मुंबई, 10 एप्रिल (हिं.स.)।राज्यातील आपले सरकार पोर्टल अर्थात ई-सेवा केंद्र आज 10 एप्रिलपासून 14 एप्रिलपर्यंत पाच दिवस बंद राहणार आहे. महा ऑनलाइनच्या सर्व्हरमधील नियमित देखभाल आणि तांत्रिक सुधारणांच्या कामासाठी हे पोर्टल बंद राहणार आहे. या कालावधीदरम्यान नागरिकांना कोणतेही शासकीय काम करता येणार नाही. यामुळे राज्यातील नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
नागरिकांना शासनाच्या विविध सेवा पारदर्शक पद्धतीने व जलदगतीने उपलब्ध व्हावे, कामकाज कार्यक्षम व्हावे, या हेतूने शासनाने आपले सरकार हे ऑनलाईन पोर्टल 10 वर्षांपूर्वी सुरु केले आहे. या पोर्टलद्वारे जलदगतीने सेवा मिळतात. विशिष्ट प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नेहमी कार्यालयात जाण्याची गरज नाही.आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, ओळख पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र ,नॉन क्रिमिलिअर , रहिवासी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र , जात पडताळणी, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र यासह इतरही आवश्यक कागदपत्रे याद्वारे काढता येतात.
दरम्यान, ‘आपले सरकार’ हे महाराष्ट्र शासनाचे एक वेब पोर्टल आहे, जे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ नुसार तयार करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे, नागरिक विविध सरकारी सेवांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि त्यांची माहिती मिळवू शकतात. ज्याद्वारे नागरिकांना सरकारी सेवा सोप्या पद्धतीने पारदर्शकरित्या उपलब्ध होतात.