मुंबई : आज अधिवेशनाचे कामकाज सुरु होताच मुख्यमंत्र्यांनी नवीन मंत्र्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. यांनतर बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या पेरणीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला, शेतकरी संकटात आहे त्याला मदतीची गरज आहे मात्र सरकार मंत्रिमंडळ विस्तार व दिल्लीत चकरा मारण्यात व्यस्त आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास वेळ नसणाऱ्या सरकारचा निषेध नोंदवत विरोधकांनी सभात्याग केला.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गोंधळामुळे दिवसभरासाठी कामकाज स्थगित करावे लागले. विधानसभा नंतर विधानपरिषदही तहकूब करण्यात आली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरच विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आला, शेकापचे जयंत पाटील यांनी हा मुद्दा उचलला. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातून शिंदे गटात गोऱ्हे यांनी प्रवेश केला होता. त्या स्वतःच अपात्र आहेत असा आक्षेप विरोधकांनी घेतला.
‘घटनाबाह्य’ ‘कलंकीत’ सरकारचा निषेध असो ! असा बॅनर घेऊन काँग्रेसने आज सरकारवर हल्लाबोल केला आहे. पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाले. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेस नेत्यांनी सरकारविरोधात विधीमंडळाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी केली आहे. महाराष्ट्र सरकार लुटारू आहे, भाजपचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पोस्टरबाजी; विरोधकांनी घोषणा करत सरकारला घेरले ‘सासूमुळे वाटणी झाली, सासुच वाट्याला आली.’ म्हणत विरोधक आक्रमक…#पावसाळीअधिवेशन२०२३ #MansoonSession #MaharashtraPolitics #VidhanBhavan pic.twitter.com/TtA4EPGwZw
— Ravi Chavan (@theravichavan) July 17, 2023
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. कामकाज सुरु होताच विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचा आग्रह केला. मात्र सरकारकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. बाळासाहेब थोरात यांनी पेरणीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्याला फडणवीसांनी उत्तर दिले. मात्र त्यावर विरोधकांचे समाधान झाले नाही, नंतर गोंधळ वाढला व अध्यक्षांनी दिवसभरासाठी कामकाज स्थगित केले.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते असणारे अजित पवार आता सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांच्याकडे अर्थ मंत्रीपदाची जबाबदारी आहे. विशेष म्हणजे मागील अधिवेशनात त्यांनी अर्थसंकल्पावर टीका केली होती. आता, टीका केलेल्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी त्यांना करायची आहे.
हे अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सभागृहातले चित्र कसे असणार? राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांना धारेवर धरणार? याकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. सकाळी 11 वाजता विधानसभा तर दुपारी 12 वाजता विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होऊन दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आले.
राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या उभ्या फूटीनंतर महाविकास आघाडीची बाजू कमकुवत झाली आहे,पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावर सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला. त्यानंतर विधानसभा स्थगित करण्यात आली. दरम्यान, विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे.
दरम्यान, दिवंगत खासदार आणि माजी मंत्री गिरीश भालचंद्र बापट, दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळूभाऊ नारायण धानोरकर, माजी आमदार शंकरराव लिंबाजीराव वाकुळणीकर (कोळकर), बाबुरावजी जसुजी वाघमारे आणि माजी आमदार रामचंद्र पुनाजी अवसरे यांच्या निधनानंतर विधानसभेत शोकप्रस्ताव सादर करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदार आणि मंत्री सत्ताधारी बाकावर बसल्याचं पाहायला मिळालं.संजय शिरसाट, समीर कुनावर, यशवंत माने, अमित जनक यांची विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. मंत्र्यांकडून अपेक्षित उत्तरं न मिळाल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहातून काढता पाय घेतला. राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी पक्षातील सर्व आमदारांना विरोधी बाकांवर बसण्यासाठीचा व्हीप जारी केला होता.
परंतु अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री थेट सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले. राष्ट्रवादीचे अन्य आमदार विरोधी बाकांवर बसले. त्यामुळं राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर आता पक्षातील फूट थेट विधीमंडळात पोहचली आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट सत्ताधारी बाकांवर तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे आमदार विरोधी बाकांवर बसल्याचं सभागृहात पाहायला मिळालं.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)