मंगळवेढा : योग्य कागदपत्रे व जागा उपलब्ध केल्यास मंगळवेढ्यातील समूह अन्नप्रक्रिया उद्योगाला मंजुरी देऊ, असे आश्वासन केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मंगळवेढ्यात बोलताना केले. Allow group food processing industry in Mangalvedha; Industry Minister Narayan Rane’s assurance
Solapur
शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दलित मित्र स्वर्गीय कदम गुरुजी यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित मंगळवेढा महोत्सवात कृषी उद्योजक मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव सावंत होते. मंचावर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे , प्र. कुलगुरू राजेश गादेवार, शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढ्याचे अध्यक्ष ॲड .सुजित कदम उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम ,डॉ. मीनाताई कदम ,सचिवा प्रियदर्शनी कदम- महाडिक पवन महाडिक, प्रा. तेजस्विनी कदम, दिलीप कोल्हे, दीपक चंदनशिवे, प्रणव परिचारक, शिवाजीराव काळुंगे, सोमनाथ आवताडे, शशिकांत चव्हाण विक्रम सिंह घाडगे उपस्थित होते.
मंत्री नारायण राणे म्हणाले , की देशाच्या प्रगतीसाठी नवनवीन उद्योग निर्माण होणे गरजेचे आहे. प्रियदर्शनी कदम महाडिक यांनी समूह अन्न प्रक्रिया उद्योग मंगळवेढा सारख्या ठिकाणी तयार करण्याचे मानस व्यक्त केला आहे. योग्य जागा व कागदपत्रे सादर केल्यास त्यास मंजुरी देऊ तसेच व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यास देखील परवानगी देण्यात येईल. कदम यांनी हे उद्योग फक्त स्वतःच्या फायद्यासाठी निर्माण करीत नाहीत तर ग्रामीण भागातील तरुण-तरुणी महिला यांना उद्योजक बनवण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता नोकऱ्या निर्माण करणारे उद्योग निर्माण करणे गरजेचे आहे. देशात उद्योग निर्माण झाल्यास देशातील दरडोई उत्पन्न वाढेल. अमेरिका जपान चीन या राष्ट्रांचे दरडोई उत्पन्न मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामानाने भारतातील दरडोई उत्पन्न फारच कमी आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
देशाला महासत्ता बनवण्यासाठी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारत हे अभियान पूर्ण करायचे असेल तर प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. देशातील दरडोई उत्पन्न वाढल्यास देश महासत्ता बनेल लोकांचे जीवनमान उंचावेल. सोलापूर जिल्ह्यामध्ये 44 साखर कारखाने आहेत, उसापासून व साखरेपासून निर्माण होणारे अनेक उत्पादने आपण तयार करू शकतो. सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी हे प्रमुख पीक आहे. या पिकावर योग्य प्रक्रिया केल्यास अनेक उत्पादने तयार होऊ शकतात, यासाठी उद्योजकांना प्रशिक्षणाबरोबरच यंत्रसामग्री त्यांना लागणारे कर्ज व कर्जातून सबसिडी उद्योग मंत्रालयाकडून होत मिळत असते. त्याचा फायदा नव उद्योजकांनी घ्यावा. देशामध्ये एक लाख कोटी रुपयाचे वाटप उद्योजकासाठी सरकारकडून केले आहे. आपण ज्या भागांमध्ये राहतो त्या भागाला मागासलेपण आहे असे म्हणत न बसता येतील तरुणांनी मोठी महत्त्वकांक्षा बाळगावी, मी उद्योगाचा मालक बनेल हे स्वप्न उराशी बाळगले पाहिजे, आपली मानसिकता प्रगती करण्याची असली पाहिजे तरच देशातील दरडोई उत्पन्न वाढेल.
पंतप्रधानांनी 31 योजना आपल्यासाठी दिले आहेत. स्टार्ट अप इंडिया ही योजना नऊ उद्योजकासाठी दिली आहे. महाराष्ट्रातील उद्योजकांनी पुढे यावे उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून कर्ज प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर बनावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रास्ताविकामध्ये प्रियदर्शनी कदम म्हणाल्या, अन्नप्रक्रिया उद्योगाचा जगभरात विस्तारीकरण झाले आहे. भारतात देखील विस्तारित स्वरूपात हे उद्योग निर्माण होणे गरजेचे आहे. कर्नाटकाच्या सीमेवर मंगळवेढा असल्याने याचा फायदा सर्वांना होईल.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना शिवाजीराव सावंत म्हणाले, मंगळवेढा भागातील उद्योजक निर्माण होण्यासाठी राणे साहेबांनी जे आवाहन केलेले आहे त्याला नवउद्योजकाने प्रतिसाद द्यावा सुशिक्षित बेरोजगारांनी उद्योगासाठी अर्ज करावेत. प्र कुलगुरू राजेश गादेवार यांनी आपल्या मनोगतात देशातील उद्योग वाढीसाठी व्यवसाय प्रशिक्षणाचा फायदा नव उद्योजकांनी घ्यावा असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा संस्थेच्या सर्व संचालक सर्व शाखेतील प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यासह मंगळवेढा शहर व तालुक्यातील बचत गटातील महिलांचा शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.