मोहोळ : मागील दोन वर्षापासून चुलत्या कडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पुतण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मोहोळ तालुक्यातील गलंदवाडी येथे घडली. Cousin’s trouble, youth’s suicide; Type Galandwadi in Mohol Taluk
मागील दोन वर्षापासून मला व माझ्या दोन्ही मुलांना विनाकारण रस्त्यामध्ये अडवून माझाच भाऊ विनकर बिरुदेव ढेरे हा शिवीगाळ दमदाटी करून मारहाण करण्याची धमकी देत मानसिक व शारीरिक त्रास देत होता. त्याच्याच त्रासाला कंटाळून माझा मुलगा महेश संजय ढेरे याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद ९ मे रोजी मोहोळ पोलीस ठाण्यात मृत मुलाच्या वडिलांनी दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दिनकर ढेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय बिरुदेव ढेरे रा. गलंदवाडी ता.मोहोळ हे राहुल व महेश या दोन्ही मुलांसमवेत राहत असून त्यांनी मौजे बोपले येथे दाईंगडे यांची शेती बटईने करण्यासाठी घेतलेली आहे. मागील दोन वर्षांपूर्वी दिनकर ढेरे याचा मुलगा नवनाथ ढेरे याला त्याच्या शेतातील मोटारीच्या बोर्डला शॉक लागून मयत झाला होता.
त्यामध्ये त्याने राहुल याचे नाव घेतले होते त्या वेळेपासून दोघा भावांमधील बोलणे बंद झाले होते व दिनकर ढेरे हा फिर्यादीला व त्याच्या दोन्ही मुलांना मानसिक व शारीरिक त्रास देत होता.
शेतात कामाला गेल्यानंतर मारहाण करण्यासाठी कोयता घेऊन अंगावर धावून येत होता. फिर्यादीच्या भावाच्या जाचाला कंटाळून त्यांचा मुलगा राहुल हा गेल्या आठ महिन्यापासून गाव सोडून बाहेर गेला होता त्याला तीन मे रोजी मोहोळ पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून दिनकर ढेरे हा वेळोवेळी फिर्यादीच्या समोर येऊन तुमची मस्ती जिरवली की नाही? तुम्ही कसे गावांमध्ये राहता? आता तुम्हाला पण सोडणार नाही असे म्हणत होता.
महेश यांस शेताचे रस्त्यामध्ये एकट्याला गाठून दिनकर ढेरे याने दमदाटी करून तु परत शेतामध्ये दिसला तर मी तुझे काहीतरी बरे वाईट करेन, अशी धमकी दिली होती. त्या त्रासाला कंटाळून मुलगा महेश याने ९ मे रोजी पहाटे आत्महत्या केली. याप्रकरणी दिनकर बिरूदेव ढेरे (रा. गलंदवाडी ता. मोहोळ ) याच्यावर संजय ढेरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत.
दरम्यान मृत महेश यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळली असून त्याच्यामध्ये त्याने दिनकर बिरुदेव ढेरे व मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव घातले असून त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. ती चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. अशी माहिती नातेवाईकांनी पत्रकाराना दिली.
सदर मृताच्या खिशामध्ये आढळलेल्या चिट्टीबाबत सखोल तपास करून पूढील कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगितले.