मुंबई : मुंबईतल्या वांद्रे येथील एमईटी कॉलेजमध्ये अजित पवार यांच्या गटाची बैठक सुरु असून दुपारी एक वाजेपर्यंत 30 आमदार येथे पोहोचले आहेत. तसेच अनेक कार्यकर्ते या ठिकाणी हजर झाले आहेत. त्यातच आता आम्ही खरी राष्ट्रवादी असल्याचे दाखवण्यासाठी अजित पवार गटाकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतले जात आहेत. Claim on NCP: Ajit Pawar group starts filing affidavit प्रतिज्ञापत्रावर अजित पवारांच्या समर्थकांकडून सह्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाकडे हे पत्र दिले जाणार आहेत.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता राजकारणात अजित पवार विरुद्ध शरद पवार असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही पवारांची लढाई आता केंद्रीय निवडणूक आयोगात देखील पाहायला मिळणार आहे. अजित पवार गट शिंदे सरकारमध्ये सामील झाल्याने राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजित पवारांच्या राजकीय भूमिकेमुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईत आज दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी कोणाची, हे दाखविण्यासाठी शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची लढाई केंद्रीय निवडणूक आयोगात देखील पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी केंद्रीय निवडणूक आयोगात अर्ज दाखल केले आहेत.
मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आज शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या ठिकाणी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत 10 आमदार पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी एक वाजता या ठिकाणी बैठक असून जास्तीत जास्त आमदार येथे येतील, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. तर अजित पवार यांच्या गटाची वांद्रे येथील एमईटी कॉलेजमध्ये बैठक आहे. या ठिकाणीही आमदार पोहोचत आहेत.
अजित पवार यांच्या बैठकीला साडेबारा वाजेपर्यंत 24 आमदार पोहोचले आहेत. त्यांची मुंबईतल्या वांद्रे येथील एमईटी येथे अजित पवार यांच्या गटाची बैठक होत आहे. थोड्याच वेळापूर्वी अजित पवार या ठिकाणी पोहोचले असून ते फोनवरून बोलताना दिसत आहेत. तर शपथ घेतलेल्या 8 आमदारांसह राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही या ठिकाणी दिसून येत आहेत. स्टेजवरील खुर्च्याही वाढवण्यात आल्या आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मुंबईतल्या वांद्रे येथील एमईटी येथे अजित पवार गटाची बैठक सुरु आहे. या ठिकाणी मंचावरील पोस्टरवर शरद पवार यांचा फोटो वापरण्यात आला आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे. शरद पवार यांनी जेव्हा स्वतः सांगितले आहे की माझा फोटो वापरू नका, तर तुम्ही तुमच्या पोस्टरवर शरद पवार यांचा फोटो का वापरता, असा सवाल आव्हाड यांनी केला आहे. ते वाय. बी. चव्हाण सेंटरला बैठकीसाठी पोहोचल्यानंतर बोलत होते.
खासदार अमोल कोल्हे अजित पवार यांच्यासोबत शपथविधीला हजर होते. मात्र त्यांनी आज अजित पवार यांच्या बैठकीला जाणे टाळले आहे. कोल्हे यांनी आज वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये हजेरी लावली आहे. मी पवारसाहेबांसोबत आहे, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी देखील दर्शवली आहे. दरम्यान शरद पवारांच्या बैठकीला आतापर्यंत 10 आमदार पोहोचले असून सुप्रिया सुळेही या ठिकाणी हजर आहेत.
अजित पवार यांच्याकडून शिंदे सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसहित राष्ट्रवादीच्या एकूण ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी खिळखिळी झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर दुसरीकडे अजित पवार गट हा सरकारमध्ये सामील झाल्याने राष्ट्रवादीतही मोठी फूट पडली आहे. अजित पवारांच्या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात शिवसेना फुटीची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून देखील निवडणूक आयोगात अर्ज दाखल करण्यात आला आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोणत्याही गटाने पक्षावर दावा केला तर आमचं म्हणणं ऐकून घ्यावं असे या अर्जात म्हटले आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी हे मोठं पाऊल उचललं आहे.