○ अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा सराफ असोसिएशनचा इशारा
○ आ. विजयकुमार देशमुख यांनी केली कारवाईस्थळाची पाहणी
सोलापूर : महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने काल मंगळवारी शहरातील सराफ बाजार परिसरातील अतिक्रमण हटवल्याच्या निषेधार्थ आज बुधवारी सराफ कट्टा, चाटी गल्ली, मधला मारुती परिसरातील व्यापाऱ्यांनी लाक्षणिक व्यापार बंद केला. Symbolic bandh of traders in protest against encroachment by Solapur Municipal Movement Saraf Association महापालिकेने चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे, असा आरोप करत संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा सराफ असोसिएशनने दिला आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने काल मधला मारुती, सराफ कट्टा फुलबाजार या परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकानाच्या समोर केलेले अतिक्रमण हटविले. याचा रोष येथील व्यापाऱ्यात असून आज महापालिकेच्या कारवाईच्या निषेधार्थ सराफ बाजार, चाटी गल्ली, मधला मारुती परिसरातील व्यापार बंद ठेवण्यात आला.
आज व्यापाऱ्यांनी काल पाडकाम झालेल्या ठिकाणी पुन्हा डागडुजी सुरू केली आहे. महापालिका प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने कारवाई केली. अनाधिकृत शेड पाडताना अधिकृत इमारतीलाही धक्का पोहोचवला आहे, असा आरोप सराफ व्यापाऱ्यांनी केला. महापालिका प्रशासनाने या प्रकाराची माहिती घेऊन व्यापारी वर्गाची माफी मागावी आणि याप्रकरणी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, आपापली दुकाने बंद करून व्यापारी कट्ट्यावर बसल्याचे दिसून आले. यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश देवरमणी , महेश धाराशिवकर, प्रेम झाड, सिद्धाराम शिवदारे, मोहन डांगरे, प्रताप चव्हाण, राजू पवार , अमित वेर्णेकर, सोमनाथ गवळी आदींसह व्यापारी उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
वनौषधी तसेच सराफ बाजारातील बहुतेक दुकाने बंद ठेवण्यात आली होती. हार,फुले विक्रेत्यांचीही दुकानंही बंद दिसून आली. एरवी गर्दी,गजबज असलेल्या या चौकात आज वर्दळ कमी दिसून आली. रस्त्यावर पथारी मांडून विक्री व्यवसाय करणारे तसेच चार चाकी गाडी लावणारे यांनाही काल हटवण्यात आले. काल अनेक ठिकाणचे अतिक्रमण काढले पण काही ठिकाणी आज ते पूर्वतत दिसून आले.
● मनमानीपणे कारवाई झाली : आ. विजयकुमार देशमुख
आमदार विजयकुमार देशमुख यांनी दुपारी सराफ बाजार परिसर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. दरम्यान, या संदर्भात बोलताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की, सराफ कट्टा परिसरातील अतिक्रमण महापालिका प्रशासनाने काढले. नियमानुसार असलेले बोर्ड, सीसीटीव्ही कॅमेरे व इतर साहित्याची मोडतोड केली. मनमानीपणे कारवाई झाली. व्यापाऱ्यांनी दोन तास वेळ मागूनही देण्यात आला नाही, असेही आमदार विजयकुमार देशमुख यांनी म्हटले आहे
● दुपारी महापालिका आयुक्तांसमवेत बैठक
दरम्यान, सराफ कट्टा परिसरात मनमानीपणे कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी गुरुवारी (दि. 15 जून) रोजी दुपारी 3 वाजताची वेळ दिली आहे. बेकायदेशीर कारवाई होऊ नये अशी सूचना यावेळी करण्यात येईल, अशी माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली.
○ अन्यथा उग्र आंदोलन : देवरमणी
महापालिका प्रशासनाने रस्त्यावर बसून विक्री करणाऱ्याचे नियोजन करावे. खरोखर अतिक्रमण असेल तर कारवाई अपेक्षित आहे. दुकानासमोरील वाहन पार्किंगचे नियोजन व्यापारी करतील. प्रशासन दुटप्पी भूमिका घेत आहे. अशीच भूमिका ठेवली तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश देवरमणी यांनी दिला आहे.