पुणे / मुंबई : राज्यातील दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातील दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पाहता येईल. यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. 10 हजार शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. दहावीत 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 92.05 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. 10th Result : State 10th result 93.83 percent; If you want to check the quality… official website
दहावीच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. तर त्याखालोखाल कोल्हापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, अमरावती, लातूर, नाशिक आणि नागपूर विभागाने कामगिरी केली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 98.11 टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी 92.05 टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.
पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती आणि कोकण या नऊ विभागांमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यातून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी बसले होते. त्यात 8 लाख 44 हजार 116 मुले आणि 7 लाख 33 हजार 67 मुलींचा समावेश होता. राज्यभरातील 5 हजार 33 केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. यातील 14 लाख 57 हजार 218 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत.
दहावीचा निकाल आज जाहीर झाला. त्यातच आता गुणांबाबत काही अडचण असल्यास गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-ssc .ac.in) अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणीसाठी 3 ते 11 जून पर्यंत आणि छायाप्रतीसाठी 3 ते 22 जून पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अनेक विद्यार्थ्यांना निकालाबाबत अनेक अडचणी किंवा आक्षेप असल्यास तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणीसाठी, उत्तरपत्रिका प्रत मिळवण्यासाठी, पुनर्मूल्यांकन यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर verification.mh-ssc.ac.in अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज करताना सगळी माहिती, अटी शर्ती आणि सुचना वेबसाईटवर देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेसाठी ऑनलाईनच पैसे भरावे लागणार आहेत. यासाठी आवश्यक शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking) भरता येईल.
मार्च 2023 च्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी सुरुवातीला उत्तरपत्रिकेची झेरॉक्स कॉपी घेणे अनिवार्य आहे. झेरॉक्स कॉपी मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील पाच कार्यालयीन कामाच्या दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या प्रती विषय 300 रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहिल. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल आणि त्या अनुषंगिक येणारे प्रश्न यावर मार्गदर्शन करण्यासाठी मंडळामार्फत समुपदेशक नेमण्यात आले आहेत. ही सुविधा ऑनलाईन निकालाच्या दिवसापासून पुढे आठ दिवस सुरु राहणार असल्याचं शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे.
● दहावी निकाल – कोकण विभागाची बाजी
– कोकण : 98. 11 टक्के
-कोल्हापूर : 96.73 टक्के
– पुणे : 95.64 टक्के
– मुंबई : 93.66 टक्के
– औरंगाबाद : 93.23 टक्के
– अमरावती : 93.22 टक्के
– लातूर : 92.67 टक्के
– नाशिक : 92.22 टक्के
-नागपूर : 92.05 टक्के
□ दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये
* राज्याचा दहावीचा निकाल 93.83 टक्के
* पुनरपरिक्षार्थीचे उत्तीर्णतेचे प्रणाम 60.90 टक्के
* खाजगी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रणाम 74.25
* दिव्यांगाच्या उत्तीर्णतेचे प्रणाम 92.49 टक्के
* राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा 98. 11 टक्के
* एकूण 25 विषयांचा निकाल 100 टक्क्यांपेक्षा जास्त.
* मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 3.82 टक्क्यांनी जास्त.