सरकारी क्षेत्रात लाच हा प्रकार सर्रासपणे चालतो. जे कुणी तक्रार करण्याची हिम्मत करतात, त्यातलेच सरकारी बाबू उघडे पडतात, अन्यथा नाही. त्यांच्या लाचेचा आकडा पाहिला तर डोळे गरगरायला लागतात. लाच खाण्याच्या प्रकाराबाबत केवळ सरकारी क्षेत्राकडे बोट करता येणार नाही तर निमसरकारी क्षेत्रातही लाच बोकाळले आहे. इतर क्षेत्रेही त्याला अपवाद नाहीत. Sales Promotion Editorial Blog Says Company Bribes Doctors ‘Dolo’
आता डॉक्टर मंडळींनी देखील लाच घेतल्याचे प्रकरण उपडकीस आले आहे. लाच म्हटल्यानंतर डॉक्टरांचे टाळके कदाचित सरकले जाऊ शकते. ही लाच नव्हे तर कंपनीने दिलेली ती भेट आहे, असा दावा त्यांच्याकडून कदाचित केला जाऊ शकतो. असो. मागच्या दाराने जे काही येते, ती एक प्रकारे लाचच असते हे लक्षात ठेवले पाहिजे. कोरोना संसर्गाच्या काळात ‘डोलो ६५०’ या गोळ्यांची सर्वाधिक चर्चा होती. अगदी हलका ताप आला किंवा कोरोना संसर्गाची कोणतीही सौम्य लक्षणे आढळली तर, त्यावर उपाय म्हणून डॉक्टरांकडून ही गोळी घेण्याचा सल्ला देण्यात येत होता.
कोरोना संसर्गाच्या काळात या गोळ्यांची निर्मिती करणाऱ्या कंपनीने भरघोस नफा कमवला. ही गोळी सर्व आजारांवर रामबाण उपाय ठरत होती. भारतातील जवळपास प्रत्येक घरांपर्यंत ही गोळी पोहोचली होती. पण आता या गोळ्यांची निर्मिती करणारी ‘मायक्रो लॅब्स’ ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. संबंधित कंपनीने या गोळ्यांची विक्री वाढवण्यासाठी डॉक्टरांना तब्बल एक हजार कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कोरोना विषाणूसंदर्भातील कोणतीही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांनी रुग्णांना ही गोळी घेण्याचा सल्ला द्यावा, यासाठी कंपनीकडून डॉक्टरांना भेटवस्तूंच्या स्वरूपात ही रक्कम दिली, असा दावा फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियाने केला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सर्वोच्च न्यायालयात असोसिएशन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया असा खटला सुरू आहे. कंपनीने ताप किंवा इतर सौम्य लक्षणे आढळणा-या सर्व रुग्णांना ही गोळी औषध म्हणून लिहून द्यावी, यासाठी डॉक्टरांना १ हजार कोटी रुपयांची रक्कम मोफत दिली आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
ज्येष्ठ वकील संजय पारिख आणि वकील अपर्णा भट यांनी याचिकाकर्त्या असोसिएशन तर्फे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाला सांगितले की, ५०० एमजी पर्यंतच्या कोणत्याही गोळ्यांची बाजारातील किंमत काय असावी? वाचे नियंत्रण शासकीय यंत्रणेकडून केले जाते. पण ५०० एमजीपेक्षा अधिक क्षमतेच्या गोळ्यांची किंवा औषधांची किंमत ठरवण्याचा अधिकार संबंधित उत्पादक फार्मा कंपनींना आहे. याचाच फायदा मायक्रो लॅब्स कंपनीने उठवला आहे.
डॉक्टरांनी रुग्णांना १५० एमजी क्षमतेची डोलो गोळी लिहून द्यावी, यासाठी कंपनीने डॉक्टरांना १ हजार कोटी रुपये मोफत वितरित केले आहेत. तसेच बहुतेक रुग्णांना गरज नसतानाही ही गोळी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात होता, असंही वकिलांनी आपल्या युक्तिवादात म्हटले आहे. डॉक्टरांना मोफत देण्यात आलेल्या १ हजार कोटीचा उल्लेख कंपनीनं ‘सेल्स प्रमोशन’ असा केला आहे.
याद्वारे कंपनीने डॉक्टरांना भेटवस्तू, मनोरंजन, परदेशी सहली असे अनेक अनैतिक फायदे दिल्याचे वकिलांनी न्यायालयात म्हटले आहे. शिवाय अशा प्रकारच्या ‘सेल्स प्रमोशन’ मुळे औषध लिहून देण्याचा डॉक्टरांच्या वृत्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो तसेच आवश्यकता नसताना हे औषध लिहून देण्याचे प्रमाण वाढते. यामुळे मानवी आरोग्यावरही वाईट परिणाम होतो, असा दुक्तिवादही वकिलांनी केला आहे. पॅरासिटमल किंवा ‘डोलो ६५०’ हे औषध सामान्यतः सुरक्षित औषध मानले जाते. पण हे औषध आवश्यकतेपेक्षा अधिक घेतल्याने यकृताशी संबंधित गंभीर आजार उद्भवू शकतात.
यकृत विकार, मूत्रपिंडाचे आजार आणि मोठ्या प्रमाणात मद्यपान करणाऱ्या लोकांना हे औषध देणे हानिकारक ठरू शकते, असे सांगितले जाते. हे प्रकरण न्यायालयात गेल्याने वैद्यकीय क्षेत्राला डाग लागला आहे. वैद्यकीय क्षेत्रातही अपप्रवृत्ती शिरली आहे. रुग्णालयात व दवाखान्याशेजारी डॉक्टरांचीच मेडिकल दुकाने असतात. फार्मसी झालेल्या तरुणांना महिना वेतन देतात आणि त्याच्या परवान्यावर अशी मेडिकल दुकाने चालवली जातात.
डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे त्याच मेडिकलमध्ये मिळतात. ही चलाखी वेगळीच औषध कंपन्यांकडून डॉक्टरांना भेटवस्तूंच्या रूपातून झाकून झाकून लाच दिली जाते. हा पायंडा अनेक वर्षांपासून पडत आला आहे. हे थांबणारही नाही.
📝 📝 📝