→ बार्शी तालुक्यातील खांडवी येथील घटना
→ बेशुध्दावस्थेत असल्याने जबाबही नाही, फिर्यादही नाही
बार्शी : बार्शी तालुक्यातील खांडवी गावचे ग्रामपंचायत सदस्य आकाश दळवी यांच्यावर गावाजवळच्या ढोर ओढ्याच्या पात्रातील अवैध वाळूचे उत्खनन करण्यास विरोध केल्यामुळे अज्ञात इसमांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. Barshi: Attack on village panchayat member for stopping illegal sand mining याबाबत बार्शी तालुका पोलीस स्टेशनने या घटनेची नोंद घेतली असली तरी सदर प्रकरणातील जखमी दळवी हे बेशुद्ध अवस्थेमध्ये असल्यामुळे त्यांचा जबाब नोंदवला गेला नसून याबाबत रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदवण्यात आलेली नाही. दरम्यान महसूल प्रशासन या सर्व प्रकरणावरून चिडीचूप्प आहे. त्यांनी या घटनेची अद्याप कुठलीही दखल घेतली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आकाश पांडुरंग दळवी हे खांडवीचे ग्रामपंचायत सदस्य असून माहितीचा अधिकार चळवळीतील कार्यकर्ते आहेत. दळवी यांनी दि. १९ जून रोजी मध्यरात्री १ वाजता खांडवी ते कव्हेकडे जाणाऱ्या रस्त्यावर गोडसेवाडीजवळ असणाऱ्या ढोर ओढ्यातील पात्रामध्ये वाळूचे उत्खनन सुरू असल्याचा व्हिडीओ आपल्या भ्रमणध्वनीवरून प्रसारित केला होता. या चित्रीकरणामध्ये दळवी हे आपल्या दोन सहकाऱ्यांसह सदर ठिकाणी येऊन दोन ट्रॅक्टर व एका जेसीबी मशिनच्याव्दारे वाळू उपसा व भरून नेण्याचे काम करणाऱ्यांना आडवताना दिसतात.
दळवी तेथे आल्यानंतर सदर ट्रॅक्टर चालक व जेसीबी चालक यांनी वाहनांसह पोबारा केल्याचे या चित्रीकरणात दिसते आहे. त्यापैकी जेसीबीचा पाठलाग करून दळवी यांनी सदर जेसीबीला थांबविल्याचेही दिसते आहे. तसेच सदर उत्खनन कोणाचे आहे याबाबतही दळवीं संबंधित इसमांना विचारणा करत असल्याचे या चित्रीकरणामध्ये दिसते. सदर घटना घडल्यानंतर दळवी हे रस्त्यावर आले असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याने ते जखमी झाले. त्यांना येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. दळवी यांना गंभीर मारहाण झाली असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या मारहाणीमध्ये दळवी यांच्या डोक्यास पाठीमागे जोरास मार लागला असून त्यांचे हात व पायाला फ्रॅक्चर झाल्याचे कळते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
याबाबत दळवी यांच्या कुटुंबीयांनी हल्लेखोरांबाबत माहिती नसल्याचे सांगितले. दळवी यांच्यावर उपचार चालू असून त्यांच्यावर मंगळवार दि. २० जून रोजी सकाळी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. दळवी बेशुद्धावस्थेत असल्याने पोलिसांनी अद्याप त्यांचा जबाबही नोंदविला नाही वा फिर्यादही घेतली नाही.
○ यापूर्वी अवैध धंद्याबाबत आवाज उठविला
दळवी यांनी चार दिवसांपूर्वी बार्शीचे तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना बार्शी तालुक्यातील शहर व पांगरी तसेच वैराग येथील पोलीस स्टेशनमध्ये गेल्या तीन वर्षात खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले असून या प्रकारांना आळा घालण्याबाबत निवेदन दिले होते. या निवेदनामध्ये तालुक्यातील मटका, जुगाराचे अड्डे, अवैध गौण खनिज उत्खनन, गांजा व तत्सम अमली पदार्थांची वाहतूक, काळा बाजार आदी अवैध व्यवसाय यावर कारवाई करावी असे म्हटले होते. रेशिनिंग धान्याचा काळा बाजार आदी अवैध व्यवसाय यावर कारवाई करावी असे म्हटले होते.
○ जाहीर निषेध… जाहीर निषेध..
बार्शी तालुक्यातील भ्रष्टाचार अवैध वाळूचोरी व अवैध धंद्याविरुद्ध लढणारे सामाजिक कार्यकर्ते आकाश दळवी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ शहर जिल्हा सोलापुरच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना करण्यात आली आहे अन्यथा संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.