नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (रिलायन्स इंडस्ट्रीज), जिओ प्लँटफॉर्म लिमिटेड (जिओ प्लँटफॉर्म) आणि गुगल एलएलसीने (गुगल) जिओ प्लँटफॉर्ममध्ये 33, 737 कोटी रुपयांचा गुंतवणुकीचा करार केला आहे. गुगलने जिओ प्लँटफॉर्मचे मूल्य 4.36 लाख कोटी निश्चित केले आहे. गुंतवणुकीमुळे जिओ आणि गुगलकडून आधी घेण्यात आलेल्या परिश्रमाचा फायदा संपूर्ण भारताला होणार असून डिजिटलायझेशनचा प्रत्येक भारतीयाला फायदा मिळणार आहे.
गुगल या गुंतवणुकीच्या माध्यमातून जिओ प्लँटफॉर्ममधील 7.73 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून जिओ प्लँटफॉर्ममध्ये आतापर्यंत 1,52,056 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
याचा सध्या इंटरनेट वापरत असलेल्या 50 कोटींहून अधिक लोकांना फायदा मिळणार आहे. जिओ प्लँटफॉर्म आणि गुगलमध्ये आणखी एक कमर्शिअल करार झाला असून, त्यानुसार किफायतशीर अशा “एंट्री लेव्हल” स्मार्टफोनची निर्मिती करण्यात येणार असून ज्यामध्ये एन्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम आणि प्ले स्टोअरचा समावेश असेल. लाखो भारतीयांना किफायतशीर स्मार्टफोन देण्यासाठी एकत्रितपणे उत्सुक आहोत. या एकत्रित प्रयत्नांमुळे नवीन संधी खुल्या होणार असून एक वायब्रन्ट नाविन्यपूर्ण इकोसिस्टीम तयार होईल. ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा गती मिळणार आहे.
मुकेश अंबानी म्हणाले, गुगलने लाखो भारतीयांना महत्वाची माहिती उपलब्ध करून दिली आहे आणि जिओने ती अत्यंत जलदगतीने पोचविली आहे. आम्ही गुगलचे स्वागत करतो आणि आमच्या भागीदारीमुळे लाखो भारतीयांना याचा लाभ पोचविण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे नवीन डिजिटल अर्थव्यवस्थेला बळ मिळणार असून भारताच्या आर्थिक गतीला अधिक ताकद मिळणार आहे. एकत्रितपणे नवीन डिजिटल इंडियाला घडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावू अशी आशा करतो.”