कोलकाता : पश्चिम बंगालचे भाजप प्रदेश अध्यक्ष आणि खासदार दिलीप घोष हे अजब वक्तव्य करण्यास प्रसिद्ध आहेत. परत त्यांनी एक वक्तव्य केले असून ते गाजत असून त्यावर टीकाही होत आहे.
दिलीप घोष यांनी लोकांना कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिलाय. ‘गोमूत्र पिल्यानं शरीराची व्हायरसशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढते’ असंही दिलीप घोष यांचं म्हणणं आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
दिलीप घोष यांनी पहिल्यांदाच असं वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही. याअगोदरही ते अशी वक्तव्य करून चर्चेत आले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिलीप घोष यांनी ‘गाईच्या दुधात सोनं असतं’ असं म्हटलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर ते ट्रोलही झाले होते. त्या अगोदर ‘गोमूत्र पिण्यात कोणतीही अडचण नाही. मी स्वत: गोमूत्राचं सेवन करतो’ असंही त्यांनी म्हटलं होतं.
या व्हिडिओमध्ये दिलीप घोष एका बैठकीत लोकांना घरगुती गोष्टींचा उपयोग समजावून सांगत आहेत. यावेळी, त्यांनी गोमूत्र पिल्यानं लोकांचं आरोग्य सुधारतं, असा दावाही केला.
‘मी जर गाईबद्दल बोलायला लागलो तर अनेक जण असहज होतील. गाढवं कधीही गाईची महती समजू शकणार नाहीत. हा भारत आहे. ही भगवान श्रीकृष्णाची धरती आहे. इथं आपण गाईची पूजा करतो. आपल्याला आरोग्य सुधारण्यासाठी गोमूत्र पिणं आवश्यक आहे. जे दारू पितात त्यांना गाईचं महत्त्व कसं काय लक्षात येईल’ अशी मुक्ताफळं उधळताना घोष या व्हिडिओत दिसत आहे.