सोलापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतील नेत्यांच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावेळी ‘राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत की नाही हे मला माहिती नाही.’ त्यानंतर त्यांना अजित पवारांबाबत विचारले असता ‘ते सीमारेषेवर आहेत’, असे उत्तर राणेंनी दिले. राणेंच्या उत्तरानंतर अजित पवार भाजपात जाणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबतचे भाष्य केले. ते म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा परत घ्यावा, म्हणून त्यांचेच कार्यकर्ते डोके आपटत आहेत. ते जे डोकं आपटत आहेत, तेच काही दिवसांपूर्वी भाजपच्या दारात प्रवेशासाठी उभे होते. तेच तिथं रडताना मी पाहिले. मी त्याला ढोंग वगैरे काही म्हणणार नाही. पण पवार यांनी घेतलेला जो निर्णय आहे, तो त्यांचा वैयक्तीक निर्णय आहे आणि पक्षासंबंधी घेतलेला आहे.
जयंत पाटील भाजपच्या वाटेवर आहेत, या प्रश्नावर मात्र राणेंनी सावध भूमिका घेत मला माहिती नाही. मी अनेकजण असं बोललो, जयंत पाटील हे नाव मी घेतलेले नाही, असे स्पष्ट केले. तेवढ्यात अजितदादा आहेत का, असा जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा नारायण राणे यांनी सीमारेषेवर आहेत, असे स्पष्टपणे सांगितले.
○ हे भिकारमंडळी, कामधंदा नाही….
खासदार संजय राऊत जे बोलतात ते खरं नसतं. त्यामुळे त्यांच्याबाबत मला प्रश्न विचारू नये. उद्धव ठाकरे सात तारखेला बारसूला जाणार आहेत, तर मीही बारसूला जाणार आहे. मी प्रकल्पाला समर्थन देण्यासाठी कोकणात जाणार आहे. मला तो रिफायनरी प्रकल्प कोकणात हवा आहे. दीड लाख कोटींची त्या प्रकल्पावर गुंतवणूक होणार असून त्या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळणार आहे. उद्धव ठाकरेंचं काय जातं, सगळंच नको म्हणतात. विनायक राऊत वगैरे भिकारमंडळी आहेत. सध्या त्यांना कामधंदा नाही, त्यामुळे सगळे जात आहेत, असा टोलाही राणेंनी ठाकरे-राऊतांना लगावला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 मंगळवेढ्यासाठी ज्वारी क्लस्टर व टेक्निकल सेंटर मंजूर करणार – केंद्रीय मंत्री नारायण राणे
मंगळवेढा येथील कृषी उद्योजकता मेळाव्यात दिले आश्वासन
सोलापूर – मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी उत्पादकांना चांगला बाजार भाव मिळावा व बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी ज्वारी प्रक्रिया क्लस्टर मंजूर केले जाईल तसेच उद्योग व्यवसायात आधुनिकता यावी यासाठी टेक्निकल सेंटर मंजूर केले जाईल असे आश्वासन केंद्रीय सूक्ष्म लघु मंत्री नारायण राणे यांनी मंगळवेढा येथे दिले.
मंगळवेढा तालुक्यात अन्न प्रक्रिया उद्योग निर्मितीसाठी चालना मिळावी म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ, इंग्लिश स्कूल येथे केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कृषी उद्योजकता मेळावा संपन्न झाला. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. शिवाजीराव सावंत होते यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष ॲड सुजित कदम,सचिव प्रियदर्शिनी कदम महाडिक,माजी अध्यक्ष डॉ सुभाष कदम,डॉ मीनाक्षी कदम, तेजस्विनी कदम,प्र. कुलगुरू डॉ. राजेश गादेवार,माजी मंत्री प्रा लक्ष्मणराव ढोबळे, भीमाचे कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक धनश्री परिवाराचे प्रा शिवाजीराव काळुंगे माजी सभापती सोमनाथ आवताडे प्रणव परिचारक, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. राणे पुढे म्हणाले मंगळवेढा सारख्या दुष्काळी भागात उद्योजक निर्माण व्हावेत या भागातील बेरोजगार युवक महिला यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे रोजगारनिर्मिती व्हावी, आर्थिक सुबत्तेत वाढ व्हावी यासाठी प्रियदर्शनी कदम महाडिक यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती देशाबद्दल असलेले प्रेम, निष्ठा यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत दहाव्या क्रमांकावर असलेला भारत देश आज पाचव्या क्रमांकावर आला असून 2030 मध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे. या भागात 44 उसाचे कारखाने असून देखील केवळ साखर हे उत्पादन केल्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावा असा भाव मिळत नाही. त्यामुळे कारखानदारानी इतर प्रक्रिया उद्योग राबवून शेतकऱ्यांना जास्त भाव कसा मिळेल याकडे पाहिले पाहिजे.
मंत्री राणे म्हणाले, मंगळवेढा हा भाग गरीब नसून या भागातील उद्योजकता वाढीस लागली पाहिजे या भागातील युवकांसाठी, महिलांसाठी हजार उद्योगधंदे असून उद्योग वाढीसाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. कृषी उद्योजकता मेळावा भरून या भागातील उद्योजकता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नाला आपण सर्वतोपरी मदत करणार आहे.
ज्वारी क्लस्टर व टेक्निकल सेंटर देणार असून तातडीने त्याच्या कागदपत्रांची पूर्तता करावी. दिलेला शब्द आपण पाळणार असून ज्यांना उद्योग व्यवसाय करायचे आहेत त्यांनी अन्य उद्योगांची देखील मागणी करावी. जनतेच्या अडचणी सोडविणे व त्यांना सर्वतोपरी मदत करणे हे आपले काम असल्याचे सांगत त्यांनी उद्योग व्यवसाय वाढीसाठी मंगळवेढ्याला भरीव मदत करणार असल्याचे सांगितले.
यावेळी प्रास्ताविकात प्रियदर्शनी कदम यांनी मंगळवेढ्यात कृषी उद्योजकता मेळावा घेण्यामागची भूमिका स्पष्ट करीत तालुक्यात उत्पादित होत असलेल्या मालाला चांगला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी व इतर उत्पादक अडचणीत येत असल्याचे सांगून मंगळवेढा भागात अन्नप्रक्रिया उद्योगास असलेली पोषक परिस्थिती मांडत या भागातील उद्योजकांना केंद्र सरकारने मदत करावी व या भागासाठी क्लस्टर देण्याची मागणी यावेळी केली. या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते.