कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली. क्रिकेटपटूने आपल्या संघाला विजय मिळवून दिला परंतु मैदानातच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. अमर साबळे असं क्रिकेटपटूचं नाव आहे. अंबप प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत ही घटना घडली. अमरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. अमर हा उत्कृष्ट खेळाडू म्हणून गावात प्रसिद्ध होता.
संघाच्या विजयासाठी धावांची बरसात सुरू होती. त्याने अर्धशतक करून संघाला विजयी केले. संयोजकांनी त्याला ‘मॅन ऑफ दी मॅच’ पुरस्कार बहाल केला. हे सर्व घडत असताना ही अघटीत दुर्दैवी घटना घडली.
अमर पांडुरंग साबळे ( रा. अंबपवाडी ता. हातकणंगले) असं मृत पावलेल्या 32 वर्षीय क्रिकेटपटूचं नाव आहे. तो हातकणंगले तालुक्यातील अंबपवाडी गावातील रहिवासी होता. अंबप येथे गुरुवारपासून अंबप स्पोर्ट्स आणि अशोकराव माने ग्रुप यांच्या वतीने अंबप प्रीमिअर लीग क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते. राजेंद्र हायस्कूलच्या मैदानावर हे सामने खेळवले जात होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोमवारी (ता. 8) सायंकाळी चारच्या सुमारास एक क्रिकेट सामना संपला. या सामन्यात अंबपवाडी राजमंगल स्पोर्ट्सचा खेळाडू अमर साबळे याने अष्टपैलू कामगिरी करत आपल्या संघाला सामना जिंकवून दिला. त्यामुळे त्याला सामनावीरचा पुरस्कारही मिळाला. सामना संपल्यानंतर, अमरला मैदानात अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तो जमिनीवर कोसळला. यानंतर आयोजकांनी आणि अन्य खेळाडूंनी अमरला त्वरीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
प्राथमिक तपासणी करून डॉक्टरांनी अमरला मृत घोषित केलं. रात्री उशिरा शवविच्छेदन केल्यानंतर अमरवर अंबपवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मृत अमर हा उत्कृष्ट खेळाडू म्हणून गावात प्रसिद्ध होता. त्याची प्रकृती देखील ठणठणीत होती. अशा धडधाकट खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने अनेक खेळाडूंना धक्का बसला आहे. सायंकाळी मृतदेह अंबपवाडी येथील घरी आणण्यात आणल्यानंतर नातेवाईकांसह मित्रांनी फोडलेल्या टाहोने उपस्थितांची मने हेलावून गेली. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली, आई, वडील असा परिवार आहे.
‘मॅन ऑफ दी मॅच’चा पुरस्कार पटकावून देणार्या अमरला ज्या मित्रांनी खांद्यावरून घेऊन जल्लोष केला, त्या मित्रांवरच त्याचा मृतदेह उचलण्याची वेळ आल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले. अमरच्या लग्नाचा वाढदिवस चार दिवसांपूर्वी मोठ्या थाटात झाला होता. मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने अमरचा मित्रपरिवारही मोठा होता. त्यामुळे अमरच्या जाण्याने कुटुंबासह अनेकांना धक्का बसला आहे.