● कोल्ड स्टोअरेज फुल्ल; व्यापाऱ्यांची नफेखोरी; लाखोंचा माल ‘राम भरोसे’
सोलापूर : यंदा बेदाण्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं आहे. मात्र, व्यापाऱ्यांच्या नफेखोरी वृत्तीने कोट्यवधी रुपयांचा बेदाणा सध्या उघड्यावर ठेवायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. Currants are abundant! There is no price, where to keep? Cold Storage Traders Profiteers Grape Growers Farmers
सोलापूर जिल्ह्यात ३९ कोल्ड स्टोरेज असून यामध्ये ६४ हजार ५४७ मेट्रिक टन साठवून केली जावू शकते. परंतु यंदा उत्पादनच ८४ हजार मे.टनावर गेल्या मुळे उर्वरित बेदाणा ठेवायचा कुठे ? हा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे. यंदा द्राक्षाचे भाव कोसळल्याने शेतकरी बेदाण्याकडे वळला आणि इथेच त्याला मोठा फटका बसला आहे. जो बेदाणा 200 ते 250 रुपयाने विकला जायचा, व्यापाऱ्याच्या नफेखोर वृत्तीने त्याला 120 रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे.विकायला भाव नाही, ठेवायला जागा नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात सुमारे २० हजार हेक्टर क्षेत्रात द्राक्ष लागवड झाली असून त्यापैकी बऱ्याच क्षेत्रावरील द्राक्ष ही खुल्या मार्केट मध्ये विकली जातात तर उर्वरित द्राक्षेचा बेदाणा तयार केला जातो. सततची गारपीट, रोगराई व औषधाच्या वाढलेल्या भरमसाठ किंमतीमुळे द्राक्ष शेती तोट्यात चालली आहे.
यंदा एका बाजूला मालाची विक्री होत नसल्याने कोल्ड स्टोअरेजमधील जागा भरत आहे. कोल्ड स्टोअरेजमध्ये जागा नसताना नव्याने तयार होणारा माल ठेवायचा कुठे? असा प्रश्न पडला आहे. त्यातच रोज गाड्या भरुन बेदाणा जिल्ह्यातील विविध कोल्ड स्टोरेज मध्ये दाखल होत आहे. यात प्रामुख्याने कर्नाटकातील बेदाणा जास्त असून सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात बेदाणा पंढरपूरमध्ये येत आहे. पंढरपुरात तयार होणाऱ्या बेदाण्यालाच इथल्या कोल्ड स्टोअरेजची क्षमता कमी पडत असल्याने येथील शेतकरी सांगली आणि तासगाव भागातील कोल्ड स्टोअरेजला बेदाणा पाठवत असतो. त्यातच यंदा राज्यात सर्वच ठिकाणी बेदाण्याचे दर जवळपास 100 रुपयाने घसरले. दर कोसळल्याने शेतकऱ्यांनी स्टोअरेजमध्ये ठेवलेला बेदाणा विकालाच नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ भाव घसरल्याने बेदाणे कोल्ड स्टोअरेजमध्ये पडून
पंढरपूर परिसरात जवळपास 40 ते 45 हजार मेट्रिक टन बेदाणा होत असतो. पंढरपूर परिसरात कासेगाव, करकंब येथे 12 कोल्ड स्टोअरेज आहेत, पण मालाची विक्रीच होत नसल्याने नवीन बेदाण्याला स्टोअरेजमध्ये ठेवण्यास जागाच मिळत नाही. मार्च आणि एप्रिलमध्ये स्टोअरेजमधील निम्म्यापेक्षा जास्त बेदाण्याची विक्री झाल्याने नवीन बेदाणा ठेवायला जागा होते. पण यंदा भाव पाडल्याने 10 टक्के देखील विक्री झाली नसल्याचा आक्षेप द्राक्ष बागायतदारांनी केला आहे. अजूनही 40 टक्के बेदाणा शेडवर प्रोसेसिंगमध्ये आहे. तयार मालालाच जागा नसताना हा नवा तयार होत असलेला माल कुठे न्यायाचा? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
○ बेदाण्यासाठी शेतकऱ्यांना किती खर्च येतो ?
एक किलो बेदाणा बनवण्यासाठी शेतकऱ्याला 90 ते 95 रुपये खर्च येतो. यानंतर तो स्टोरेजपर्यंत नेणे आणि स्टोरेजमध्ये ठेवण्यासाठी दर महिन्याला 550 रुपये खर्च येतो. याशिवाय संपूर्ण मालाचा इन्शुरन्स, 18 टक्के जीएसटी, हमाली आणि इतर खर्चही शेतकऱ्याला भरावा लागतो. त्यामुळे सध्या मिळत असणाऱ्या 100 ते 120 रुपये भावात हे सर्व भागवणे शेतकऱ्यांसाठी अवघड बनले आहे.
बेदाण्याला चांगला भाव मिळेल या आशेत शेतकरी आहे, त्यामुळे स्टोअरेजमधून माल बाहेर काढण्यास शेतकरी तयार नाही. चांगला भाव मिळून शेतकरी आपला माल बाहेर काढतील आणि स्टोअरेजमध्ये जागा होईल, या आशेत इतर शेतकरी आहेत.
○ …. तरच खर्च निघणे शक्य
व्यापाऱ्यांची नफेखोरीची भूमिका, कोल्ड स्टोरेजची कमी क्षमता आणि उदंड झालेले उत्पादन, यामुळे शेतकऱ्याचा कोट्यवधींचा बेदाणा सध्या राम भरोसे पडून आहे. राज्य शासनाने शेतीचे धोरण आखताना जागोजागी कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था, व्यापाऱ्यांच्या नफेखोरीवर वेसण घातली तरच बेदाण्याला केलेला खर्च काढणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे. आधीच अवकाळीने संकटात असलेला शेतकरी लाखो रुपये खर्च करुन तयार केलेला बेदाणा उघड्यावर ठेवून चांगला भाव कधी मिळेल आणि विक्री कधी होईल, याच प्रतिक्षेत आहे.