● शीतलदेवी मोहिते पाटील यांची माहिती
● विजेत्यास मिळणार एक लाख रुपये रोख व चांदीची गदा
अकलूज : पुरुषांच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे प्रमाणेच राज्यात प्रथमच अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलावर मॅटवरील ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेचे ५ , ६ व ७ मे २०२३ रोजी आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ताराराणी महिला कुस्ती केंद्राच्या प्रमुख शीतलदेवी मोहिते – पाटील यांनी दिली. Tararani Women’s Kesari Wrestling Tournament to be held at Akluj Mohite Patil Silver Mace Cash Prize
अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर यासंदर्भातील पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झाली. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, चि. विश्वतेजसिंह मोहिते पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या राष्ट्रीय स्तरावरील महाराष्ट्रात प्रथमच ताराराणी केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून राज्य कुस्तीगीर परिषदेकडे गेल्या तीन वर्षापासून आम्ही महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्या म्हणून पाठपुरावा करीत आहोत. परंतु त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही.
अकलूजला कुस्तीची मोठी परंपरा आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ,विजयसिंह मोहिते पाटील , जयसिंह मोहिते पाटील व मदनसिंह मोहिते पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून कुस्ती जपली व जोपासली. दोन महाराष्ट्र केसरी मल्ल महाराष्ट्राला दिले . अलीकडे या क्षेत्राकडे महिलाही मोठ्या प्रमाणात आकर्षिल्या जात आहेत. अकलूजला महिलांसाठी अद्ययावत ताराराणी महिला कुस्ती केंद्र उभारण्यात आले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या केंद्राच्या माध्यमातून ५ , ६ व ७ मे २०२३ रोजी ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी रु . एक लाख रोख पारितोषिक , चांदीची गदा,द्वितीय क्रमांकासाठी रु . ७५ हजार रोख , तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी रु. ५० हजार विभागून देण्यात येणार आहेत. प्रथम फेरीपासून बाद होणाऱ्या खेळाडूस पारितोषिके दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच वरिष्ठ गट , १८ व १५ वर्षाखालील वजन गटातील स्पर्धाही खेळविल्या जाणार आहेत. या माध्यमातून महिला कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी जवळपास दहा लाखाची बक्षिसे वितरित केली जाणार आहेत. असंख्य कुस्ती शौकिनांचे लक्ष या ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेकडे लागलेले आहे.
यावेळेस रोशनी बोडके, वेदिका शेंडे, ऋतुजा जाधव, आकांक्षा जाधव, काजोल जाधव, दीक्षा घाटणेकर, प्राची सावंत या मुलींनी कुस्ती क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी केल्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. सदर कुस्ती स्पर्धेसाठी २८ एप्रिल २०२३ ही नाव नोंदणीची अंतिम तारीख राहणार असल्याचे सांगण्यात आले.
“मल्ल मुलींसाठी राहण्याची व सुरक्षिततेची उत्तम सोय करण्यात आली असून या ठिकाणी तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये मोफत जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या मुलींसाठी एसटी बसचा खर्च देण्यात येणार आहे.”
– शीतलदेवी मोहिते पाटील
अध्यक्ष , ताराराणी महिला कुस्ती केंद्र
“महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे. मुली या क्षेत्राकडे वळत असताना त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे बनले आहे तरच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होतील याच उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून कायमस्वरूपी दरवर्षी या ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धा भरवल्या जातील. यंदाच्या स्पर्धेसाठी मुलींना प्रोत्साहन मिळावे यासाठी सेलिब्रिटींना आणण्याचा मानस आहे.”
– धैर्यशील मोहिते पाटील
अध्यक्ष, शिवरत्न कुस्ती प्रशिक्षण केंद्र