○ एफआरपी कायद्याची पायमल्ली
सोलापूर / शिवाजी हळणवार : सोलापूर विभागातील एक दोन कारखान्यांची धुराडी सोडली तर सर्वच कारखान्यांच्या गळीत हंगामातील धुराडी थंडावली आहेत. हंगाम संपला तरी ही सोलापूर विभागातील ५० पैकी ३५ कारखान्यांनी ६९१.४३ कोटीची एफआरपी देण्यात हात आखडता घेवून एफआरपी कायद्याची पायमल्ली करीत शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. 691 crores owed by Solapur sugar mills, the arrears of private mills more than cooperatives
यामध्ये सहकारी साखर कारखान्यांच्या पेक्षा खाजगी कारखान्यांची थकबाकी अधिक आहे. कहर म्हणजे काही कारखान्यांनी चक्क डिसेंबरमधील ऊस बीले थकविली असून गळीत हंगामाच्या सुरुवातीपासून ‘टार्गेट’ पुर्ती करण्यासाठी धावपळ करणारे कारखानदार व ‘एफआरपी आमच्या हक्काची …नाही कुणाच्या बापाची’ आणि धुराडी पेटू न देण्याच्या राणा भिमदेवी घोषणा देणाऱ्या शेतकऱ्यांच्या संघटना ही गप्प आहेत. यामध्ये अगोदरच मेटाकुटीला आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणत तो हेलपाटे मारून बेजार झाला आहे.
सोलापूर विभागात गळितास प्रारंभ झाल्यानंतर कारखान्यांची धुराडी पेटली होती. त्यानंतर सर्वच कारखानदारांनी लाखोंचे गळीत करण्याचा संकल्प करीत टार्गेट पुर्ण करण्यासाठी तोडणी यंत्रणा उभी केली. विभागातील ५० कारखान्यांनी यंदा हंगाम घेतला. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ३७ तर धाराशिव जिल्ह्यातील १३ कारखान्यांचा समावेश आहे. यामध्ये मार्चअखेर पर्यंतचे एफआरपी’चे बेसिक रिकव्हरी प्रमाणे ४४६७.६८ कोटी रूपये ऊस बिलाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना मिळाले आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपीचे ३५१२.२५ कोटी तर धाराशिव जिल्ह्यातील कारखान्यांनी ९५५.४३ कोटी रूपये मार्च अखेर दिले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
असे असले तरी सोलापूर जिल्ह्यातील २८ कारखान्यांकडे एफआरपीचे ६२१.८० तर धाराशिव जिल्ह्यातील ८ कारखान्याकडे ६९.६३ कोटी रूपये थकीत आहेत तर सिताराम महाराज, विठ्ठल साई, श्री शंकर, सिद्धनाथ या कारखान्यांचा मार्च अखेरचा एफआरपी अहवाल अद्याप साखर आयुक्तालयास प्राप्त झाला नाही.
○ कारखानानिहाय मार्चअखेर थकीत एफआरपी (कोटीत)
सोलापूर जिल्हा- सिद्धेश्वर ३४.५८,संत दामाजी १.१९ , श्री मकाई २६.३२ ,संत कुर्मादास ११.३० , लोकनेते २६.४२ , सासवड माळी २२.७१ , लोकमंगल ( बिबिदारफळ) १०.६३ ,लोकमंगल (भंडारकवटे) ४.१३ सिद्धनाथ ४८.८३ ,जकराया १३.६५ , इंद्रेश्वर १५.८३ , भैरवनाथ ( विहाळ) २९.२२ ,भैरवनाथ ( लंवगी ) ३०.८७ , युटोपियन १९.८५ , मातोश्री शुगर २३.६४ ,भैरवनाथ (आलेगाव ) ३६.९२ , बबनराव शिंदे ४.३६ ,ओंकार ०.५० , जयहिंद १२.४७ , विठ्ठल रिफाईडं ८३.०७ , आष्टी शुगर १७.४३,भिमा ५०.०४ , सहकार शिरोमणी ४४.२५ ,सिताराम महाराज ९.१९ ,धाराशिव (सांगोला) १२.२२ , श्री शंकर २३.२९ , आवताडे शुगर १४.३८ , येडेश्वरी २.६७
○ शेतकरी वेठीस; एफआरपी कायद्याची पायमल्ली
शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप झाल्यानंतर १४ दिवसात एफआरपी देणे बंधनकारक आहे. मात्र अनेक कारखाने या नियमाला केराची टोपली दाखवतात. राज्य शासनाने साखर कारखान्याच्या त्या त्या हंगामातील साखर उताऱ्यानुसार
एफआरपी देण्यासंदर्भात मागील वर्षी फेब्रुवारी आदेश काढला होता. त्यानुसार ऊसाचे गाळप झाल्यानंतर बेसिक रिकव्हरी प्रमाणे पहिला हप्ता शेतकऱ्यांना द्यायचा.
अनेक कारखाने थेट ऊसाच्या रसापासून ‘बी’हेवी मोलाँसिसपासून इथेनॉल निर्मिती करत असल्याने उर्वरित रक्कम कारखाना बंद झाल्यावर १५ दिवसात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून अंतिम साखर उतारा निश्चित करून त्यानुसार शेतकऱ्यांना द्यावी. असे आदेशात म्हटले होते. परंतु सर्रास कारखाने या आदेशाची पायमल्ली करीत असल्याचे दिसून येते. कहर म्हणजे अनेक कारखान्यांनी डिसेंबरमधील गाळप झालेल्या ऊसाचा पहिला हप्ता अद्याप दिलेला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे साखर उतारा निश्चित होवून थकीत हप्त्यासह अंतिम बीले कधी मिळणार याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.