभिन्नता नव्हती. भाषणातून दोघेही एकमेकांची चिरफाड करताना जराही दया न दाखवणारे. पण दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल पराकोटीचा आपलेपणा आणि आदर ठासून भरलेला. आज शिवसेना आणि अत्रे-ठाकरे यांचा संदर्भ येण्याचे कारण म्हणजे दोघांचाही शिवसेनेशी अत्यंत निकटचा संबंध. या दोघांचीही नावे बाजूला काढलीत तर शिवसेना हे नाव पूर्णच होऊ शकत नाही. कारण शिवसेनेची संकल्पना मांडली ती अत्रेंनी आणि शिवसेनेची स्थापना केली ती बाळासाहेबांनी. म्हणून शिवसेना ना ठाकरेंची; ना शिंदेंची. शिवसेना तर आचार्य अत्रेंची.
जसा बाळासाहेबांचा ‘सामना’; तसा अत्रेंचा ‘मराठा’. पुढे जाऊन ‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र बनले. तसे ‘मराठा’ हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे तळपते हत्यार होते. तारीख होती 19 जुलै 1959. त्यादिवशी ‘मराठा’ची हेडलाईन होती‘ आचार्य अत्रे यांची महाराष्ट्राला हांक : शिवसेना उभारा!’ ही हाक दिली होती आचार्य अत्रे यांनी त्यांच्याच ‘मराठा’ वृत्तपत्रामधून. त्याकाळी महाराष्ट्रात शिवसेना ही का आवश्यक आहे? याचे विस्तृत विवेचन अत्रे यांनी केले होते. अर्थात शिवसेना नावाच्या संघटनेची संपूर्ण संकल्पनाच मांडली होती. त्या अर्थाने शिवसेनेचे जनक म्हणून आचार्य अत्रे यांच्याकडे पाहिले जाते. जशी अत्रेंनी शिवसेेनेची संकल्पना मांडली होती; तशीच किंबहुना अत्रेंच्या संकल्पनेतील हुबेहूब शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली. उभी केली आणि ती महाराष्ट्राच्या कानाकोपर्यापर्यंत पोहचवली. म्हणून बाळासाहेब जरी शिवसेना प्रमुख असेल तरी आचार्य अत्रे हे शिवसेनेचे संकल्पक आहेत. त्या अर्थाने शिवसेना ही अत्रेंचीच.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● अत्रेंनी लिहिले होते….
रविवार दि.19 जुलै 1959 रोजी ‘मराठा’ वृत्तपत्रात आचार्य अत्रे यांनी लिहिले होते, महाराष्ट्रात आज दोन स्वयंसेवक संघटना प्रामुख्याने कार्य करीत आहेत. एक ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ आणि दुसरे राष्ट्र सेवादल’. संयुक्त महाराष्ट्राच्या कार्यासाठी अशा तर्हेची एक ‘शिवसेना’ उभारण्यात यावी, असे आम्हांला मनापासून वाटते. सार्वत्रिक निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा अवधी आहे. ह्या दोन वर्षांच्या काळात जर बारा ते सतरा वर्षांच्या वयाचे एक लाख शिवसैनिक’ आम्हांला अखिल महाराष्ट्रात उभे करता आले तर त्यांच्यामुळे ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’च्या ’शिवशक्ती’ला अशी काही विलक्षण धार येणार आहे, की ह्या क्षणी त्याची कल्पनाही कोणाला होऊ शकणार नाही.
● आचार्य अत्रेंचे पोटतिडकीचे आवाहन
शिवसेनेची संघटना बांधणे ही काही सोपी गोष्ट नाही हे आम्ही जाणतो. त्यासाठी निरलस, निष्ठावंत आणि प्रखर महाराष्ट्रप्रेमी संघटकांची आवश्यकता आहे. पण अशा संघटनाचतूर माणसांची महाराष्ट्रात वाण आहे असे आम्हाला मुळीच वाटत नाही. पण आमच्यासारख्यांनी किंवा दुसर्या कोणी त्यांच्या शोधाला जाण्यापेक्षा, स्वयंस्फूर्तीने त्यांनी ह्यावेळी पुढे यावयाला पाहिजे आणि ह्या कामाला त्यांनी लगोलग हात घातला पाहिजे.
शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राची सर्वांत मोठी सेवा ह्या एका कार्याने होणार आहे, असे आम्हांला वाटते. म्हणून शिवसेनेचे आमचे हे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील संयुक्त महाराष्ट्रवादी जनतेला आणि कार्यकर्त्यांना अत्यंत पोटतिडकीने आवाहन करतो आहोत.
