सोलापूर : एका संशयित आरोपीचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलीस निरीक्षकासह सात पोलिसांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी फेटाळून लावला. दरम्यान, पुण्याचे सीआयडीचे पथक या पोलिसांना ताब्यात घेण्यासाठी सोलापुरात येऊन हात हलवत परतले आहे. The pre-arrest bail application of seven policemen including the police inspector was rejected by the court
पोलीस निरीक्षक उदयसिंह श्यामराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार मारुती कोल्हाळ, श्रीरंग तुकाराम खांडेकर, शिवानंद दत्तात्रय भिमदे, अंबादास बालाजी गड्डम, आतिश काकासाहेब पाटील, लक्ष्मण पोमू राठोड अशी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांची नावे आहेत. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या घरफोडीतील आरोपी भीमा रज्जा काळे (वय 42, रा. भांबुरे वस्ती, कुर्डूवाडी, ता. माढा) असून यास जिल्हा कारागृह येथून सपोनि कोल्हाळ यांनी वर्ग करुन ताब्यात घेऊन न्यायालयाकडून त्याची तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करुन घेतली होती.
पोलीस कोठडीत असताना आरोपीस सर्दी, ताप, खोकला व उलट्या होत असल्याने व दोन्ही पायास संसर्ग झाल्यामुळे व त्याचे दोन्ही पाय सुजल्याने त्यास उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता तो मयत आला होता. सदर प्रकरणी श्रीशैल सिद्रामप्पा गजा, पोलीस उपअधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग यांनी विजापूर नाका पोलीस ठाणे येथे आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आले होता. पोलिसांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून सातजणांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यात सरकार पक्षातर्फे अॅड. प्रदीपसिंग राजपूत, अॅड. अल्पना कुलकर्णी यांनी व आरोपींतर्फे अॅड. शशी कुलकर्णी आणि अॅड. एस.ए. बागवान यांनी काम पाहिले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सोलापुरात सीआयडीच्या हातावर ‘तुरी’ देवून पीआयसह सात पोलीस पसार
सोलापूर : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पसार झाला, अशा आशयाच्या बातम्या आपल्याला कधी कधी वाचायला मिळतात पण सोलापुरात एक अफलातून प्रकार घडला आहे. एका पीआयसह सात पोलीस सीआयडीच्या पथकाला गुंगारा देऊन पसार झाल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून हे पथक सोलापुरात तळ ठोकून आहे. या पथकाने सारे शहर पिंजून काढले. जिल्ह्यात शोध मोहीमही सुरू आहे. हे पोलीस सीआयडीच्या हाती लागले नाहीत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) पथक डेथ इन कस्टडीच्या प्रकरणात आपल्याला अटक करण्यासाठी आल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षकासह ७ पोलीस गुरुवारी मध्यरात्री ड्यूटी सोडून पसार झाले आहेत. सीआयडीच्या पथकाने त्यांची शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे. सीआयडीचे पथक संबंधितांचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक गिरीष दिघावकर यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सप्टेंबर २०२१ मध्ये घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी भीमा रज्जा काळे (४२, रा. भांबुरे वस्ती, पारधी वस्ती, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) याला अटक केल्यानंतर त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. पोलिसांनी त्याला मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला.
उपचारासाठी आरोपीला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा दि. ३ ऑक्टोबर २०२१ रोजी मृत्यू झाला. विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या कोठडीत त्याला मारहाण झाला होती. मारहाणीत मृत्यू झाल्याने प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला.
पोलिसांच्या मारहाणीमुळे आणि हलगर्जीपणामुळे आरोपींचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत सीआयडीने त्यावेळी विजापूर नाका पोलीस स्टेशनचे आणि सध्या चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह शामराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार मारुती कोल्हाळ, पोलीस अंमलदार श्रीरंग खांडेकर, पोलीस तुकाराम पोलीस अंमलदार शिवानंद दत्तात्रय भिमदे, पोलीस अंमलदार, अंबादास बालाजी गड्डम, पोलीस अंमलदार अतिश काकासाहेब पाटील आणि पोलीस अंमलदार लक्ष्मण पोमु राठोड यांच्यावर दि. २१ एप्रिल २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता.
त्यावेळी सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक श्रीशैल्य सिद्रामप्पा गजा यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यासंदर्भात सीआयडीने सोलापूरच्या पोलीस आयुक्तांना अहवाल देखील सादर केला होता. सदरील गुन्ह्याचा तपास सीआयडीने पथक करीत होते.
○ मोबाईल बंद करुन गायब झाले
सीआयडीचे पथक पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ आणि इतर ५ पोलीस अंमलदारांच्या अटकेसाठी सोलापूरमध्ये दाखल झाले. त्याबाबतची माहिती संबंधितांना समजल्याने त्यांनी तात्काळ त्यांचे मोबाईल फोन बंद केले आणि ते गायब झाले. सीआयडीच्या पथकाने गायब झालेल्यांचा शोध घेण्यासाठी सोलापुरात तळ ठोकला आहे.