सोलापूर : आषाढीवारीकरिता विठुरायाच्या दर्शनासाठी तेलंगणाचे संपूर्ण मंत्रीमंडळ येणार आहे. यामुळे चर्चा होत आहे. यावर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केलीय. KCR’s entire cabinet will come to visit Vitthal, Congress state president targets ‘BRS’ Pandharpur Nana Patole भारत राष्ट्र समितीचे रेट ठरलेले आहेत, त्यांचे पैशाच्या भरवश्यावर काम सुरू आहे. बीआरएसच्या महाराष्ट्रातील एन्ट्रीमुळे काँग्रेस पक्षाला कोणताही फरक पडणार नाही, असे गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दोन दिवस दौऱ्यावर आहेत. सोलापुरात आल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी पटोले यांचा सपत्नीक, सकुटुंब सत्कार केला. त्यानंतर पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ‘बीआरएस’वरही निशाण साधला.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका नेत्याचे नाव देखील बीआरएससाठी समोर येतं आहे, त्यामुळे किती मोठे प्रलोभन आहे, या विषयी मला इथे बोलायचे नाही. महाराष्ट्र हा शाहू फुले आणि आंबेडकरांच्या विचारांचा आहे. काँग्रेस हा एकमेव आहे जो हा विचार जोपसतोय. मागील ६० वर्षात काँग्रेसने संविधान जोपसलं म्हणूनच चहा विकणाऱ्याचा मुलगा पंतप्रधान होऊ शकला, ही काँग्रेसची देण आहे. त्यामुळे लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही, हे लोकांना कळलंय, असा दावा पटोले यांनी केला.
बीआरएस पक्षासारखे किती आले, किती गेले आपण पाहिलंय. महाराष्ट्रात १९९९ मध्ये उत्तरप्रदेशाचा एक पक्ष आला होता. या आधी हैद्राबादचा एक पक्ष आला होता. आता दुसरा येतोय याने काहीही फरक पडणार नाही. चार लोकांना मदत करायची, त्याचा व्हिडीओ बनवायचा आणि खोटा प्रचार करायचा. हा गुजरात पॅटर्न लोकांनी पाहिला, तोच आता तेलंगणा पॅटर्न झाला आहे, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
तेलंगणाचा शेतकरी किती अडचणीत आहे, सामाजिक व्यवस्थेत किती बिघाड आहे, हे तिथल्या लोकांना माहिती आहे. तेलंगणातील काँग्रेसचे नेते इथे प्रचाराला येतील आणि तेलंगणातील शेतकऱ्यांची वस्तुस्थिती सांगतील. वाएसआर रेड्डी यांची मुलगी काँग्रेसमध्ये आली आहे, असेही पटोले यांनी नमूद केले.
पटोले म्हणाले की, बीआरएस पक्षाचं सगळं काम पैशाच्या भरवश्यावर सुरु आहे. कारण, सर्वांना माहिती त्यांचा रेट ठरलेला आहे. पण कोणी त्यावर बोलतं नाही, पण काहीजण दबक्या आवाजात बोलतात. रेट काय यावर मी बोलणार नाही. पण प्रत्येक पेपरला चॅनेलला जाहिरात हे लोकांना दिसतंय.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ हेलिकॉप्टरमधून वारकऱ्यांवर करणार पुष्पवृष्टी
आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पंढरीच्या दिशेनं निघाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम – महाराजांच्या पालख्यांसह इतर संतांच्या पालख्यांसोबत मोठ्या संख्येनं वारकरी आहेत. अशातच या आषाढी वारीच्या महासोहळ्यात सहभागी होण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पंढरपुरात येणार आहेत.
त्यांच्यासोबत तेंलगणा सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ देखील हजेरी लावणार आहे. तसेच हेलिकॉप्टरमधून वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. ३०० गाड्यांच्या ताफ्यातून हे मंत्रिमंडळ महाराष्ट्रात दाखल होणार आहे. के चंद्रशेखर राव हे २७ जूनला पंढरपूरला येतील. विठ्ठल दर्शनासोबत ते वारकऱ्यांशी संवाद देखील साधणार आहेत.
खरे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दशमी दिवशी म्हणजे २८ जून रोजी पंढरपूरमध्ये येत असताना त्याच्या एक दिवस आधी चंद्रशेखर राव पंढरपुरात पोहोचणार आहेत. आषाढीपूर्वीच पुण्यापासून सर्व पालखी मार्गावर आणि पंढरपूर शहरात बीआरएसकडून जोरदार होर्डिंगबाजी करण्यात आली आहे. यातच आता खुद्द या पक्षाचे अध्यक्ष पंढरपूरला येणार असल्याने या आषाढी यात्रेत राजकीय वातावरण देखील तापणार आहे.
‘अब की बार किसान सरकार ‘ असे म्हणत बी आर एस पक्ष महाराष्ट्रात जोरदार एंट्रीच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी थेट वैष्णवांचा महामेळा असणाऱ्या आषाढी यात्रेचा मुहूर्त निवडला आहे. आषाढी वारीसाठी गेले अनेक वर्षापासून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग येत असतात. पण आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आता संपूर्ण मंत्रिमंडळासह विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणार आहेत.
● पक्ष संघटना वाढीसाठी महासोहळ्याची निवड
देशात शेतकऱ्यांचे राज्य आणण्याची घोषणा देत कामाला लागलेले चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाच्या गळाला महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते लागले आहेत. यातच महाराष्ट्रात पक्ष संघटना वाढवण्यासाठी बीआरएसने वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठ्या महासोहळ्याची निवड केली आहे.
● भालके यांची टीम स्वागतासाठी सज्ज
काही दिवसापूर्वी पंढरपूरचे भगीरथ भालके यांनी चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन बीआरएस पक्षात प्रवेश संदर्भात चर्चा केली होती. आता आषाढीला चंद्रशेखर राव येत असताना त्यांच्या स्वागतासाठी भगीरथ भालके आणि त्यांची भलीमोठी टीम सज्ज असणार आहे. आता आषाढीला येणाऱ्या या राजकीय नेत्यांपैकी पंढरीचा पांडुरंग कोणाला पावणार? हे येणार काळच ठरवेल.