बार्शी : गर्भपात करण्यास कोणत्याही नियमांचे पालन न करता व त्यासाठी कोणतीही वैद्यकीय पात्रता नसताना महिलांचे प्रसूतीपूर्व बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी अटकेत असलेली आरोपी सुषमा गायकवाड हिच्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांचे समोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपी सुषमा गायकवाड ची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणाची हकीकत अशी की, बार्शी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे बेकायदा गर्भपात होत असलेल्या ठिकाणी छापा टाकून आरोपींना घटनास्थळावरून अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. बार्शी पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्रक दाखल केले होते. या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुषमा किशोर गायकवाड हिचा जामीन अर्ज बार्शी सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्या निकाला विरुद्ध आरोपी सुषमा गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या समोर झाली. सदर जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी आरोपी सुषमा गायकवाड ची जामनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. मनोज मोहिते, ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. पंकज देवकर यांनी काम पाहिले.