उत्तर सोलापूर/प्रतिनिधी
उच्च शिक्षण घेतल्यानंतर आपले कुटुंब, शेती व्यवसाय, समाज यापासून युवा वर्ग दुरावत आहे.भरपूर शिका,मोठे व्हा, मोठ्या पॅकेजच्या नोकरी करा.मात्र आपली भारतीय संस्कृती जपा, नाही तर एक दिवस कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही,अशी भिती व्यक्त करुन भारतीय समाज व्यवस्था अबाधित राखण्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे जिल्हा अध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी व्यक्त केले.
वडाळा येथील श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शिक्षण संकुलाच्या वतीने आयोजित केलेल्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण व गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सन्मान काका साठे यांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.देविदास साठे,संस्थेचे अध्यक्ष व वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे, प्राचार्या डॉ.वैशाली साठे, संस्थेचे संचालक जयदीप साठे, बाळासाहेब सुतार, प्राचार्य डॉ. शिरीष भोसले, संजयकुमार वाघमारे, प्राचार्य डॉ.नागेश सर्वदे, उपसरपंच अनिल माळी, माजी सरपंच प्रभाकर गायकवाड, सुधीर कांबळे, नारायण गाडे, मनोज साठे, संपत गाडे, संतोष सुभेदार, ज्ञानदेव साठे, वडाळा सोसायटीचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय गायकवाड यावेळी उपस्थित होते.
न्यू हायस्कूलचे माजी विद्यार्थी मंगेश नाईक यांची केंद्र सरकारच्या हवाई प्राधिकरणात नियंत्रण अधिकारी, मंगेश जमदाडे यांची सातारा येथील छत्रपती संभाजी महाराज शासकीय रुग्णालयात परिचारक अधिकारी या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल, वैशाली केवटे, देशमाने यांनी योगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
देश स्वतंत्र झाला.आता स्वातंत्र्य टिकविण्याची जबाबदारी तरुणांची असून आपले कुटुंब,गाव, तालुका, जिल्हा, राज्य व देशाप्रती नितांत आदर व प्रेम जपावे, असे आवाहनही काका साठे यांनी केले.पर्यवेक्षक प्रा.पी.आर.पाटील यांनी प्रास्ताविक, पत्रकार दत्ता मोकाशी यांनी सूत्रसंचालन केले.