माढा : माढा शहरातही कोरोनाने हळूहळू फैलाव सुरू झाला आहे. काल रविवारी बाधित पोलिसांच्या संपर्कात आलेल्या पोलीस कर्मचा-यासह 39 जणांची टेस्ट करण्यात आली. यामध्ये संपर्कातील 31 माढा पोलीस कर्मचाऱ्यांच्या रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे . त्याचबरोबर संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या संपर्कातील इतर सहा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
शहरातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या एका कोरोना योद्ध्याचाच रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. माढा शहरातील कोरोना रूग्णसंख्या ही चारवर पोहोचली असून पाॅझीटीव्ह आलेल्या कर्मचाऱ्याच्या घरातील लोकांना होमक्वारंन्टाईन केले असून त्यांची ही तपासणी केली जाणार आहे.
दरम्यान संबंधित कर्मचारी राहत असलेल्या सन्मती नगरमधील त्याचे घराच्या परिसराचा 100 मीटर परिसर माढा नगरपंचायतीने प्रतिबंधित केला आहे. याप्रसंगी मुख्याधिकारी चरण कोल्हे, स्वच्छता समन्वयक शिवाजी सांगळे, बांधकाम समन्वयक विशाल बेडगे, विपुल पुजारी, कोतवाल किशोर ढावरे, किरण पवार, संतोष क्षीरसागर, सचिन साठे, प्रभाकर पेठे, गणेश टिंगरे, निलेश देवकुळे, श्याम देवकुळे आदी परिश्रम घेत आहेत.