● बेकायदा वृक्षतोड प्रकरणी महापालिकेची कडक कारवाई
सोलापूर : शहरातील नेहरुनगर येथील शासकीय मैदानावर असलेली ५ झाडे महापालिकेची परवानगी न घेता तोडल्याबद्दल पंढरपुर तालुका क्रीडा अधिकारी सत्तेन जाधव यांना प्रति वृक्ष एक लाख रुपये यानुसार पाच लाख रुपये दंड लावण्यात आला आहे. दंड भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत महापालिका प्रशासनाने दिली आहे. Sports official Satten Jadhav fined five lakhs; Solapur Pandharpur Municipality gave fifteen days to pay the fine
वृक्ष तोडीची ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. त्यावेळी जाधव यांच्याकडे नेहरुनगरच्या मैदानाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे बेकायदा झाडे तोडल्याबद्दलची जबाबदारी जिल्हा क्रीडा कार्यालयाने जाधव यांच्यावर निश्चित केली. त्यानंतर दंडात्मक कारवाईचे आदेश महापालिकेने काढले आहेत.
दरम्यान, मैदानातील तोडलेली झाडे चांगल्या स्थितीत होती. कोणाचीही परवानगी न घेता ती तोडण्यात आली तसेच त्या झाडांच्या लाकडाची परस्पर विक्री करण्यात आली अशी तक्रार काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अँड. मनिष गडदे यांनी महापालिकेकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन महापालिकेच्या उद्यान विभागाने सत्तेन जाधव यांना नोटीस दिली होती. या नोटीसला उत्तर देण्यासाठी जाधव यांनी मुदत वाढवुन मागीतली होती. त्याप्रमाणे पंधरा दिवसांची मुदतही दिली होती. नंतर या नोटीसला लेखी उत्तर देण्यात आले. क्रीडा अधिकारी सत्तेन जाधव यांनी दिलेला खुलासा महापालिकेला समाधानकारक वाटला नाही. त्यामुळे त्यांना नियमाप्रमाणे पाच लाखाचा दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
महापालिकेने दंडात्मक कारवाईबाबत काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र नागरिक क्षेत्र वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम १९७५ अन्वये दोन फेब्रुवारी २०२३ रोजी जाधव यांना नोटीस बजावण्यात आली होती. ६ फेब्रुवारी रोजी नोटीसला त्यांनी उत्तर दिले. मैदानावरील झाडे वाळलेली होती तसेच ते कोणत्याही क्षणी पडण्याची भीती होती. व्यायाम करताना अडथळा होता म्हणून वृक्ष काढले असा खुलासा जाधव यांनी दिला होता. त्यांचा खुलासा असमाधानकारक आहे.
त्यावर महापालिकेच्या उद्यान विभागाने १० फेब्रुवारी रोजीच्या पत्राने जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर यांना जबाबदारी निश्चित करण्यासाठी कळवले होते. त्यांनी १३ फेब्रुवारी रोजी लेखी पत्राद्वारे या वृक्षतोडीबाबतची जबाबदारी सत्येन जाधव यांची असल्याचे कळवले. त्यामुळे वृक्षतोडीबाबत महाराष्ट्र नागरिक क्षेत्र वृक्ष संवर्धन आणि संवर्धन अधिनियम १९७५ सुधारित २४ जून २०२१ अन्वये प्रति वृक्ष एक लाख रुपये यानुसार पाच लाख रुपये दंड लावण्यात आला आहे.
महापालिकेने केलेल्या या कारवाईचे काँग्रेस सरचिटणीस अँड. मनिष गडदे यांनी स्वागत केले आहे. यामुळे पर्यावरणाची हानी करणाऱ्या व्यक्तींना चाप बसेल. यापुढे झाडे तोडण्याचे धाडस कोणीही करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपाचे माजी जेष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांनीही या कारवाईचे स्वागत केले आहे.
● दंड भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत : उपायुक्त मच्छिंद्र घोलप
नेहरुनगरच्या शासकीय मैदानावर झालेली बेकायदा वृक्षतोडीचा प्रकार गंभीर आहे. शासन पर्यावरण संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम राबवण्यात येत आहे. असे असताना शासनातीलच एक अधिकारी चांगल्या स्थितीत असलेली झाडे तोडतो आणि त्याची परस्पर विल्हेवाट लावतो ही बाब गंभीर आहे. म्हणून नियमानुसार पाच लाखाचा दंड केला आहे. तो दंड भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली आहे, असे महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी माध्यमांना सांगितले.