● आठव्या प्रशासक म्हणून शितल तेली – उगले यांच्याकडे कारभार !
सोलापूर : सोलापूर महापालिकेवर विविध कारणास्तव तीन वेळा प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली. यापूर्वीच्या दोन प्रशासकीय राजवटीत एकूण 6 प्रशासकांनी कार्यभार सांभाळला. लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्याने लागू केलेल्या सध्याच्या तिसऱ्या प्रशासकीय कारकीर्दीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. आत्तापर्यंत आठव्या प्रशासक म्हणून शितल तेली – उगले या सध्या प्रशासकीय जबाबदारी सांभाळत आहेत. Anniversary of Third Administrative Regime; Solapur Municipal Corporation has been under administrative rule for three times
दि. 1 ऑगस्ट 1852 रोजी सोलापूर नगरपालिकेची स्थापना झाली. सोलापूर नगरपालिकेला स्वातंत्र्य लढ्याचा जाज्वल्य आणि क्रांतिकारी असा प्रेरक इतिहास आहे. ब्रिटिश काळात एप्रिल – मे 1930 दरम्यान नगरपालिकेच्या इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवण्यात आला होता. पारतंत्र्यातही तब्बल चार दिवस स्वातंत्र्य उपभोगणारे हे क्रांतिकारी शहर म्हणून ओळखले जाते. मार्शल लॉ पुकारण्यात आला होता.
नगरपालिकेचे दि. 1 मे 1964 मध्ये महापालिकेत रूपांतर झाले. दरम्यानच्या काळात महापालिकेचा कारभार व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी तत्कालीन आयुक्तांनी शासनाकडे केल्या. त्यामुळे दि. 1 जून 1967 ते 22 जून 1969 दरम्यान सुमारे 2 वर्ष 21 दिवस पहिल्यांदा प्रशासकीय कारकीर्द होती. आणि पुन्हा दि. 6 फेब्रुवारी 1981 ते 12 मे 1985 या कालावधीत साधारणता: 4 वर्षे 3 महिने प्रशासकीय कारकीर्द होती. असे यापूर्वी दोन वेळेला प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली होती. या एकूण 6 वर्षाच्या कालावधीत सोलापूर महापालिकेचा कारभार 6 प्रशासकांनी सांभाळला.
● सहा वर्षात सहा प्रशासकांनी पाहिले कामकाज !
1967 ते 1969 आणि 1981 ते 1985 या सहा वर्षाच्या कालावधीत यापूर्वी 6 प्रशासकांनी कामकाज पाहिले. या कार्यकाळात एम. जी. सप्रे, डी. डी. रणदिवे, एस. के. जांबवडेकर, व्ही. के. कोल्हटकर, रमानाथ झा आणि ए. के. नंदकुमार या आयुक्तांनी प्रशासक म्हणून काम पाहिले. त्यांची कारकीर्द वैशिष्ट्यपूर्ण ठरली. रमानाथ झा यांच्या कार्यकाळातील अतिक्रमण विरोधात बेधडक कारवाईच्या आठवणी आजही सांगितल्या जातात.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● मार्च 2022 पासून तिसऱ्यांदा प्रशासकीय राजवट !
दरम्यान, त्यानंतर महापालिका लोकप्रतिनिधीची पाच वर्षाची मुदत संपल्याने राज्य शासनाकडून 8 मार्च 2022 पासून प्रशासक म्हणून महापालिका आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली. सुरुवातीच्या काळात आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात प्रशासकीय उपसमितीमध्ये एकूण 384 ठराव पास करण्यात आले. विविध विकास कामे केली. तर तब्बल सुमारे 750 कर्मचारी, अधिकाऱ्यांवर विविध प्रकारची रेकॉर्ड ब्रेक कारवाई केली. त्यांच्या बदलीनंतर दि. 21 नोव्हेंबर 2022 पासून आजतागायत शितल तेली – उगले या प्रशासक तथा आयुक्तपदाची धुरा कार्यकुशलतेने सांभाळत आहेत.
● तेली – उगले यांच्याकडे तिहेरी पदाचा मुकुट !
सध्याच्या प्रशासक शितल तेली – उगले यांच्याकडे तीन पदाची जबाबदारी आहे. महापालिका आयुक्त, प्रशासक त्याचबरोबर सोलापूर स्मार्ट सिटीच्या सीईओ अशी तीन पदे त्या भूषवित आहेत. हे विशेष ! आज पर्यंतच्या 111 दिवसांच्या कालावधीत त्यांनी विविध प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच सोलापूर शहर स्वच्छ – सुंदर व प्रदूषणमुक्त करण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला आहे.
कामगार हिताचे निर्णय घेतले. तब्बल बारा वर्षानंतर रोस्टर मंजूर झाले. पदोन्नती मिळणार आहेत तसेच भरती प्रक्रियाही लवकरच राबविण्यात येणार आहे.
यापूर्वी प्रशासक हे सोमवारी एकच दिवस नागरिकांना भेटत होते. मात्र तेली – उगले यांनी सोमवारी व गुरुवारी असे दोन दिवस नागरिकांच्या समस्या, तक्रारी अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. विकासाचे व्हिजन असलेल्या लोकाभिमुख आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण होत आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याकडे त्यांनी प्राधान्याने लक्ष दिले आहे.