बार्शी : कोणत्याही तालुक्याच्या अर्थकारणामध्ये बाजार समिती महत्त्वाची भूमिका बजावत असते. बार्शी बाजार समितीने गेल्या तीन वर्षात केलेली विकासकामे ही राज्यातील सर्व सहकारी संस्थांनी अनुकरण करण्यासारखी आदर्शवत आहेत, असे गौरवोद्गार खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी काढले.
ते येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उभारण्यात आलेल्या 96 केव्ही सौरउर्जा प्रकल्प व अन्य विकासकामांच्या लोकार्पण व भूमीपूजन सोहळ्यात बोलत होते.
आ. राजेंद्र राऊत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आ. प्रशांत परिचारक, आ. विजयकुमार देशमुख, नगराध्यक्ष ऍड. असिफ तांबोळी, बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, रमेश पाटील, पंचायत समिती सभापती अनिल डिसले, उपसभापती झुंबर जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
बाजार समितीच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात पाहुण्यांचे आगमन बैलगाडीतून झाले. यावेळी बारा बलुतेदारांचे पेहराव घातलेली चिमुरडी स्वागतला उपस्थित होती. यावेळी प्रास्ताविकामध्ये सभापती रणवीर राऊत यांनी गेल्या सव्वातीन वर्षात बाजार समितीमध्ये झालेले 362 ठराव एकमताने मंजूर झाले व केवळ 6 ठरावांना बहुमताने संमती मिळाली. सर्वांना विश्वासात घेवून कारभार सुरु आहे. सर्व मूलभूत सुविधा शेतकरी, व्यापारी व हमालांना उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना आमदार राऊत यांनी निवडणूकीवेळी दिलेल्या जाहीरनाम्याची पूर्णपणे पूर्तता केली आहे. बाजार समितीचे उत्पन्न वाढविले आहे. भविष्यात अन्न प्रक्रिया सारखे उद्योग उभारण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे. शेतकर्यांचे जीवनमान उंचावणे, हाच ध्यास आहे. बाजार समितीचा कारभार अतिशय स्वच्छ आणि पारदर्शी आहे, असे सांगितले.
यावेळी खा. राजेनिंबाळकर म्हणाले, बार्शीच्या बाजारसमितीची उलाढाल ही उस्मानाबादच्या बाजार समितीपेक्षाही खूप मोठी आहे. मी सतत बार्शीकरांच्या संपर्कात आहे. खासदार दाखवा आणि पैसे मिळवा, अशी ओरड कधी येवू देणार नाही. खासदार निधी कोरोनाकाळात मिळालेला नाही. त्यामुळे जनतेने खासदार निधीच्या विनियोगाबाबतच्या अडचणी समजून घ्याव्यात. हिवाळी अधिवेशनात खासदार निधी मिळण्याबाबत आवाज उठविणार आहे. पंढरपूरच्या कार्यक्रमात केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पंढरी पालखीमार्ग चौपदरीकरणाच्या धर्तीवर संत गोरोबाकाका वारी मार्ग विस्तारीकरणाबाबत साकडे घातले आहे. लातूर ते टेंभुर्णी मार्गाचे रुप बदलण्यासाठी प्रयत्न करतो आहे. मी राज्य सरकारकडे बार्शीच्या विकासकामांसाठी आ. राऊत यांना मदत करणार असून त्यांनी केंद्र सरकारकडून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बार्शीतील अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईतून वगळलेल्या चार मंडळांना लावलेले 1983 सालचे निकष चुकीचे असल्याचे विभागीय आयुक्तांना सांगितले आहे. 33 टक्के पिक नुकसान झालेल्या गावांना 65 मि.मी. पावसाचा निकष लावणे चुकीचे असल्याचे पटवून दिले आहे. त्यामुळे लवकरच या मंडळांना न्याय मिळेल.
यावेळी बोलताना आ. देशमुख यांनी बाजार समितीमध्ये आल्यानंतर या संस्थेचा कायापालट झाल्याचे जाणवले. पालकमंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्यामुळे वेळोवेळी राऊत हे माजी आमदार असतानाही त्यांनी सूचविलेल्या प्रत्येक विकासकामांना जिल्हा नियोजन विकास मंडळाकडून निधी मिळवून दिला. व त्यांच्या सांगण्यानुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचेही धोरण ठरविले, असे सांगितले.
यावेळी बोलताना आ. परिचारक म्हणाले, बार्शीची व्यापारपेठ चांगली आहे. बार्शीमध्ये पूर्वापार बँकिंग व्यवस्थाही मोठी आहे. व्यापार्यांच्या उलाढाली मोठ्या असल्यामुळे तालुक्याचे अर्थकारण चांगले आहे. बार्शीच्या बाजार समितीचा नावलौकिक वाढविण्याचे आ. राऊत यांच्या कार्यकाळात झाले आहे. आ. राऊत हे शेतकर्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तत्परतेने काम करतात, असा अनुभव आहे.
यावेळी आ. राऊत यांनी नगरसेवक विलास रेणके, माजी पं.स. सदस्य रामेश्वर मांजरे यांचा आपल्या गटात प्रवेश झाला असल्याचे जाहीर केले. यावेळी दोघांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक रावसाहेब मनगिरे, शिवाजीराव गायकवाड, सचिव तुकाराम जगदाळे यांच्यासह राऊत गटाचे जि.प. पं.स. सदस्य, नगरसेवक, व्यापारी, शेतकरी, हमाल यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगेश दहीहांडे यांनी सूत्रसंचालन केले तर अशोक सावळे यांनी आभार मानले.