सोलापूर : हिंदु धर्मातील पविञ महिना समजला जाणा-या श्रावण महिन्यास प्रारंभ झाला आहे. सोलापूर शहरात श्रावण महिना अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात येत असतो. यंदा कोरोना परिस्थितीमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सोलापुरातील श्री सिद्धेश्वर महाराज, श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन, श्री रेवणसिद्धेश्वर, मार्कंडेय यासारखी मंदिरे जुलै महिन्यात बंद असणार आहेत. भाविकांनी मंदिरात न येता घरी बसूनच भक्ती करावी, असे आवाहन सर्वच मंदिर समितीकडून करण्यात येत आहे.
दरवर्षी सोलापुरात श्री सिद्धेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्री सिद्धेश्वर मंदिरातील योगसमाधीस फुलांनी आकर्षक सजावट करण्यात येत असते. प्रत्येक श्रावणी सोमवारी मंदिरात दर्शनासाठी शहरासह ग्रामीण भागातील भाविकांची प्रचंड गर्दी असते.
श्रावण महिन्यात श्री सिध्देश्वर मंदिरात रोज प्रसाद वाटप, प्रवचन व भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. तिसर्या व चौथ्या सोमवारी विशेष कार्यक्रमही घेण्यात येत असतात. ग्रामीण भागातून विविध गावांतील पालख्यांसोबत भक्तगण पायी चालत श्री सिद्धेश्वर मंदिरात येत असतात. यात सुवासिनी डोक्यावर कुंभ घेऊन सहभागी होत असतात. माञ, यंदा कोरोना परिस्थितीमुळे राज्य शासनाने 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन निश्चित केला आहे. याशिवाय जिल्हा प्रशासनाने 26 जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे यंदा भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले होणार नाहीत, हे स्पष्ट होत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री सिद्धेश्वर मंदिरात श्रावणमासानिमित्त धार्मिक कार्यक्रम करण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे पुजारी शिवशंकर हब्बू यांनी दिली. कोरोना परिस्थितीमुळे भाविकांना मंदिर बंद करण्यात आले आहे. मात्र, सालाबादाप्रमाणे मंदिरात पुजारी मंडळीच्या वतीने भक्तीचा जागर करण्यात येईल. यानिमित्ताने पहाटे मंदिराच्या श्री गाभार्यात व योगसमाधीसमोर पहाटे काकड आरती, साडेआठ वाजता रुद्राभिषेक, महाआरती व पुन्हा रात्री सात वाजता रुद्राभिषेक व महाआरती आदी कार्यक्रम होणार आहे.
श्री सिद्धेश्वर मंदिराप्रमाणेच बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर, विजापूर रोडवरील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर, कन्ना चौक परिसरातील जुने सिद्धेश्वर महाराज मंदिर व पंचकट्टा नजिकच्या श्री मार्कंडेय मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असतात. मात्र कोरोना परिस्थितीमुळे ही सर्व मंदिरे यंदा भक्तांसाठी बंद असणार आहेत. कोरोना परिस्थितीमुळे भाविकही यंदा मंदिरात न जाता घरी बसूनच उपवास व भक्तीचा जागर करीत श्रावण महिना साजरा करण्यास पसंती देत आहेत.
* भक्तांनी लाईव्ह दर्शन घ्यावे : धर्मराज काडादी
कोरोना परिस्थितीमुळे प्रशासनाच्या आवाहनानुसार भक्तांसाठी गेल्या काही महिन्यांपासून श्री सिद्धेश्वर महाराज यांचे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर समितीच्या वतीने रोज मंदिरात पूजा-अर्चा होत असते. श्रावणी महिन्यातही विधिवत पूजा-अर्चा पंचकमिटीच्या वतीने करण्यात येईल. मात्र यंदा कोरोना परिस्थितीमुळे भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार नाही. जिल्हा प्रशासनासोबत याबाबत चर्चा सुरू असून त्यांच्या आदेशानुसार निर्णय घेण्यात येईल. भक्तांनी मंदिर समितीच्या वतीने फेसबुकवर दाखविण्यात येणार्या लाईव्ह दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सिद्धेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केले आहे.