सोलापूर / पुरूषोत्तम कुलकर्णी
पंढरपूरच्या आषाढी आणि कार्तिकी एकादशीला वैष्णवांची मांदियाळी जमण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. श्री विठुराया म्हणजे साक्षात लोकदेवता. इथे सोवळे-ओवळे काहीच नाही. A political fair is also being held in the garden of Bhakti in Pandharpur… the addition of the new Chief Minister… KCR K Chandrasekhar Rao ही देवता म्हणजे समतेचे प्रतिकच. मुखदर्शन- चरणस्पर्श सर्वांना मुक्त. सावळ्या विठ्ठलाच्या दरबारात जमणाऱ्या वारकऱ्यांमध्ये जात- पंथ- धर्म- उच्च- नीच हा भेदभाव बिलकूल नसतो. पंढरीत कायम भक्तीचा मळा असतो पण अलिकडच्या काही वर्षांमध्ये ऐन वारीत राजकीय जत्राही भरू लागली आहे. हा पंढरीचा राजा राजकारण्यांनाही सामावून घेत आहे हे विशेष. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही श्री पांडुरंगाचे आकर्षण वाढू लागले आहे.
एक काळ असा होता, वारी तीन लाखांपर्यंतच असायची. श्री विठ्ठलाची महापूजा कधी व्हायची हेही राज्याला कळत नसत. राहुट्या उभ्या करून वारकरी मंडळी कुठेही दिवस-रात्र काढत असत. मंदिरातील पुजारी आणि बडवे मंडळीच आषाढी व कार्तिकी एकादशीची महापूजा उरकून घेत असत. मात्र, परंपरेनुसार सारा महाराष्ट्र आजही एकादशीचा उपवास करत असतो. हा विठ्ठल भक्तीचा महिमा. जुना काळ गेला. आता बदल पहावा लागत आहे. आषाढीची वारी पंधरा लाखांपर्यंत गेली आहे. वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांची जबाबदारी प्रशासनावर येवून पडली आहे.
पालकमंत्री – जिल्हाधिकारी हे सोयी सुविधांवर विशेष लक्ष ठेवून असतात. विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण झाल्यानंतर शासनाची मंदिर समिती स्थापन झाली. तेव्हापासून शासकीय महापूजेची प्रथा सुरू झाली. साधारण ८०- ८५ चा हा काळ असावा. तेव्हापासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्याची परंपरा सुरू झाली.
राज्यात काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता होती. त्यामुळे काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना महापूजेचा सर्वाधिक मान मिळाला. पुढे १९९५ मध्ये राज्यात सत्तांतर होवून भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले. मनोहर जोशी हे युतीचे पहिले मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंढे हे झाले. मंत्रीमंडळाचे निर्णय असोत वा जोशीसरांची प्रेस असो. त्यात आपल्यालाही मान मिळावा, असा गोपीनाथरावांचा आग्रह असे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पुढे काही दिवसांनी आषाढी एकादशीच्या महापूजेचा मान कोण घेणार? जोशीसर की गोपीनाथराव ? मीडियाने हा प्रश्न बर्निंग केला. अंतिम निर्णयाचा चेंडू शिवसेनाप्रमुख व स्व. प्रमोद महाजन यांच्यापर्यंत गेला. आषाढीची महापूजा जोशीसर तर कार्तिकीची महापूजा गोपीनाथराव करतील, असा फार्म्युला काढला गेला.
शिवसेनाप्रमुख महाजन यांच्या आदेशाला कुणाचे चॅलेंज नसे. युतीची सत्ता असेपर्यंत हाच फार्म्युला कायम राहिला. पुढे १९९९ मध्ये युतीची सत्ता गेली आणि काँग्रेस आघाडीचे सरकार आले.
मोठा पक्ष म्हणून काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद गेले आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद प्राप्त झाले. आघाडीच्या काळातही हाच प्रश्न निर्माण झाला. पण आघाडीच्या नेत्यांनी नसता वाद-विवाद न करता युतीचाच फार्म्युला पुढे सुरू ठेवला. त्यानुसार काँग्रेसचे मुख्यमंत्री आषाढीला तर राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री कार्तिकीला येत असत. आता शिंदे- फडणवीस सरकारने देखील तीच रित सुरू ठेवली आहे.
● नव्या मुख्यमंत्र्यांची भर…
श्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी यंदा एका नव्या मुख्यमंत्र्यांची भर पडली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) व त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्री आज मंगळवारी पंढरीत दाखल होतायेत. मंगळवारी दर्शन सोहळा झाल्यानंतर हा लवाजामा परतणार आहे. दरम्यान राव यांनी वारीच्या तोंडावर स्वार्थ आणि परमार्थ साधण्याचा डाव साधला आहे. त्यांचा बीआरएस हा पक्ष सोलापुरात विस्तार करू पहात आहे. त्यानिमित्ताने पंढरपूरचे युवा नेते भगिरथ भालके यांचा आज बीआरएसमध्ये प्रवेश होणार आहे. सरकोली येथे मेळावा भरवण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी सलग अकरावर्षे आषाढीच्या महापूजेला उपस्थिती दर्शवली.
● सारथ्यही करू लागले…
वारीसाठी पंढरीला येणाऱ्या पालखी सोहळ्यांमध्ये रथ असतो. त्या रथाचे सारथ्य करण्याची प्रथा राजकीय नेत्यांनी पाडली आहे. वाखरीपासून ते पंढरीपर्यंत दिंड्यासमवेत चालत येण्याची प्रथा माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पाडली. युती सरकारमधील कामगार मंत्री स्व. साबीर शेख हे तर वारकरी आणि माळकरी. कपाळी गोपीचंदन व बुक्का लावून टाळ वाजवत दिंडीत ते सहभागी होत असत. नगरचे नेते बबनराव पाचपुते यांचाही दिंडीत कायम सहभाग असायचा.
● फक्त मुख्यमंत्र्यांनाच व्हीआयपी दर्शन
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे त्यांच्या 600 गाड्यांच्या ताफ्यासह, आमदार-खासदार आणि मंत्र्यांसह आज सोलापुरात दाखल झाले आहेत. हे सगळेजण मंगळवारी सकाळी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं दर्शन घेणार आहेत. त्यातच आता केसीआर यांनाच व्हीआयपी दर्शन देण्यात येणार आहे. तर आमदार आणि खासदार तसेच मंत्र्यांना सर्वसामान्यांच्या रांगेतून दर्शन घ्यावं लागणार आहे.