● अत्रेंनी घातला पाया…
शिवसेना नावाची संघटना स्थापन करण्यासाठी आचार्य अत्रे आग्रही होते. संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढण्यासाठी अशा संघटनेची नितांत आवश्यकता आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. पुढे जानेवारी 1963 मध्येही आचार्य अत्रेंनी ‘मराठा’मधील एका अग्रलेखातून शिवसेनेची रचनाच मांडली होती. शिवसेनेच्या स्थापनेसाठी त्यांनी स्वत:च पुढाकारही घेतला होता. त्यादृष्टीने त्यांच्या प्राथमिक बैठकांना सुरुवातही झाली होती. फक्त आणि फक्त मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी शिवसेना ही एक बिगर राजकीय संघटना ही या शिवसेनेची चौकट होती. एकूणच अत्रे यांना शिवसेनेच्या माध्यमातून त्याकाळी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांचा एक दबावगट तयार करायचा होता. त्यासाठी शिवसेना नावाची संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला होता.
● दि.19 जून 1966
तो दिवस होता दि. 19 जून 1966 चा. खुद्द बाळासाहेब आणि त्यांचे दोन बंधू आणि प्रबोधनकार असे ठाकरे कुटुंबातील चौघे आणि अन्य 14 निवडक व विश्वासू लोक बाळासाहेबांच्या घरी एकत्र जमलेले. नाईक नावाच्या बाळासाहेबांच्या एका सहकार्याने गल्लीतीलच एका दुकानातून एक नारळ आणलेला. बरोबर सकाळी साडेनऊ वाजता प्रबोधनकारांनी नारळ फोडला आणि उपस्थित 18 लोकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा दिली अन् शिवसेनेची स्थापना झाली. तीच शिवसेनेच्या स्थापनेची घोषणा होती. तीच घोषणा आजही कायम आहे. पुढे बाळासाहेबांनी ही शिवसेना संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचवली.
□ दोस्ती अन् कुस्ती
सुरुवातीच्या काळात प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रे यांचे संबंध अतिशय चांगले होते. त्यांची कमालीची दोस्ती होती. जसे अत्रेंना मराठी माणसांची संघटना असावी असे वाटत होते; तेच प्रबोधनकारांचेही मत होते. मराठी तरुणांची संघटना असावी असे प्रबोधनकारांनाही वाटत होते. जेव्हा बाळासाहेबांकडे मराठी माणसांची वर्दळ वाढली, तेव्हा त्या वर्दळीचे रूपांतर संघटनेत करण्याची सूचना प्रबोधनकारांनीच बाळासाहेबांना केली होती. शिवाय त्या संघटनेला ‘शिवसेना’ हे नाव द्यावे असेही प्रबोधनकारांनी सुचवले होते. शिवाजीची सेना म्हणजे शिवसेना असा सरळ अर्थ प्रबोधनकारांनी सांगितला होता.
दरम्यानच्या काळात अत्रे आणि बाळासाहेब यांच्यात मतभेद वाढत गेले. त्यावरून त्यांनी एकमेकांविरूध्द टीकाटिप्पणी करण्यास सुरुवात केली. दोघेही दोस्त. मात्र दोघांमध्ये वैचारिक मतभेद आल्यानंतर दोघांमध्ये वैचारिक कुस्तीही होऊ लागली.
□ पहिल्या मेळाव्याला अत्रेंना आमंत्रण
दि.13 जून 1969 रोजी आचार्य अत्रेंचे निधन झाले. त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांच्या ‘मार्मिक’मध्ये अत्रेंविषयी एक लेख लिहिला. त्यात ते लिहितात,‘शिवसेेनेच्या स्थापनेनंतर दि. 30 ऑक्टोबर 1966 रोजी झालेल्या शिवाजी पार्कवरील शिवसेेनेच्या पहिल्या मेळाव्याचे आपण त्यांना निमंत्रण दिले होते. आपण या नवसंघटनेच्या धुरेवर येऊन उभा रहा. त्यानंतरही शिवसेनेच्या प्रत्येक मेळाव्यात त्यांना शिवसेनेची जबाबदारी घेण्यासाठी बाळासाहेब सांगत होते. पण तसे झाले नाही. त्यावेळी बाळासाहेब आणि अत्रे यांच्यातील मतभेद मिटले असते तर आचार्य अत्रे हेच पहिले शिवसेनाप्रमुख झाले असते.
□ बाळासाहेब म्हणतात अत्रे ऑलराऊंडर…
बाळासाहेबांनी एका मुलाखतीत सांगितले की अत्र्यांसोबत असणारा वाद कधीच संपला होता. अत्रेंनी लिहिले होते की, जेव्हा प्रबोधनकार लिहू लागतात तेव्हा सरस्वतीनं तोंडात शंख धरलाय आणि हातात ताषा घेतलाय अस वाटतं. अत्र्यांचं एक एक वाक्य म्हणजे हास्याची कारंजी असायची. अत्रे त्यांच्या लेखांमधून कधी त्यांनी एखाद्याच्या मर्मावर बोट ठेवलं तर कधी एखाद्याचं मन देखील दुखावलं. निसंशयपणे अत्र्यांची लेखणी निर्भीड होती अत्रे देखील निर्भीड होते. अत्रे मुळातच अष्टपैलू होते. ऑलराऊंडर होते.
✍️ ✍️ ✍️