अक्कलकोट :- चालू वर्षाच्या पावसाळ्यात उजनी धरणाचा पाणीसाठा शंभर टक्केच्या वर झाल्याने आणि उजनी खालील लाभक्षेत्रात या वर्षाचा पावसाळा अत्यंत तोकडा झाल्याने उजनी भरल्यानंतर भीमा नदीत पाणी सोडले जाते त्याऐवजी जिथे पाणी टंचाई आहे त्या भागातील शेतीला आणि नागरिकांना पाणी मिळावे यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पुढाकाराने आज बैठक पार पाडले आणि दिनांक 20 ऑगस्ट पासून बोरी मध्यम प्रकल्प एकरूप उपसा सिंचन योजनेत पाणी सोडण्याचा आज निर्णय झाला. या निर्णयाने अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर भागातील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाच्या अनेक गावांना मोठा लाभ होऊन पाणी टंचाई पासून दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीसच आमदार कल्याणशेट्टी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पाणी सोडण्याबाबत मागणी केली होती. परंतु कालव्यामध्ये साचलेलं मोठ्या प्रमाणात गाळ, वाढलेले झाडेझुडपे, त्याला पडलेल्या प्रचंड भेगा, त्यात साचलेला गाळ या सर्व अडथळ्याने तिथे पाणी सोडता आले नाही. गेल्या पंधरा दिवसात सातत्याने प्रयत्न करून त्या कालव्यातील सर्व कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत त्यामुळे असलेली सर्व अडथळे आता दूर झालेले आहेत. त्यामुळे पाणी सोडण्याचा निर्णय झालेला असून सोडलेले पाणी कुरनूर धरणापर्यंत पूर्ण क्षमतेने आणि वेगाने येण्यास मदत होणार आहे.उजनी प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झालेला असून नदीद्वारे व कालव्याद्वारे विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे. सदरचे पुराचे पाणी वापरून बोरी मध्यम प्रकल्प व एकरुख उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील इतर तलावात सोडण्याची मागणी आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडे केलेली होती. सदर मागणीस अनुसरून दि. १७ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली.
सदरच्या बैठकीत दि. २० ऑगस्ट २०२४ पासून एकरुख उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणेबाबत जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी सहमती दर्शवली आहे.जलसंपदा विभागाकडून कारंबा शाखा कालव्यातील गाळ काढण्याचे काम तसेच कारंबा पंपगृह व एकरुख उपसा सिंचन योजनेच्या हगलूर पंपगृह व बोरामणी पंप गृहातील यांत्रिकी व विद्युत विभागाची सर्व कामे पूर्ण झाल्याची माहिती यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी दिली. एकरुख उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील बोरी मध्यम प्रकल्प, दर्गनहळळी, कर्देहळळी, रामपूर व आवश्यकतेनुसार अन्य लगतच्या तलावात पाणी सोडण्याबाबतचा निर्णय सदर बैठकीत घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस आ. सचिन कल्याणशेट्टी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. ज्ञानदेव बागडे, धीरज साळे महसूल उपजिल्हाधिकारी श्री. अमृत नाटेकर, कार्यकारी अभियंता श्री. धनंजय कोंडेकर, श्री. मोहन जाधवर व अन्य अधिकारी उपस्थित होते.