○ राहतील काय? जातील काय? अजितदादांचा भरवसा नाय?
सोलापूर / विशेष प्रतिनिधी
अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यातील नंबर एकचे नेते. त्यांच्याहीपेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अन्य नेते पक्षात असले तरी राज्यातील पक्षावर त्यांचीच मजबूत पकड. प्रशासनात दरारा, पक्षसंघटनेत वचक असल्यामुळे पक्षात त्यांना मानणारा वेगळा गट त्यांनीच निर्माण केलेला. independent groups; A separate conspiracy, NCP’s case to prevent blasts Ajit Pawar Sharad Pawar Maharashtra politics पक्षप्रमुख शरद पवार नव्हे तर फक्त अजितदादा म्हणतील तेच धोरण आणि ते घेतील तो निर्णय म्हणजे राष्ट्रवादीचे तोरण असे म्हणत त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणारा एक गट त्यांनी नेहमीच पक्षात कार्यरत ठेवलेला. म्हणजेच स्वत:च्याच पक्षात स्वत:चीच समांतर ताकद अजितदादांनी तयार केलेली आहे. याच ताकदीच्या जोरावर अजितदादा कधी काय करतील याचा थांगपत्ता पक्षाला लागत नाही. त्यामुळे ते कितीही स्टँपवर लिहून देत असले तरी ते राष्ट्रवादीत राहतील काय? किंवा जातील काय? याबाबत कोणालाच भरवसा नाय, असे खुद्द राष्ट्रवादीवालेच सध्या बोलत आहेत.
अजित पवार यांचे चुलते शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली असली आणि ते स्वत: पक्षप्रमुख असले तरी राज्यातील पक्षात मात्र अजितदादांचेच वर्चस्व आहे. शरद पवारांचा शब्द पक्षासाठी प्रमाण असला तरी अजितदादा घेतील तोच निर्णय अंतिमत: मान्य करणारा एक मोठा गट पक्षात कार्यरत आहे. हा गट पक्षप्रमुख म्हणून शरद पवारांना मानत असला तरी या गटाची संपूर्ण श्रध्दा ही अजित पवारांवरच आहे. त्यामुळे अजितदादांनी पक्षहित बाजूला ठेवून स्वहितासाठी जर काही निर्णय घेतला तर हा गट श्रध्देपोटी अजितदादांच्याच सोबत राहणारा आहे.
पक्षप्रमुख शरद पवार असले तरी पक्षात अजितदादांचे नेतृत्व स्वीकारणारा हा गट आहे. या गटाला पक्ष प्रमुख म्हणून शरद पवारही आत्तापर्यंत हात लावू शकले नाहीत. त्यामुळे या गटाच्या बळावर अजित पवार कोणताही राजकीय निर्णय घेऊ शकतात, असे खुद्द राष्ट्रवादीवाल्यांनाच वाटते. म्हणून अजितदादांचा भरवसा नाही, अशी शंका आता राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ अजितदादा म्हणतील तसे…
राष्ट्रवादीमध्ये अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते आहेत. ते पक्षप्रमुख शरद पवार यांचे नेतृत्व शिरसावंद्य मानतात. अशा नेत्यांची पक्षावर छाप आहे. त्यांच्या तुलनेत अजितदादा हे कनिष्ठ असले तरी पक्षांतर्गत त्यांनी स्वत:ची स्वतंत्र ताकद निर्माण केली आहे. अजितदादा आणि त्यांची ही ताकद पक्षातील श्रेष्ठींना आणि ज्येष्ठांना पदापुरता मान आणि कार्यक्रमापुरताच सन्मान देते. मात्र ‘अजितदादा म्हणतील तसे’ हेच या ताकदीचे धोरण आहे आणि हेच अजितदादांच्या वेगळा विचार करण्याच्या क्षमतेचे कारण असल्याचे राष्ट्रवादीवाल्यांकडून सांगितले जात आहे.
○ सिनिअर साईडला, ज्युनिअर राईडला
राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांनंतर ज्यांचे स्थान होते; अशा अनेक नेत्यांच्या वाटेत काटे पेरण्याचे काम पक्षातील दुसर्या गटाने केले. त्यांच्या भागातील अन्य नेत्यांना ताकद देऊन दुसर्या गटाने त्यांना पक्षाच्याच विरोधात सोईस्कर पध्दतीने उभे केले. म्हणून असे नेते पक्षातून बाहेर गेले. जे उरले आहेत त्यांनी एक तर दुसर्या गटाशी जुळवून घेतले किंवा दुसर्या गटापासून सुरक्षित अंतरावर थांबवणे पसंत केले. परिणामी आपोआपच दुसर्या गटाची ताकद वाढली. म्हणून पक्षातील इतरांचा या गटावर भरवसा नाही, अशी वस्तुस्थिती राष्ट्रवादीवालेच मांडत आहेत.
○ गरज पडल्यास भाजपला मदत
राष्ट्रवादीने पक्ष म्हणून महाविकास आघाडीसोबत राहण्याचे धोरण घेतलेले असतानाच यापूर्वी अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करत पहाटेच्या शपथविधीद्वारे सरकार स्थापन केले होते. त्यानंतरही अनेकदा अजितदादांनी अवलंबलेल्या भाजपानुकुल धोरणाने त्यांचे भाजपप्रेम दाखवून दिले आहे. त्यामुळे सत्तासंघर्षात सद्यस्थितीत महाविकास आघाडी भाजपच्या मदतीला जाणार नाही. मात्र गरज पडली तर अजितदादा हे भाजपच्या मदतीला धावू शकतात, असेच राष्ट्रवादीवाल्यांना वाटत आहे. म्हणून अजितदादांवर भरवसा नाही, असे राष्ट्रवादीवालेच सांगत आहेत.
● खुद्द पवारांनी केले सुतोवाच
पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपला सत्तासंघर्षात कसलीही मदत करणार नाही. मात्र राष्ट्रवादीमधील काही नेत्यांना सत्ताधारी भाजपने अडचणीत पकडले आहे. त्यामुळे असे कोणी भाजपमध्ये जाण्याचा विचार करू शकतात, असे खुद्द पवारांनीच सांगितले आहे. साहजिकच स्वत: अजित पवारांच्या मागे ईडीपासून एसीबीपर्यंतच्या यंत्रणा लागल्या आहेत. अजितदादा समर्थकांच्याही मागे चौकशी यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. यातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी राष्ट्रवादीमधील दुसरा गट वेगळा विचार करू शकतो, अशी शंका आता राष्ट्रवादीवाले व्यक्त करत आहेत.