● कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उन्हाळ्यात यंदा तीन आवर्तनाच्या निर्णयाने शेतकऱ्यांचा मोठा फायदा
सोलापूर : जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील जिवंत पाणीसाठा आता ६० टक्क्यावर आला असून सध्या डावा, उजवा कालवा, सीना-माढा, दहिगाव उपसा सिंचन योजनेसह बोगद्यातून पाणी सोडले जात आहे. Big benefit for farmers: The water released from Ujni for agriculture will continue to circulate till May 10 दरम्यान शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे उजनीतून सध्या सोडलेले पाणी आता १० मेपर्यंत सुरुच राहणार असून ऐन उन्हाळ्यात तीन आवर्तने मिळाल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकांची होणारी होरपळ थांबणार आहे.
रब्बीच्या सोलापूर जिल्ह्यात खरिपाचे पीक मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यात उसाचे क्षेत्र मोठे असून साखर कारखानदारी वाढली आहे. जिल्ह्यात बागायती क्षेत्र वाढले असून जिल्ह्याच्या कृषीक्रांतीत उजनी धरणाचे मोठे योगदान राहिले आहे. पूर्वीपासून उन्हाळ्यात एक आवर्तन सोडले जात होते. त्यानंतर अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी शेतकऱ्यांची मागणी व जिल्ह्यातील पिकांचा अभ्यास करून उन्हाळ्यात दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांसाठी तो निर्णय खूपच फायदेशीर ठरला.
पण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कालवा सल्लागार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उन्हाळ्यात यंदा तीन आवर्तने देण्याचा निर्णय घेतला. विशेष बाब म्हणजे हे तिन्ही आवर्तने सलग सोडण्याचेही स्पष्ट आदेश दिले. त्यानुसार आता १ ते २७ मार्च पहिले आवर्तन, त्यानंतर २७ मार्च ते २७ एप्रिल दुसरे आणि त्यानंतर १० मेपर्यंत तिसरे आवर्तन असणार आहे. दरम्यान, एप्रिल-मे महिन्यातील सोलापूर महापालिकेची मागणी पाहून शहरातील नागरिकांसाठी देखील भीमा नदीतून पाणी सोडले जाणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● १० मेपर्यंत चालणार पाण्याचे आवर्तन
उजनी धरणातून सध्या शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडले जात आहे. सलग तीन आवर्तने एकदम सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीत झाला असून त्यानुसार अंमलबजावणी केली जात आहे. शेतीसाठी डावा, उजवा कालवा व उपसा सिंचन योजनांसह बोगद्यातून सोडलेले पाणी मे महिन्यापर्यंत सुरुच राहणार आहे.
● डाव्या कालव्याचे लवकरच मजबुतीकरण
उजनीतून पाणी सोडल्यानंतर कॅनॉलच्या गळतीमुळे त्यातील बहुतेक पाणी वाया जात असल्याची वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील ‘सीडब्ल्यूपीआरसी’ या केंद्रीय संस्थेकडून त्याचा अभ्यास केला जात आहे. सध्या टेस्टिंग पूर्ण झाले असून त्यावरील संशोधन झाल्यानंतर त्यांचा अहवाल जलसंपदा विभागाला सादर होईल. त्यानंतर संबंधित कामाचे इस्टिमेट करून त्यानुसार शासनाला रिपोर्ट सादर केला जाणार आहे. शासनाचा निधी प्राप्त झाल्यानंतर डाव्या कालव्याचे मजबुतीकरण करण्यात येणार असल्याचे धीरज साळे, (अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण,सोलापूर) यांनी सांगितले.
》 ‘सुराज्य’चे शिवाजी हळणवर आदर्श कृषी पत्रकार पुरस्काराने सन्मानित
● कष्टातून शेतीत प्रगती साधणाऱ्या शेतकऱ्यांच्या सन्मानाचा गौरव सोहळा
सोलापूर – महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने रविवारी बामणी (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथे दै.सुराज्य चे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी हळणवर यांना ‘राज्य स्तरीय आदर्श कृषी पत्रकार पुरस्कारा’ ने
सन्मानित करण्यात आले.
यावेळी कष्टातून शेतीत प्रगती साधणाऱ्या राज्यभरातील शेतकऱ्यांच्या सन्मानाचा गौरव सोहळ्यात उसाचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या राज्यातील २५ शेतकऱ्यांना ऊसभूषण, ऊसविकास कार्यगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने राज्य भरातील आदर्श ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करीत ‘महाराष्ट्र ऊस भूषण कार्य गौरव पुरस्कार’ देवून त्यांचे प्रोत्साहन वाढविले जाते. त्याच बरोबर शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या, उपाय हे आपल्या लेखणीच्या माध्यमातून शासन दरबारी मांडून आवाज उठविणारे शिवाजी हळणवर व कोल्हापूरचे राजकुमार चौगुले व इतर पुरस्कारार्थींना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सन्मानित करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे संस्थापक अतुल माने पाटील होते.
यावेळी केळी उत्पादक संचाचे अध्यक्ष किरण चव्हाण,उत्तम परिट,राजेंद्र डुचे पाटील आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची आजची परिस्थिती नाजूक झाली असून शेतीतील समस्या वाढत आहेत. यावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ऊस विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी अधुनिक ऊस तंत्रज्ञान यावर संजिव माने यांचे ‘एकरी १०० टन सहज शक्य’ याविषयी तर उत्तमराव परिट यांचे ‘आदर्श ऊस शेती’ यावर आणि संतोष सहाणे यांचे सेंद्रिय शेती याविषयी मार्गदर्शन केले. या विकास परिषदेस ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.