करमाळा, प्रतिनिधी – श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी भरणाऱ्या तालुक्यातील शेलगाव (क) चे ग्रामदैवत नागनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त सालाबाद प्रमाणे याही वर्षी विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले आहे. यात्रेनिमित्त किर्तन, पालखी सोहळा, प्रबोधन रुपी भारुड, महाप्रसाद अशा धार्मिक उपक्रमांसह रक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी रात्री कीर्तन सोहळा झाल्यानंतर आज सोमवारी सकाळी ८ते१० या वेळेत गावातून नागनाथ महाराजांची पालखी काढण्यात येणार आहे. यानंतर १० ते २ या वेळेत राज्यभरातून आलेल्या नामांकित प्रबोधनकार / भारूडकार यांच्या भारुडांचा कार्यक्रम होणार आहे. या भारुडाच्या कार्यक्रमातून मनोरंजनातून प्रबोधन करण्यात येते. भारुडाचा कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी २ नंतर महाप्रसाद होईल. रात्री ९ वाजता नागनाथ महाराजांची छबिना मिरवणूक काढली जाईल. यात्रेदरम्यान सामाजिक बांधिलकी म्हणून गावातील युवकांकडून रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.
शेलगाव (क) चे ग्रामदैवत नागनाथ महाराज हे जागृत देवस्थान मानले जाते. पंचक्रोशीतील सौंदे, वरकटणे, देवळाली, अर्जुननगर, फिसरे आदी गावांतील भाविक मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये सहभागी होतात. तालुक्यातील नागरिकांनी या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.