● मोहोळच्या राजकारणाची दिशा बदलणार
मोहोळ : मोहोळ विधानसभा मतदार संघातील राजकारणात काही वर्षांपूर्वी गुरू-शिष्याचे नाते असणाऱ्या दोन नेत्यांमधील कटुता संपली असून त्यांच्यात पुन्हा मनोमिलन झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात मोहोळच्या राजकारणाची दिशा बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. राजकारणात कोण कुणाचा कधी शत्रू होईल? कोण कुणाचा कधी मित्र होईल, याचा नेम नाही. ही व्याख्या आता सर्वसामान्यांनाही पाठ झाली आहे. तेव्हा मोहोळ तालुका त्याला अपवाद कसा असू शकेल ? माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि माजी आमदार रमेश कदम या गुरू-शिष्यांमध्ये सोलापूरच्या साक्षीने एकोपा झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
मोहोळच्या राजकारणात ढोबळेंनी आमदारकी जिंकून आपले बस्तान बसवले होते. आपण एक चांगला कार्यकर्ता घडवू या भावनेने त्यांनी मूळचे अकलूजचे आणि बोरिवलीत स्थायिक झालेले कदम यांना मोहोळमध्ये आणले. वाघोली येथील सूत गिरणीची थोडी बहुत जबाबदारी दिली. जनसंपर्क आणि मेळावे यातून कदम यांचा तालुक्यात संपर्क वाढत गेला. यातूनच ढोबळे यांच्याकडे गुरू तर कदम यांच्याकडे शिष्य म्हणून पाहिले जावू लागले. पुढे कदम यांनी आमदारकीची तयारी सुरू केली. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरक्षित जागेवर कदम यांना उमेदवारी मिळाली. ढोबळेंचे पंख छाटण्यासाठी राष्ट्रवादीतील एका गटाने कदम यांना रसद पुरवली. ढोबळे यांनी अपक्ष म्हणून भवितव्य अजमावले पण मोहोळच्या जनतेने त्यांना नाकारले. कदम विजयी झाले. तिथेच गुरु शिष्याच्या नात्यात शत्रूत्व निर्माण झाले. आमदारकी मिळाल्यानंतर कदम यांच्यामागे शुक्लकाष्ठ लागले.
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणी त्यांना तुरुंगात जावे लागले. तब्बल नऊ वर्षांनी कदम हे जामीनावर बाहेर आल्यानंतर गेल्याच आठवड्यात मोहोळमध्ये त्यांचे जंगी स्वागत झाले. गेल्या चार पाच दिवसात कदम हे मोहोळसह सोलापुरातील कार्यकर्त्यांना भेटत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ अन् गहिवरून आले…
शनिवारी सोलापुरात योगायोग घडून आला. पार्क चौकात ढोबळे यांचे खादी भवनचे कार्यालय आहे. त्याच्याच खाली कदम हे कार्यकर्त्यांसमवेत एका कामासाठी थांबले होते. दरम्यान ढोबळे यांची गाडी तिथे आली. ढोबळेंनी कदमांना पाहिले. चला वरती म्हणत त्यांना आपल्या कार्यालयात नेले. कार्यालयात गप्पा रंगल्यानंतर दोघांनाही गहिवरून आले.
○ राजकारणाची दिशा बदलणार
रमेश कदमांनी केलेले प्रामाणिक काम आजही तरुणाच्या स्मरणात राहीले आहे. म्हणूनच नुकत्याच झालेल्या त्यांच्या सभेला मोहोळ तालुक्यात इतिहास घडवण्यासारखी गर्दी झाली होती. आता ढोबळे हे भाजपवासी झाले आहेत तर कदमांनी अद्याप पक्ष ठरवला नाही. परंतु दोघांचे मनोमिलन झाल असल्याचे समजते. जर खरेच हे मनोमिलन झाले असेल तर मोहोळच्या राजकारणाची दिशा बदलणार का ? अशी चर्चा होवू लागली आहे.