○ आषाढी एकादशी : मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेनंतर व्हीआयपीला दर्शन नाही
सोलापूर – आषाढी एकादशीला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने खुशखबर दिली आहे. आषाढी एकादशीला पहाटे होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेनंतर कोणत्याही व्हीआयपीला दर्शन दिले जाणार नाही असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. State government’s bold decision regarding VIP passes strongly welcomed by Warkari community Pandharpur Wari Revenue Minister तसेच दर्शन पासवरही मर्यादा आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
विठ्ठल भक्तांसाठी आषाढी एकादशी हा सोहळ्यातील पर्वणीच दिवस असतो. यादिवशी दर्शन मिळावे यासाठी 30-30 तास भाविक दर्शन रांगेत उभारलेले असतात. त्याचवेळी राज्यभरातील आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते व्हीआयपी बनून दर्शन घेण्यासाठी गर्दी करीत असतात. त्यामुळे रांगेतील शेकडो भाविकांना या पवित्र दिवशी दर्शनापासून मुकावे लागते. याबाबत मुख्यमंत्री शिंदे सरकारने एक धाडसी निर्णय घेत आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेनंतर कोणत्याही व्हीआयपीला दर्शनाला सोडले जाणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा निर्णय जाहीर केल्याने आषाढी एकादशीला केवळ दर्शन रांगेतील भाविकांनाच देवाचे दर्शन घेता येणार आहे. याचसोबत आषाढी एकादशीला मानाच्या दिंड्यांचे देण्यात येणाऱ्या दर्शन पासेसशिवाय कोणतेही व्हीआयपी दर्शन पासेस वितरित करू दिले जाणार नसल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले आहे.
यामुळे दर्शन रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना पहाटेची शासकीय महापूजा संपल्यानंतर दिवसभर विठुरायाचे दर्शन पर्वणी काळात घेता येणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाचे वारकरी संप्रदायातून जोरदार स्वागत होत आहे. आषाढी यात्रेला आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना एकादशी दिवशी दर्शन देण्यासाठी झालेला हा निर्णय यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आला आहे.
यामुळे एकादशी दिवशी दिवसभर दर्शनासाठी घुसखोरी करणाऱ्या तथाकथित राजकारण्यांना मात्र चांगलाच चाप बसणार आहे. आषाढी एकादशीला व्हीआयपी बंदीची संपूर्ण व्यवस्था पोलिसांच्या ताब्यात दिली जाणार असल्याने मंदिर प्रशासन देखील यात हस्तक्षेप करू शकणार नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 आषाढी वारी सुरू होण्यापूर्वी रस्ते सुस्थितीत करावेत – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण
सोलापूर : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 29 जून 2023 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत मोठ्या संख्येने वारकरी भाविक येतात. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी वारीपूर्वी वारी मार्गांवरून पालखी तळावर जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करून घ्यावी. आवश्यक ठिकाणी मुरुमीकरण करून घ्यावे. खड्डे भरून घ्यावेत. साईड पट्ट्याची कामे करून घ्यावीत, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिल्या.
मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखीतळ व मार्गावरील
रस्त्यांच्या सुस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधितांना सूचना केल्या. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते, वेळापूर येथील पालखीतळ तसेच पुरंदावडे येथील रिंगण व्यवस्थेची पाहणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत आमदार राहुल कुल, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता संजय माळी, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, कार्यकारी अभियंता अमित निमकर, सुनिता पाटील, नगरपंचायतचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालखी मार्गावरुन पालखी तळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची वारीपूर्वी दुरूस्ती करावी. आवश्यक ठिकाणच्या रस्त्यावर पथदिव्यांची व्यवस्था करावी. तसेच पालखी तळावर मुरूमीकरण, स्वच्छता, मुबलक पाणी पुरवठा, त्याचबरोबर आवश्यक ठिकाणच्या पालखी विसावा व तळाच्या कट्ट्यांची दुरुस्ती करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.
मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले, पालखी मार्गावर व तळांवर उपलब्ध सोयी सुविधांचे सूचना फलक लावावेत. नवीन महामार्गांच्या कामांमुळे काही ठिकाणी पालखी मार्गात बदलाची शक्यता गृहित धरून दर्शनी भागात सूचना फलक लावावेत, अशा सूचनाही सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी केल्या.
● मंत्री चव्हाण यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार समाधान आवताडे, राहुल कुल माजी आमदार प्रशांत परिचारक, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधिक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, अमित निमकर तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.