सत्ता आणि संपत्तीवरून घराघरामध्ये वाद उत्पन्न होणे हे काही नवीन नाही. अगदी राजघराण्यातील राजेही त्यातून सुटले नाहीत. सत्ता आणि संपत्तीचा हव्यास अगदी पुरातन कालापासून चालत आला आहे. तेव्हा आजची स्थिती त्याला कशी अपवाद असू शकते. Civil strife… Who is Sharad Pawar’s heir Ajit Pawar Supriya Sule Political Blog NCP
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अध्यक्षपदावरून जो वाद पेटला आहे, तो सत्ता संपत्तीचाच आहे, यात शंका नाही. राज्याच्या समाजकारणात आणि राजकारणात गेली सहा दशके ज्यांनी बारामतीचा लौकिक निर्माण केला, शेकडो नेते तयार करून त्यांना राजवैभव प्राप्त करून दिले असे ते शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांनी स्थापना केली. राज्यात या पक्षाचे मूळ घट्ट धरून आहे. राज्यात ज्या अनेक सहकारी संस्था आहेत, त्यावर पवार व त्यांच्या शिष्यांचीच पकड आहे. अधून मधून राज्याची सत्ता मिळत असते.
बारामतीत तर औद्योगिक आणि कृषीचे मोठे वैभव आहे. पवारांचे वारसदार कोण? हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून निरूत्तर आहे पण त्याचे उत्तर देण्याची वेळ आज येवून ठेपलीय. अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय पवारांनी जाहीर केल्यानंतर पक्षात वादळ उठले. नुसते वादळ नाही तर यादवीच म्हणा की.
अध्यक्षपद सोडू नका म्हणून अनेक नेत्यांनी पवारांचे कार्यक्रमाच्या ठिकाणीच पाय धरले तर काहींनी ढसाढसा रडून आपल्या नेत्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. कार्यकर्ते तर पवारांच्या गाडीसमोर आडवे झाले. नेत्याविषयी हा आदरभाव असू शकतो. संपूर्ण चित्र पवारांच्या भोवती एकवटलेले असताना मात्र पवारांचे पुतणे असलेले अजितदादा एकीकडे होते. अजितदादांनी पद सोडण्याच्या निर्णयाचे समर्थन करणे म्हणजे त्यांच्या मनात जे आहे ते घडते आहे, असा त्याचा अर्थ निघतो. त्यात गैर काय ? राष्ट्रवादीची सध्याची स्थिती पाहिल्यानंतर पक्षावर अजितदादांचेच वर्चस्व आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे ह्या स्थानिक पातळीवरच्या राजकारणात फारशा सक्रीय नाहीत. सुप्रिया ह्या अजितदादांपेक्षा लहान आहेत. पक्षात उगीच हस्तक्षेप नको वा नसत्या वादाला आमंत्रण नको म्हणून कदाचित त्या लांब राहिल्या असतील. अशीच त्यांची भूमिका असेल तर ती व्यवहाराला धरून आहे, असे म्हणावे लागेल.
आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापले. सुप्रियांना त्यांनी बोलू दिले नाही. या प्रसंगात पवारांच्या पत्नी प्रतिभाकाकींची भूमिका मात्र एकदम कडक दिसून आली. साहेब आता माघार घ्यायचीच नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. एकंदरीत हे चित्र पाहात पवार फॅमिलीत गृहकलह आहे हे स्पष्टपणे जाणवले. कारण पवारांचा उत्तराधिकारी अजितदादांना व्हायचे आहे तर घराण्याची राजकीय गादी अजितदादांना न देता आपली कन्या सुप्रिया यांना देण्याचा पवारांचा मानस असावा.
बुधवारी पक्षात बरीच खलबते झाली. पक्षातील एका गटाने सुप्रिया यांचे नाव लावून धरलेले असावे. कारण कार्याध्यक्ष म्हणून त्यांचे नाव पुढे आले आहे. मात्र अजितदादांना हा फार्म्युला मान्य आहे काय? हे येत्या काळात दिसेलच. संपूर्ण पक्ष अजितदादांच्या हाती जावू नये म्हणून एक गट गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर जे जे नेते पवारांच्या सोबत गेले, त्यांना अजितदादा नको आहेत. कारण त्यांचा स्वभाव त्यांना माहीत आहे. अजितदादांच्या नेचरमुळे अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला तर काहीजण सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. तरूण आमदार मात्र अजितदादांच्या सोबत आहेत.
गेल्या आठवड्यात राजकीय क्षेत्रात एक वावटळ उठली होती. अजितदादा हे ४० आमदार घेवून भाजपच्या आश्रयाला जाणार, अशी ती बातमी होती. अजितदादांनी त्याचा इन्कार केला असला तरी पडद्याआड राहून राजकारणात अशी कारस्थाने होतच असतात. अजितदादांच्या कारस्थानांवर पवारांची करडी नजर नाही, असे होवूच शकणार नाही.
अजितदादांच्या हाती पक्ष दिला तर काय होईल? ही चिंता पवारांना लागून असावी. त्यापेक्षा कन्याला गादी देवून टाकली तर पक्ष टिकेल, असे पवारांना मनोमन वाटत असावे. मुळात शिवसेनेशी आघाडी केली हे अजितदादांना मान्य नाही. पवार हे आघाडीतून बाहेर पडायला तयार नाहीत. आघाडीत राहून उद्धव ठाकरे हे वरचढ होवू पहात आहेत. आघाडीत चर्चेची बैठक जेव्हा होते, तेव्हा पवारांच्या शेजारी -ठाकरेंना मान असतो. वज्रमूठ सभेत ठाकरेंना सिंहासनासारखी खुर्ची असते. ह्या साऱ्या बाबी अजितदादांना खुपत आहेत, यात शंकाच नाही.
एकतर आघाडीतून पवारांनी बाहेर पडावे किंवा पक्ष आपल्या ताब्यात द्यावा, असा अजितदादांचा प्लॅन दिसतो. घराण्यातील गादी देण्या-घेण्याच्या कारणावरून ठाकरे फॅमिलीतही असाच गृहकलह झाला होता. पुतण्या राजकडे क्वालिटी असताना शिवसेनाप्रमुखांना पुत्रप्रेम जवळचे वाटले तसे आता पवारांना कन्याप्रेम जवळचे वाटत असणार. सृष्टीचा हा खेळ आहे.
✍️ ✍️ ✍️
● दैनिक सुराज्य संपादकीय अग्रलेख