□ उपमुख्यमंत्री फडणवीसांची भाजपच्या संकल्प महाविजय मेळाव्यात ग्वाही
सोलापूर : सोलापूरकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार असून आगामी १८ महिन्यांमध्ये समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करून सोलापूर पाणीटंचाई मुक्त करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर व ग्रामीण जिल्ह्यातर्फे संकल्प महाविजय कार्यकर्ता संमेलन गुरूवारी (ता. २५) हेरिटेज लॉन येथे झाले. यावेळी फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. We will relieve Solapur water shortage in eighteen months; Deputy Chief Minister Devendra Fadnavis’ Testimony BJP Meeting Aviation
व्यासपीठावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. – जयसिध्देश्वर महास्वामी, माजी पालकमंत्री, आमदार विजयकुमार देशमुख, माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, राजेंद्र राऊत, राम सातपुते, समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, जयवंत थोरात, शशिकांत चव्हाण, धैर्यशील मोहिते पाटील, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नरेंद्र काळे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी समांतर जलवाहिनीसाठीची निविदा काढली होती. परंतु गेल्या अडीच वर्षात आघाडी सरकारने या कामाचा सत्यानाश केला. आता सरकार आल्यानंतर पुन्हा या कामाला गती देण्यात येणार असून ६०० कोटींची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. याशिवाय ३९४ कोटी रुपयांचे गॅप फंडिंगहीं देण्यात येणार आहे, अशी घोषणा देखील त्यांनी केली.
देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वैश्विक नेतृत्व लाभले आहे. पण देशाचा विकास पाहून काहींच्या पोटात दुखत आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडीत काढली आहे. त्यामुळे ज्यांची दुकाने बंद होत आहेत, ते आता भाजप आणि मोदी सरकारवर टीका करत आहेत. परंतु भारतातील महाराष्ट्रासह भारतातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशीच राहणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.
□ जिल्हा काँग्रेसमुक्त करण्याचा करा संकल्प
सोलापूर जिल्हा काँग्रेसमुक्त करण्याचा संकल्प प्रत्येक भाजप कार्यकर्त्याने करावा, असे आवाहन माजी मंत्री आ. सुभाष देशमुख यांनी यावेळी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणारे दलाल आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. ही विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असेही आ. देशमुख यावेळी म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● यांचा झाला पक्ष प्रवेश
भाजपच्या संकल्प महाविजय कार्यकर्ता संमेलनावेळी अनेक पक्षातील नेत्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. फडणवीस यांच्या हस्ते उपरणे परिधान करून त्यांना पक्ष प्रवेश देण्यात आला.
भाजप पक्षात प्रवेश केलेल्यांची नावे : माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख रामदास मगर, माजी नगरसेविका अनिता मगर, प्रकाश कोडम, गंगाधर बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रुपेश भोसले, माजी नगरसेवक सुनील खटके, ज्योती खटके, माजी नगरसेवक मंदाकिनी पवार, किरण पवार, काँग्रेसचे जयवंत सलगर, गौतम कसबे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद भवर, रतन क्षीरसागर, गुरुनाथ कावडे, काँग्रेसचे जगदीश व्हंद्राव, राष्ट्रवादी काँग्रेसचे व्यंकटेश पवार, माजी उपमहापौर सुमन मुदलीयार, रेवती मुदलीयार.
भाजप शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी प्रास्ताविक तर संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
¤ पंढरपूरसाठी २७०० कोटी रुपये
अक्कलकोट आणि पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा तयार करून त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल. पंढरपूर तीर्थक्षेत्रासाठी राज्यातील सर्वात मोठा २७०० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात येत असून त्याचे तीन डिझाईन अंतिम टप्प्यात आहेत. सर्वांना विश्वासात घेऊन हे काम करण्यात येणार आहे.
¤ जिल्ह्याला ४१५ कोटींचा निधी
भाजप सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेचा परिणाम म्हणून सोलापूर जिल्ह्यातील ३ लाख १७ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. यातून फळबागा विकसित झाल्या आहेत टेंभू योजनेला चालना दिल्यामुळे ५० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.
आगामी काळात महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना दिवसा १२ तास अखंडित वीज देण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षात शासन १० लाख घरे बांधणार आहे. राज्यात भाजप शिवसेना युतीचे सरकार आल्यापासून सोलापूर जिल्ह्याला तब्बल ४१५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
● गारमेंट व्यवसायाकडे द्यावे लक्ष
सोलापुरातील गारमेंट व्यवसायावर हजारो पुरुष व महिला कामगार अवलंबून आहेत. गणवेशाच्या निर्णयामुळे अनेकांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष द्यावे. तसेच सोलापुरात आयटी सेक्टर उभारणीकडेही लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी केली.
● विमानसेवा : मनासारखे काम होईल
सोलापूरच्या विमानसेवेबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विमानसेवेचा प्रश्न अंतिम टप्प्यात आणलेला आहे. सिध्देश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्याचा मी गांभिर्याने पाठपुरावा करीत आहे. लवकरच हा प्रश्न सोडविला जाईल त्यातून सोलापूरकरांच्या मनासारखेच काम होईल.
● पाणी वितरण व्यवस्थेबाबत आयुक्तांशी बोलतो
सोलापूर शहरातील पिण्याच्या पाण्याच्या वितरणाबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी भाषणांमध्ये महापालिका प्रशासनावर टीका केली. महापालिका प्रशासनातील काही अधिकारी जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने पाणी वितरण व्यवस्थित करत नसल्याचा आरोप आमदार देशमुख यांनी यावेळी केला. यावर पाणी वितरणाबाबत महापालिका आयुक्तांशी मी स्वतः बोलेन असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
● शत प्रतिशत भाजपासाठी करा प्रयत्न
आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये शतप्रतिशत विजय भारतीय जनता पार्टीला मिळावा यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केले. महाविकास आघाडीतील पक्ष कितीही एकत्र आले तरी भाजपला फरक पडणार नाही. जनता भाजपच्याच पाठीशी उभी असल्याचेही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही – मनोगत व्यक्त केले.