माढा : माढ्यातील पहिल्या कोरोना रूग्णांच्या संपर्कातील 8 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने माढेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र एका तासातच माढा पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कोरोना पाॅझीटीव्ह आल्याने माढा शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
श्रीरामनगर येथील एका शिक्षकाचे कुर्डूवाडी कनेक्शनमुळे माढ्यातील पहिला रूग्ण सापडल्यानंतर त्याचे आई वडील पत्नी आणि संपर्कातील इतर पाचजणांची रॅपिड अॅटीजन तपासणी कीटद्वारे केलेल्या तपासणीत सर्वचजण निगेटिव्ह आले. यामुळे माढेकरांनी आनंद व्यक्त केले. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. माढा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह इतर दोन जणांची टेस्ट घेण्यात आली. यामध्ये दोन जणांचे रिपोर्ट पाॅझीटीव्ह आल्याने पोलीस प्रशासनासह माढेकरांचे टेन्शन वाढले आहे.
दरम्यान हे दोन्ही पोलिस कोणाच्या संपर्कात आल्याने बाधित झाले ? यानंतर ते दोघेजण कोणा कोणाच्या संपर्कात आले, याविषयी प्रशासनाकडून माहिती घेण्याचे काम चालू आहे. दरम्यान संपर्कातील पोलिसांना होम क्वारन्टाईन केले असून सर्वांची तपासणी करून घेणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल कादबाने यांनी सांगितले.
सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या बातमीमुळे एकही व्यक्ती पोलीस स्टेशनकडे फिरकेनासा झाला आहे. यामुळे आपोआपच पोलीस स्टेशन लाॅकडाऊन झाल्याचे दिसून आले.