मोहोळ : अल्पवयीन मुलीचे माझ्यासोबत लग्न लावून दे, तुलाही आणि तुझ्या मुलीलाही मी सांभाळतो आणि सिनेमामध्येही काम देतो, असे म्हणून वकिलाच्या बहिण व भाचीला बळजबरीने घरामध्ये ठेवून वकील आणि त्यांच्या मामेभावाला मारहाण करून पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये चौघांविरुध्द जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Mohol threatens to kill lawyer mama with pistol for marriage
याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेली आहे माहितीनुसार गेवराई येथील वकील असलेले शरद भीमराव ठोंबरे यांच्या बहिणीशी मोहोळ तालुक्यातील विरवडे बुद्रूक येथील सद्दाम रशीद ऊर्फ हुसेन शेख (सध्या रा. तुळजापूर रोड) याचे सोबत मागील एक वर्षापासून कामाच्या निमित्ताने ओळख झाली होती.
मागील सहा महिन्यापूर्वी शेख यांने तुझ्या बहिणीच्या मुलीला पिक्चर मध्ये काम देतो, असे सांगून तिची मुलगी व मुलगा यांना शेख याने स्वतःच्या घरी आणून ठेवले होते. त्यानंतर काही कालावधीनंतर तुझ्या मुलीचे माझ्यासोबत लग्न लावून दे, असे म्हणून तो मुलींच्या आईच्या पाठीमागे लागला होता. परंतु मुलगी अजून लहान होती. त्यामुळे आई त्या गोष्टीस तयार नव्हती. त्यानंतर एक वर्षाच्या काळात त्यांने त्यांना घरामध्ये बंदिस्त केले होते.
बाहेर येण्या-जाण्यास व वावरण्यास मज्जाव केला होता. परंतु मुलीची ८ वीची परीक्षा असल्याने तिने त्या मुलीस गावाकडे पाठवले होते. मुलीची परीक्षा संपल्यानंतर तिला घेऊन येते, म्हणून आई ही गावाकडे परत आली आणि तिने आपल्या भाऊ शरद भीमराव ठोंबरे यास संपूर्ण माहिती सांगितली. ते व्यवसायाने वकील असल्याने त्यांनी संपूर्ण हकिकत ऐकून घेतली. दरम्यान या महिलेला फोनवरून वारंवार सद्दाम रशीद ऊर्फ हुसेन शेख वारंवार धमकी देत होता व शिवीगाळ करून तुला तुझे घरातून घेऊन जाईन माझ्यासोबत आली नाहीस तर तुला व तुझ्या मुलीला जिवे ठार मारीन, अशा प्रकारची धमकी देत होता.
हा सारा प्रकार महिलेने आपला भाऊ शरद ठोंबरे यांना सांगितला. याबाबत महिलेचा वकील भाऊ शरद ठोंबरे यांनी सद्दाम शेख यास फोन लावून तू माझ्या बहिणीला व भाचीला का त्रास देतो असे विचारले असता तुम्ही मला भेटायला सोलापूरला या मी तुम्हाला सर्व काही सांगतो. माझे ऐकून घ्या, त्यानंतर मी त्यांना अजिबात त्रास देणार नाही, असे सद्दामने सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावर विश्वास ठेवून शरद ठोंबरे हे आपला मामेभाऊ विनोद मुंडे हे सोलापूर येथे तुळजापूर रोडवर राहण्यास असल्याने १६ मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर रोडवर असलेल्या सद्दामच्या घरी भेटण्यासाठी आले. त्याठिकाणी सद्दाम पांढरा रंगाच्या वेरणा कारमध्ये आला. त्यावेळी त्याच्यासोबत आणखी एक पांढरा रंगाची झायलो गाडीत इतर तिघेजण अनोळखी इसम सोबत आले होते.
ठोंबरे व त्याचा मामेभाऊ मुंडे यांची भेट झाल्यानंतर शेख याने सांगितले की, आता खूप उशीर झाला आहे, तुम्ही आज रात्री माझ्या घरी मुक्काम करा, उद्या सकाळी घरी जावा असे म्हणून त्यांना सद्दाम यांने आपण थोडे बाहेर जाऊन येऊ, असे सांगितले व कारमध्ये बसवले. त्यांना पुणे रोडवरील एका हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्तीने दारू पाजली. त्यांना परत सोलापुराला आणत असताना वकील ठोंबरे व मुंडे यांनी संधी साधून चालत्या कारमधून उडी टाकून पोलीस ठाणे गाठले.
● संधी साधून कारमधून दोघांनी उडी टाकली..
वकील शरद ठोंबरे व विनोद मुंडे यांना सद्दाम यांने कारमधून सोलापूर मोहोळ दरम्यान सावळेश्वरजवळ असणाऱ्या हॉटेल रॉयल इन या ठिकाणी आणले व बळजबरीने दारू पिण्यास भाग पाडले. नंतर त्यांना शिव्या देऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने ठोंबरे यांचा गळा हाताने जोरात दाबला व सिल्वर रंगाची बंदूक त्यांच्या डोक्याला लावली. तुला आता जिवंत सोडणार नाही, असा दम भरला.
नंतर सद्दाम व त्याच्या साथीदारांनी यांना जबरदस्तीने बंदुकीचा धाक दाखवून कारमध्ये बसवून गाडी परत सोलापूरच्या दिशेने आणली. गाडीचा स्पिड कमी झाल्यानंतर ठोंबरे यांनी चालत्या कारमधून बाहेर उडी टाकली. बाजूलाच पोलीस असल्याने त्यांनी पोलिसांचे संपर्क साधून मोहोळ पोलीस ठाणे गाठले. तर त्यांचा मामेभाऊ मुंढे यास मेन रोडवर कार येताच संधी साधून उडी टाकली आणि जवळ असलेल्या महेश ढाबा या ठिकाणी जाऊन पोलिसाशी संपर्क साधला.