करमाळा, प्रतिनिधी – सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथे घडली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी सासरच्या लोकांविरुद्ध करमाळा पोलिसांत फिर्याद दिली असून करमाळा पोलिसांनी यांपैकी एकाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत मयत विवाहितेचे वडील विठ्ठल श्रीरंग घाडगे (रा. झरे, ता. करमाळा) यांनी करमाळा पोलिसांत दि. १८/०८/२४ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची मोठी मुलगी कल्याणी (वय-२६ वर्षे) हिचा विवाह १५/०६/१९ रोजी वाशिंबे गावातील प्रकाश पंढरीनाथ झोळ यांचे सोबत कुंभेज फाटा येथील मंगल कार्यालयात झाला होता. त्यानंतर सोळव्यापासूनच पतीसह सासू-सासरे आणि दोन ननंदा यांनी घरगुती कारणांवरून कल्याणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली असल्याचे तसेच पतीचे दुसरे लग्न करून देऊ असे सांगत माहेरहून एक लाख रुपये आणण्यासाठी सासू-सासर्यांनी सतत शिवीगाळ करत असल्याचे कल्याणी ने सांगितले होते. त्यानंतर कल्याणीच्या सासरच्यांची समजूत काढूनही पती प्रकाश याच्यासह सासरच्यांनी तिला त्रास देणे सुरूच ठेवले होते.
याशिवाय २०२० मध्ये माहेरून पैसे घेऊन येत नसल्यामुळे सासरे पंढरीनाथ यांनी कल्याणीला वीजेच्या हिटरने करंट दिल्याचे तसेच २०२२ मध्ये कल्याणी आजारी असल्याने सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला गेलो असताना सासरे पंढरीनाथ यांनी ‘तुला मारून टाकतो व माझ्या मुलाचे दुसरे लग्न करतो’ असे बोलत असल्याचे कल्याणीने घाडगे यांना सांगितले होते. तसेच दि. १५/०८/२४ रोजी नातू आणि मुलगी कल्याणीला भेटण्यासाठी गेलो असतानाही सासु मला घरातील छोट्या- छोटया गोष्टींवरून तसेच प्रकृतीच्या कारणांवरुन त्रास देत असल्याचे तसेच सासरा माहेर वरून पैसे घेवुन ये असे म्हणून शिवीगाळ करत असल्याचे व नवरा देखील आई-वडीलांचे व बहिणीचे ऐकुन त्रास देत आहे असे कल्याणी हिने सांगितल्याचे घाडगे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
या सर्व जाचाला कंटाळून मुलगी कल्याणी प्रकाश झोळ हिने दि. १७/०८/२४ रोजी आत्महत्या केली असल्याने विठ्ठल घाडगे यांनी तिचा सासरा पंढरीनाथ झोळ, सासु कौसाबाई झोळ, पती प्रकाश झोळ, (रा. वाशिंबे, ता.करमाळा), नणंद मोहिनी संजय खेडकर (रा. पेडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) आणि नणंद प्रमिला निलेश जाधव (रा. जिंती, ता. करमाळा) यांनी आपापसांत संगनमत करून मुलगी कल्याणी हिला माहेरुन एक लाख रुपये घेवुन येण्याचे कारणावरून व घरातील किरकोळ कारणांवरुन मानसिक व शारिरिक त्रास देवुन तिला आत्महत्येस प्रवृत केले असल्याची फिर्याद दिली आहे.
घाडगे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी मयत विवाहितेचा सासरा पंढरीनाथ झोळ याला अटक केली असून करमाळा न्यायालयात उभे केले असता त्याला मा. न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर या घटनेचा तपास करत आहेत.