लखनौ : कोरोना वैश्विक महामारीवर मात करण्यासाठी देशातील शास्त्रज्ञ प्रतिबंधक लसीचा शोध लावत आहेत, तर जगभरातील काही संस्थाच्या या लसीच्या चाचण्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. पण याच दरम्यान अजब वक्तव्य समाजवादी पार्टीचे खासदार शफीकुर रहमान यांनी केले आहे. कोरोना हा आजार नसून अल्लाहने आपल्या क्रुकर्माची दिलेली शिक्षा असल्याचे अजब तर्कट मांडले आहे. असे अजब विधान करणा-यांची संख्या वाढतच आहे.
कोरोनाची लस लवकरात लवकर मिळावी यासाठी शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत करत आहेत. यातच खासदार शफीकूर रहमान यांनी कोरोना हा आजार नसून आपल्या क्रुरकर्माची अल्लाहनं दिलेली शिक्षा आहे, असे अजब व्यक्तव्य केले आहे. एवढेच नाही तर नमाज पठण करून कोरोनापासून वाचू शकतात, असेही शफीकूर रहमान म्हणाले.
बकरी ईदच्या निमित्ताने मश्जीद खुले करण्याबाबत शफीकूर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हे धक्कादायक विधान केले. यावेळी शफीकूर यांनी, बकरी ईदच्या निमित्ताने जनावरांची बाजारपेठ उघडण्याची मागणी केली आहे, जेणेकरून मुस्लिम समाजातील लोक बलिदानासाठी जनावरे खरेदी करु शकतील. एवढेच नाही तर मश्जीद उघडून तेथे लोकं कोरोनाचा नाश करण्यासाठी प्रार्थना करतील, असेही ते त्यावेळी म्हणाले.
यावेळी खासदारांनी, “मश्जीदीमध्ये केवळ 5 लोकांनी नमाज पठण करून काही होणार नाही. सर्व मुसलमानांनी नमाज पठण केले तरच हा देश वाचू शकतो. ईदच्या दिवशी आम्ही अल्लाहची माफी मागू, तो आपले सर्व गुन्हे माफ करेल आणि मला आशा आहे की आपण लवकरच या सगळ्यातून बाहेर पडू”. दुसरीकडे सरकारच्या वतीने बकरी ईदसाठी नियमावली अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही आहे. मात्र केवळ 5 लोकांना मशीदीत जाण्याची मुभा असणार आहे. इतरांना घरून नमाज पठण करण्यास सांगण्यात येणार आहे.