अक्कलकोट:-( प्रतिनिधी):-
श्री स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त या नात्याने आज अनेक दिवसानंतर स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन धन्य झालो असल्याचे मनोगत मुंबईचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी मा.खासदार राहुल शेवाळे यांचा श्री स्वामी समर्थाचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. या प्रसंगी माजी खासदार राहुल शेवाळे बोलत होते. पुढे बोलताना राहुल शेवाळे यांनी श्री स्वामी समर्थांच्या भक्ती कार्याचा आलेख उंचावण्याचा मान मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांना लाभलेला आहे. त्याचा वारसा त्यांनी आपले सुपुत्र प्रथमेश इंगळे यांना घेऊन भक्तीने चालवीत आहेत. त्यांच्या या कार्यास आपल्या शुभेच्छा असल्याचे मनोगतही याप्रसंगी राहुल शेवाळे यांनी व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, धनराज शिंदे आदींसह शेवाळे कुटुंबीय उपस्थित होते.