पंढरपूर : पंढरपूरमध्ये येणारे लाखो वारकरी भाविक आणि स्थानिक नागरिकांना मूलभूत सोईसुविधा द्यायच्या असतील तर त्या जुन्या पंढरपूर मध्ये उभारणे शक्य होणार नसल्याने, चंद्रभागा नदीच्या पैलतीरावर प्रति पंढरपूर उभा करणे काळाची गरज आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचेकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. Building Per Pandharpur, the need of the hour – Legislative Council Deputy Chairman Dr. Neelam Gorhe Solapur Conservation Development Plan Corridor
पंढरपूर कॉरिडॉर, श्री विठ्ठल मंदिर संवर्धन विकास आराखडा आणि आषाढी वारी नियोजनाचा डॉ गोऱ्हे यांनी जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीप्रसंगी पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे सह अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर,अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजय माळी, जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, प्रांताधिकारी गजानन गुरव, मुख्याधिकारी अनिकेत माळी, पंढरपूर विकास आराखड्याचे अभ्यासक सुनील उंबरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, शिवसेना महिला पदाधिकारी सुनीता मोरे आदी उपस्थित होते.
श्री विठ्ठलाच्या प्राचीन मंदिराचे संवर्धन आणि सौंदर्य वाढविण्यासाठी राज्य शासनाने विशेष तरतूद करावी, अशी मागणी आपण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे केली होती. माझ्या या मागणीची दखल घेत दोन्ही मंत्री महोदयांनी प्रस्तावित आराखडा तयार करण्यास मंजुरी दिली होती. मंदिर समितीने या अनुषंगाने आराखडा सादर करुन शासनाकडे सादर केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिली आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी अर्थ संकल्पात 73 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता.
दरम्यान सरकार बदलले मात्र विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निधी तातडीने जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे. या निधीतून मंदिर अधिक मजबूत व सुंदर होईल असे अपेक्षित आहे. पंढरपूर सोबतच देहू व आळंदी परिसर विकास, भंडारा डोंगर परिसर विकास याबाबतचे ही मुद्दे समाविष्ट करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पंढरपूर विकास आराखड्याच्या अंतर्गत शेगाव दुमाला येथे शासनाकडून सुमारे ८५ एकर जमिनीवर प्रति पंढरपूर उभारण्याची संकल्पना सादर करण्यात आली आहे. या ठिकाणी अद्यावत दर्शन मंडप, कार पार्किंग, भाविकांना राहण्याची व्यवस्था, भव्य गार्डन, नदी तीरावर घाट बांधणी आदी कामे प्रस्तावित आहेत.
कॉरिडॉर करताना जुन्या पंढरपूर मधील ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, वाडे, मठ यांचे जतन होणे आवश्यक आहे. विकासाच्या नावाखाली शहर उद्ध्वस्त करुन विकास करण्याला स्थानिक नागरिकांचा आणि वारकऱ्यांचा विरोध आहे. अति आवश्यक तेथेही पण त्या बाधित लोकांचे पुनर्वसन समाधानकारक व्हायला हवे. ज्यांची घरे आणि दुकाने कॉरिडॉर मध्ये जाणार आहेत त्यांचे प्रति पंढरपूर मध्ये पुनर्वसन करण्याबाबत प्रशासनाने विचार करावा.
कॉरिडॉर करताना लोकांना विश्वासात घ्या त्यांच्याशी संवाद करा लोकांनी गैरसमजातून आंदोलने करू नयेत प्रशासनाने समाज माध्यमांवर अद्ययावत माहिती दर पंधरा दिवसांनी द्यावी असे डॉ गोऱ्हे यांनी सूचित केले.
○ आमदार निधी भक्त निवास
आमदार निधीतून उभ्या करण्यात येत असलेल्या भक्तनिवासाबाबत माहिती घेतली असता यामध्ये नवीन बांधकाम आणि पुनर्विकास करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. याकरिता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची तरतूद करून घेण्यात यावी. यामध्ये ज्यांनी आमदार निधी दिला आहे, त्यांच्या नावाच्या उल्लेख असलेल्या बोर्ड लावण्यात यावा आणि लवकरात लवकर हे काम सुरू करावे, असे सांगितले आहे. मंदिर समितीच्या पुढाकारातून हे काम होणे शक्य आहे. याकरिता काही प्रायोजक मिळू शकतात अशी माहिती मंदिर समितीने दिली आहे.
○ पंढरपूर शहर विकासात स्थानिक नागरिकांसाठी पाणी, स्वच्छतागृह, ऊद्याने
पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाची संकल्पना या मध्ये मांडली आहे. यामध्ये सांडपाण्याची नियोजन,कचरा व्यवस्थापन, क्रीडांगणे, विविध उद्याने तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र अशा प्रकारच्या बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि सुजाण नागरिक यांच्या या विषयातील जनहिताच्या आवश्यक त्या सूचना देखील जरूर विचारात घेण्यात येतील, असे त्या म्हणाल्या. याबाबत त्यांनी श्री विठ्ठलाच्या दर्शनावेळी हा संकल्प केल्याचे त्यांनी सांगितले. जनतेच्या मनात या आराखडा विषयी जे काही गैरसमज आहेत, त्यावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने योग्य ती कार्यवाही केली जावी असे निर्देश दिले.
○ पंढरपूरचे स्थानिक प्रश्नावर नियोजन
वारीनंतर पंढरपूरचे सोशल ऑडिट करा. जे नाजूक शौचालय इमारती आहेत, तिथे गार्डन करा, इतर ठिकाणी विरंगुळा केंद्र करावे, ट्रॅफिक सिग्नल पार्क,कविता पार्क अशा नाविन्यपूर्ण गोष्टी केल्या तर वर्षभर पंढरपूरला येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना आनंद मिळू शकेल. चंद्रभागा नदी मध्ये सुरक्षित जलवाहतूक सुरू करावी. महाराष्ट्राच्या संत परंपरेला प्रतिष्ठा आणि प्रोत्साहन देण्यासाठी संतपीठ सुरू करण्यासाठी लवकरात लवकर पुढाकार घेऊन त्याला प्रति पंढरपूर या ठिकाणी जागा द्यावी
पंढरपूरला देशा- विदेशातून येणाऱ्या लोकांचा ओघ लक्षात घेऊन आणि स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन विमान प्रवास सुरू करण्याबाबत चाचपणी करण्यात यावी. तसेच शेगाव येथील आनंद सागर च्या धर्तीवर यमाई तलाव येथे सुशोभीकरण करावे याबाबत ही जिल्हा प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली आहे.
○ या सुधारित आराखड्याला प्रति पंढरपूर विकास आराखडा म्हणावे
सदर आराखडा पूर्ण होऊन त्याला मान्यता मिळण्यास जवळजवळ पंधरा वर्षापेक्षा देखील जास्त कालावधी लोटला आहे. मात्र आता या पुढील काळामध्ये या आराखड्याची अंमलबजावणी वेळेत व्हावी यासाठी प्रत्येक अधिवेशनात लक्ष घालणार असल्याचे डॅा. नीलम गोर्हे म्हणाल्या. लोकप्रतिनिधी आणि सुजाण नागरिक यांच्या या विषयातील जनहिताच्या आवश्यक त्या सूचना देखील जरूर विचारात घेण्यात याव्यात असे त्या म्हणाल्या.