● केलेले निर्देश महागात पडले
● कुंभारीच्या झेडपी शाळेत एका शिक्षकाची दादागिरी
● महिला केंद्र प्रमुखालाही केली दमदाटी
दक्षिण सोलापूर : शाळेतील शिक्षकाला शाळेत नीट काम करत जा, असे सांगणे मुख्याध्यापकाला भलतेच भारी पडले. मुख्याध्यापकास त्यांच्या कार्यालयातच रजेचे कारण पुढे करीत शिक्षकाने हुज्जत घालून अरेरावी, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देत चक्क मुख्याध्यापकाला काठी आणि लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. In Solapur, the headmaster was replaced in Bhar school, the head of the women’s center was also beaten up South Solapur Kubhanri Raza
एवढ्यावरच न थांबत्या त्या शिक्षकाने केंद्रप्रमुखांना अरेरावी, अर्वाच्य शिविगाळ आणि दमदाटीदेखील केल्याने केंद्रप्रमुखदेखील संतापल्या. त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्या ढसाढसा रडू लागल्या. या मारहाणीत मुख्याध्यापकाचे कान फाटले असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत गुरुवारी (ता. ५) सकाळी शाळेची घंटा वाजण्यावेळी म्हणजेच सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. सुभाषचंद्र चनबसप्पा पाटील (वय ५७ रा. बोरामणी ता. दक्षिण सोलापूर) असे जखमी मुख्याध्यापकांचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शाळा म्हणजे मंदीर आणि शिक्षणाची ज्ञानगंगा समजल्या जाणाऱ्या शाळेत अशा प्रकारची लाजिरवाणी घटना घडणे हे शिक्षकी पेशाला अशोभनीय कृत्य आहे. त्यामुळे या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या घटनेचे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील दादागिरी चव्हाट्यावर आली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापक सुभाषचंद्र पाटील यांना महेश क्षीरसागर या सहशिक्षकाने मारहाण करून जखमी केले. जखमी मुख्याध्यापकावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गावातील प्रतिष्ठित नागरिक व लोकप्रतिनिधींनी रुग्णवाहिकेला पाचारण करून त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
कुंभारी परिसरात मराठी मुलांची शाळा, जिल्हा परिषद उर्दू शाळा, जिल्हा परिषदेची मुलींची मराठी शाळा आहे. सुमारे ३०० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. मुलींच्या शाळेमध्ये महेश क्षीरसागर नावाचे सहशिक्षक कार्यरत आहेत. क्षीरसागर यांनी या मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक सुभाषचंद्र पाटील यांना रजा मागितली, परंतु आज शाळेत कार्यक्रम आहे, रजा देता येणार नाही, असे सांगत मुख्याध्यापक पाटील यांनी त्यांची रजा नाकारली. याचा राग मनात धरून क्षीरसागर याने मुख्याध्यापक पाटील यांना लाकडी दांडा व लाथाबुक्याने मारहाण केली.
मुख्याध्यापकास मारहाणीचा प्रकार सुरु असताना कुंभारीचे केंद्रप्रमुख कुंदा राजगुरू, कुंभारीचे सामाजिक कार्यकर्ते गजानन होनराव, स्वप्निल थ्वंटे, राहुल वंजारी, पप्पू कुदरे, आप्पाशा चांगले यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले आणि जखमी मुख्याध्यापक पाटील यांना पुढील उपचारासाठी म्बुलन्समध्ये सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलकडे घेऊन गेले. केस पेपर आणि पुढील प्रक्रिया होईपर्यंत सर्वांनी पाटील यांना सहकार्य केले. घटनेची माहिती मिळताच पाटील यांचे नातेवाईक सिव्हील हॉस्पिटलमध्ये पोहचले. या घटनेची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
● शिक्षकाने अर्वाच्य भाषेने भावना अनावर
एकीकडे उज्ज्वल भारत आणि उज्ज्वल भारताची नवी पिढी घडविणाऱ्या पवित्र अशा शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी, निंदनीय अशी घटना कुंभारीत घडली. सहशिक्षकाकडून मुख्याध्यापकास मारहाण करण्यात येत असल्याची घटना घडत असताना केंद्र प्रमुख कुंदा राजगुरू यांनी त्या दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यावेळी सहशिक्षक महेश क्षीरसागर याने त्यांनाही शिविगाळ केली. अर्वाच्य भाषा वापरून दमदाटी केली. त्याची वागणूक पाहून केंद्र प्रमुख राजगुरू यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्या ढसाढसा रडल्या. माझ्या शैक्षणिक कारकिर्दीत ही पहिलीच घटना असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केली.