सोलापूर : तुमच्या घरावर करणी केली आहे, मुलाच्या लग्नासाठी पूजा करावी लागेल,असे म्हणत महिलेला ६० हजारांना फसवल्याची घटना शहरात घडली. Puja has to be done for girl’s marriage, Rangpanchami Talvar Tarun cheated on the woman
याबाबत शारदा बाबूराव कोष्टी (वय-५०,रा. सिद्धरामेश्वर वस्ती, विनायकनगर) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोष्टी या इंडीवरून येताना त्यांना तेथे रेल्वे स्टेशनवर एका अनोळखी व्यक्तीची भेट झाली. त्यावेळी कोष्टी यांनी आपल्या मुलाच्या लग्नाबाबत सांगितले. त्यावेळी आरोपीने फिर्यादींना मोबाइल नंबर दिला. त्यानंतर त्याने २८ फेब्रुवारी रोजी सोलापुरात येऊन तुमच्या घरातील कोणीतरी करणी केली आहे, पूजा करावी लागेल, म्हणत पूजेची मांडणी करीत रोख पंधरा हजार रुपये एका ब्लाऊजपीसमध्ये बांधण्यास सांगितले.
त्यानंतर ती रक्कम घेऊन तो गेला. थोड्या दिवसानंतर येऊन आणखी मोठी पूजा करावी लागेल, असे म्हणत नव्या सहा साड्या खरेदी केल्या. शिवाय पूजेला बसल्यानंतर सोने ठेवावे लागेल असे सांगितले. यामुळे फिर्यादींनी गळ्यातील सोन्याचे गंठण पूजेसाठी दिले. त्यानंतर त्याचा मोबाइल नंबर बंद लागला.यामुळे आपली ६० हजारांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कोष्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पो.स.इ. रजपूत करीत आहेत.
》 तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
सोलापूर : पॅन्टच्या डाव्या बाजूस लोखंडी मूठ असलेले तलवार घेऊन फिरणाऱ्या इसमाला पोलिसांनी पकडले असून त्याच्या ताब्यातून ३१ इंची तलवार जप्त केली. याप्रकरणी गणेश शिवानंद आंडगे (वय-४१, रा.पुर्व मंगळवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भारत गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यावेळी एक तरूण तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलीसांनी सराफ कट्टा येथील वारद बोळ येथे थांबलेला आंडगे याच्या हलचाली संशयास्पद वाटले.
यामुळे पोलिसांनी आंडगेची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ एकूण ३१.५ इंची तलवार आढळली. ती तलवार त्याने पॅन्टच्या डाव्या बाजूला खोवलेले होते. यामुळे पोलिसांनी ती तलवार जप्त करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास हवालदार खाजप्पा आरेनवरू हे करत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 वकिलाने आशिलाला कोयत्याने मारले; परस्पर विरोधी तक्रार दाखल
पंढरपूर – जागा आम्हाला का देत नाही म्हणून कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी तर जामीन प्रकरणी अर्ज दिल्याने टोच्याने हल्ला केल्याप्रकरणी दोन परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये पहिल्या घटनेत प्रसाद नंदकुमार विधाते रा. गोपापूर यास गोपाळपूर येथील जागा आम्हाला का देत नाही म्हणून लखन औदुंबर बोडके याने कोयत्याने डोक्यास मारहाण केली तर अमोल बोडके, राहुल औदुंबर बोडके व प्रवीण बडदे या तिघांनी दमदाटी व शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या प्रकरणांमध्ये अमोल औदुंबर बोडके रा. भाजी मंडई हे आपल्या कार्यालयामध्ये बसून काम करीत असताना त्यांचाच अशील असलेल्या प्रसाद नंदकुमार विधाते याने, जामीनदारने तुझ्या सांगण्यावरून मला जामीन व्हायचे नाही असा न्यायालयात अर्ज दिला असल्याचा आरोप करून अमोल बोडके यांच्यावर बर्फ फोडण्याच्या टोच्याने हल्ला केला तसेच त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. या भांडणांमध्ये बोडके यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी गहाळ झाल्याचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल असून पहिल्या प्रकरणाचा सहाय्यक फौजदार माळी तर दुसऱ्या प्रकरणाचा पोलीस नाईक येडगे तपास करीत आहेत.