सोलापूर/ अजित उंब्रजकर : सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी लढण्यास इच्छुक असल्याचे यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी सांगत काँग्रेसला चिमटा काढला होता. Congress determined to contest Solapur Pune Lok Sabha; Sharad Pawar Sushil Kumar Shinde continues to try to get rid of NCP आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दौऱ्यात सोलापूर लोकसभा राष्ट्रवादीने लढवावी का याबाबत चर्चा झाली दुसरीकडे नाना पटोले यांनी सोलापूर लोकसभा सुशीलकुमार शिंदे यांनी लढवावी, असे सांगत हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहील असे संकेत दिले आहेत. एकीकडे काँग्रेस सोलापूर लोकसभेवर ठाम असताना दुसरीकडे राष्ट्रवादीकडून मात्र वारंवार काँग्रेसला डिवचण्याचे काम होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील अनेक विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला दिल्यावर काँग्रेस आता सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला देणार की स्वतःकडे ठेवणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात काँग्रेस आपला उमेदवार देत होती. मात्र 1999 राष्ट्रवादीची स्थापना शरद पवार यांनी केली. त्यावेळी पवारांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातही अनेक नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे 1999 नंतर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या विधानसभेचे चित्र बदलले. काँग्रेसचे अनेक विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेले.
सद्यस्थितीला काँग्रेसकडे शहर मध्य, दक्षिण आणि अक्कलकोट हे तीनच विधानसभा मतदार संघ आहेत. गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे असलेल्या पंढरपूर मतदार संघ तसेच शहर उत्तर हा मतदारसंघ राष्ट्रवादीने घेतला सध्या दक्षिण हा मतदारसंघ काँग्रेसकडे असला तरी येथून दिलीप माने निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र दिलीप माने यांचा ओढा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे आगामी काळात दक्षिण विधानसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे माळशिरस, माढा, करमाळा, पंढरपूर, मोहोळ आणि बार्शी असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेची जागाही राष्ट्रवादीकडेच आहे.
याशिवाय माढा लोकसभा मतदारसंघ ही राष्ट्रवादीकडेच आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसकडे स्वतः मात्र शेकापबरोबर युती झाल्यामुळे त्यावरचा दावाही काँग्रेसला सोडावा लागला. त्यामुळे एकेकाळी जिल्ह्यावर वर्चस्व असलेली काँग्रेस आता केवळ तीन विधान मतदार संघात उरल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राष्ट्रवादीने एक प्रकारे काँग्रेसचे अनेक मतदारसंघ आपल्याकडे खेचत काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे, हे वास्तव आहे. अशातच आता राष्ट्रवादीकडून सोलापूर लोकसभेच्या जागेवरही दावा करण्यात येत आहे. काँग्रेसने सोलापूर लोकसभा सलग दोन वेळा गमावल्यामुळे राष्ट्रवादी या जागेवर आपला दावा सांगत आहे.
मात्र वास्तविक पाहता सोलापूर लोकसभा हा काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला होता गेल्या दोन निवडणुकांपासून तो त्यावर भाजपने ताबा मिळवला आहे. मात्र काँग्रेसने या दोन्ही मतदारसंघात चार लाखांपेक्षा जास्त मतदान घेतले आहे. या मतदारसंघात भाजपने नवखा उमेदवार दिला तर काँग्रेस पुन्हा एकदा मुसंडी मारू शकते अशी आशा पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांना आहे. मध्यंतरी रोहित पवार यांनी सोलापूर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवू शकतो असे वक्तव्य केल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी कोण रोहित पवार असे सांगत त्यांची खिल्ली उडवली होती.
यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पोस्टरवर चांगलेच रंगले होते. आता नुकत्याच शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर लोकसभेवर दावा केला आहे. सुधीर खरटमल यांच्या रूपाने सोलापूर लोकसभा राष्ट्रवादीने लढवावी, अशी मागणी अनेक नेत्यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे केली आहे. मात्र शरद पवार यांनी आताच याबाबत चर्चा नको नंतर सर्व नेत्यांची बैठक घेऊन निर्णय घेऊ असे सांगून सध्या तरी हा वाद टाळण्याचा प्रकार केला आहे.
दुसरीकडे पंढरपूर दौऱ्यावर आलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीच निवडणूक लढवावी, असे वक्तव्य केले आहे . पटोले यांचे हे वक्तव्य म्हणजे सोलापूर लोकसभा ही काँग्रेसकडेच राहणार असल्याचे संकेत आहे असे मानले जात आहे. असे असताना राष्ट्रवादीकडून वारंवार काँग्रेसला डिवचण्याचे प्रकार होत आहेत एकीकडे अनेक विधानसभा मतदारसंघ अनेक काँग्रेसच्या विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीने ताबा केला आहे अशातच आता सोलापूर लोकसभा मतदारसंघ ही राष्ट्रवादी काबीज करण्याच्या प्रयत्नात आहेत. हा राष्ट्रवादीचा प्रयत्न सोलापुरातील काँग्रेसचे नेते म्हणून पाडणार का याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
○ काँग्रेसमध्ये मोठी संभ्रमात अवस्था
सोलापूर लोकसभा मतदारसंघ राखीव आहे. काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे हे दोनच उमेदवार आहेत. या दोघांव्यतिरिक्त काँग्रेसकडे ताकतवान असा उमेदवार नाही. माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे दोनवेळा जाहीर केले आहे तर दुसरीकडे आमदार प्रणिती शिंदे सध्यातरी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेमध्ये नाही त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांपुढे मोठी संभ्रमात अवस्था निर्माण झाली आहे.
● राष्ट्रवादीकडून सुधीर खरटमल असू शकतात उमेदवार
सोलापूर लोकसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अप्रत्यक्षपणे दावा सांगत आहेत. काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले सुधीर खरटमल हे राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.
● सोलापूरवर दावा सांगून पुणे घ्यायचे ?
शरद पवार यांनी जरी चांगल्या कामाची सुरुवात सोलापूर आणि कोल्हापूर मधून करतो असे सांगितले असले तरी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांचा पुणे जिल्ह्यावरही जिव्हाळा दिसून आला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे द्यावा ही मागणी राष्ट्रवादीने गेल्या निवडणुकी दरम्यानही केली होती. मात्र काँग्रेसने हा मतदारसंघ सोडला नाही. आता सोलापूर मतदारसंघ मागत काँग्रेसवर दबाव टाकायचा आणि ऐनवेळेला सोलापूरच्या बदल्यात पुणे लोकसभा मतदारसंघ घ्यायचा अशी खेळी राष्ट्रवादीची असल्याचे बोलले जात आहे.