अक्कलकोट : अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील तर उपसभापती पदी कृषीतज्ञ अप्पासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली आहे. निवड जाहीर होताच कार्येकर्त्यांनी एकच जल्लोष करीत गुलालचे उधळण करीत फटकाचे आतषबाजी केली. Sidramappa Patil as Chairman of Akkalkot Bazaar Committee; Appasaheb Patil as Deputy Chairman
दरम्यान सभापती पदाकरिता सिद्रामप्पा पाटील यांचा एकमेव अर्ज आला होता. तर उपसभापती पदाकरिता सत्ताधारी गटाचे अप्पासाहेब पाटील व बसवराज माशाळे तर विरोधी गटाचे कार्तिक पाटील या तिघांचे अर्ज आले. यामध्ये सत्ताधारी गटाचे बसवराज माशाळे हे व्यापारी मतदारसंघातून असल्याने या गटाला उपसभापती पदाकरिता निवडणूक लढविता येत नसल्याने सदरचा अर्ज अवैध ठरला. कार्तिक पाटील व आप्पासाहेब पाटील यांच्यामध्ये मतदान होवून यामध्ये अप्पासाहेब पाटील यांना 12 तर कार्तिक पाटील यांना 6 मते मिळाली.
यामध्ये अप्पासाहेब पाटील यांचा विजय झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ए.जी.झालटे यांनी जाहीर केले. यावेळी सहा.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील माने, सिध्देश्वर कुंभार यांनी काम पाहिले.
सत्कारापूर्वी श्री स्वामी समर्थ व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नूतन पदाधिका-यांचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व उपसभापती अप्पासाहेब पाटील यांचा शाल, श्रीफळ, हार, गुच्छ देऊन सत्कार केला. यावेळेस स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना, अक्कलकोट व दुधनी बाजार समितीच्या नूतन संचालक यांचा झाला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या निवडी होताच श्री बसवेश्वर मार्केट यार्डाच्या प्रशासन भवनातून मिरवणुकीने गोदाम येथे सभेत रुपांतर होवून त्या ठिकाणी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.
आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, अक्कलकोट व दुधनी बाजार समिती निवडणुकीची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात झाली. या निवडणुकीच्या माध्यमातून शेतकर्यांनी दिलेले उत्तर आहे. अप्पांच्या नेतृत्वाखाली सहकारात यापुढे देखील कार्यरत राहू. कारखाना असो वा दोन्ही बाजार समितीच्या विकासासाठी कटीबद्द असल्याचे सांगून झालेल्या निवडणुकीबाबत विश्लेषात्मक माहिती आ.कल्याणशेट्टी यांनी सांगितली.
माजी आमदार सिद्रामप्पा पाटील म्हणाले, 85 व्या वर्षी सभापती का झालो याबाबतची माहिती सांगून अक्कलकोट बाजार समिती, साखर कारखाना या अगोदर झालेल्या दुधनी बाजार समिती निवडणुकीबाबतची माहिती व जडणघडण सांगून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. यापुढील काळात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात अक्कलकोट व दुधनी बाजार समिती व कारखाना नावलौकिक मिळावे असे कार्य करु, असे यावेळी पाटील यांनी सांगितले.
साखर कारखान्याचे नूतन अध्यक्ष संजीवकुमार पाटील यांनी झालेल्या निवडणुकीबाबतची माहिती देवून आगामी काळात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासोबत राहून काम करणार असल्याचे सांगून तीनही संस्था प्रगतीपथावर नेवू अशी ग्वाही दिली. यावेळी महेश हिंडोळे व सोपान निकते यांनी कारखाना निवडणुकीबरोबर दोन्ही बाजार समिती निवडणुकीची माहिती राबविलेले उपक्रम याबाबत उत्कृष्ठ विवेचन केले.
○ सभापती पद दुसर्यांदा :
याअगोदर सिद्रामप्पा पाटील हे 27 जानेवारी 1982 ते 26 जानेवारी 1987 या सालात अक्कलकोट बाजार समितीचे सभापती पद पाच वर्षे त्यांच्याकडेच होते. तब्बल 36 वर्षांनी पुनश्च सभापती पदाची संधी मिळाली आहे.1987 चा काही काळ वगळता बाजार समितीवर सिद्रामप्पा पाटील यांची सत्ता होती व आजही ती कायम आहे.
○ 85 वर्षाचे अप्पा आणि जिद्द
आजही सिद्रामप्पा पाटील हे वयाची तमा न बाळगता तालुक्याच्या हितार्थ शेतकर्यांसाठी त्यांची सतत धडपड सुरु असून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 50 वर्षे संचालक, 35 वर्षे जि.प.सदस्य, पंचायत समितीचे सभापती, जि.प.विषय समितीचे सभापती, आमदार, स्वामी समर्थ कारखाना गेल्या 25 वर्षापासून अबाधित वर्चस्व, तालुका खरेदी-विक्री संघ, सहकारी संस्थेवर वर्चस्व कायम राखले आहे.
● पाटील घराण्याला तिसर्यांदा संधी
अक्कलकोट बाजार समितीवर सिद्रामप्पा पाटील यांना दुसर्यांदा तर त्यांचे पुत्र संजीवकुमार पाटील हे देखील बाजार समितीचे 2016 ते 2022 पर्यंत सभापती पदावर कार्यरत होते. वडिल आणि मुलगा यांचे अदलाबदल झालेले आहे. संजीवकुमार पाटील यांनी साखर कारखान्याचे चेअरमन पदाची धुरा हाती घेतली आहे. यापूर्वी दिलीपराव पाटील हे बाजार समितीचे संचालक म्हणून कार्यरत होते.
● अप्पासाहेब पाटील यांना दुसर्यांदा संधी
यापूर्वी आप्पासाहेब पाटील बाजार समिती 2017 ते 2022 पर्यंत उपसभापती पदावर कार्यरत होते. त्यावेळी सभापती हे संजीवकुमार पाटील हे होते. आता सिद्रामप्पा पाटील हे आहेत.
● कार्याचे फलित
सिद्रामप्पा पाटील यांनी साखर कारखाना, बाजार समिती यावर अनेकांना कार्य करण्याची संधी दिली. अनेकांना विविध संस्थेवर पदे मिळवून दिली. चपळगाव भागात साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद याबरोबर बाजार समितीचे पद देखील दिलेले असून शेतकर्यांकरिता जोमाने कार्य करण्याची संधी सिद्रामप्पा पाटील यांनी दिली आहे. हे माझ्या कार्याचे फलित आहे, शेतकर्यांचे आशिर्वाद असल्याचे अप्पासाहेब पाटील यांनी सांगितले.
● बसवेश्वर मार्केट यार्डाचे उद्घाटन
यापूर्वी बाजार समिती ही जुन्या अडत बाजारात होती. सिद्रामप्पा पाटील यांच्या 1982 ते 1987 या काळात बागेहळ्ळी रोडवरील 33 एकर जागेत एकाच ठिकाणी व्यवसाय व प्रक्रिया युनिट मंजूरी मिळविणारे महाराष्ट्रातील त्याकाळात पहिली बाजार समिती ठरली होती. त्यावेळी 4 मे 1984 रोजी त्याकाळचे पाटबंधारे व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते.
या कार्यक्रमात आडत व्यापारी असोसिएशनचे नूतन अध्यक्ष बसवराज घिवारे, उपाध्यक्ष संतोष भंडारे, सचिव मुसा बागवान यांचा तसेच साखर कारखाना, दोनही बाजार समितीच्या नूतन संचालकांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन आणि आभार मल्लिनाथ दुलंगे यांनी मानले.