● केंद्र सरकार संसदेत आणणाऱ्या विधेयकाला करणार विरोध
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिला आहे. दिल्लीतील प्रशासकीय सेवांवरील नियंत्रण सुप्रीम कोर्टाने केजरीवाल सरकारकडे सोपवले होते. पण मोदी सरकारने अध्यादेश काढून हा निर्णय पलटवला. आता या अध्यादेश मंजुरीसाठी संसदेत विधेयक मांडले जाणार आहे. यावेळी या अध्यादेशाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस संसदेत मतदान करणार, असे आज जाहीर करण्यात आले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची वाय बी चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. दरम्यान, दिल्लीतल्या प्रशासकीय सेवांचे नियंत्रण केजरीवाल सरकारकडे सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर मोदी सरकारने अध्यादेश काढत हा निर्णय पलटवला. त्या पार्श्वभूमीवर केजरीवाल विविध नेत्यांच्या भेटी घेत आहेत. याआधी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी आज मुंबईत शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी ‘दिल्लीच्या लोकांसोबत मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे. आम्ही दिल्ली प्रशासकीय व्यवस्थेची लढाई सुप्रीम कोर्टात जिंकली. मात्र केंद्राने एक आदेश काढून ती आपल्याकडे वळवली. अशा प्रकारे राज्य सरकारची नामुष्की करणे, ही देशासाठी चांगली परिस्थिती नाही,’ असे केजरीवाल म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर ‘दिल्लीत लोकशाहीवर आघात झाला आहे. राष्ट्रवादी पार्टी आपल्याकडून केजरीवालांना पूर्ण पाठिंबा देईल. तसेच केंद्र सरकार संसदेत आणणाऱ्या विधेयकाला विरोध करेल, असे पवार म्हणाले. अशा प्रकारे सरकारच्या अधिकारावर गदा आणणे चुकीचे आहे. तसेच ही समस्या फक्त दिल्लीची नाहीतर संपूर्ण देशाची झाली आहे,’ असे पवार म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जनता दलाचे नेते नितीश कुमार आले होते. त्यांच्या पाठोपाठ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत देशातील विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपविरोधात एकजूट करुन लढण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्याकडे भेटीकडे देशातील विरोधी पक्षातील नेते नजर ठेऊन होते. आज अरविंद केजरीवाल हे शरद पवार यांची भेट घेणार असल्याने सगळ्यांचे या भेटीत काय निर्णय होते, याकडे लक्ष लागले होते.
केजरीवाल म्हणाले, ” दिल्लीतील जनतेसोबत अन्याय सुरु आहे. २०१५ ते २०२३ कोर्टात ८ वर्षापासून आमचा कोर्टात संघर्ष सुरू आहे. 11 मे ला निकाल लागला आणि मोदी सरकारने 19 मे ला अध्यादेश (ऑर्डीनन्स) आणून सगळा हक्क पुन्हा केंद्रसरकारकडे दिला. हा फक्त दिल्लीच्या लोकांचा लढा नसून हा संपूर्ण संघराज्य व्यवस्थेलाच धक्का आहे”, असं ते म्हणाले. “बिगर भाजपा सरकार एखाद्या राज्यात आलं तर भाजपाचं केंद्र सरकार तीन गोष्टी करतं”, असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर गंभीर आरोप केले.
“ही देशासाठी धोकादायक स्थिती आहे. महाराष्ट्रातली जनता तर यामुळेच पीडित आहे. काही महिन्यांपूर्वी इथे ईडी – सीबीआयकरवी आमदारांना फोडून सरकार पाडण्यात आलं. ही देशासाठी चांगली स्थिती नाही.आम्ही यासाठी देशातल्या सर्व विरोधी पक्षांना या विधेयकाविरोधात आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहोत”, असं अरविंद केजरीवाल यांनी नमूद केलं.