नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सैन्यात गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान हुतात्मा झाले होते. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये विविध पातळ्यांवर चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. तणाव कमी करण्यासाठी चर्चा करीत असतानाच चीनने सीमेवर तब्बल ४० हजार सैन्य तैनात केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. चर्चेचं ढोंग करीत ४० हजार सैनिकांची फौज तैनात केल्याने भारताला चीनचा धोका वाढला आहे.
सामोपचाराने चर्चेद्वारे प्रश्न सोडवितानाही चीनचे शेपूट वाकडेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पुढील काळात भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सीमेवरून सैन्य कपात करावी म्हणून भारत आणि चीनमध्ये लष्करी आणि राजनैतिक अशा दोन्ही पातळीवर चर्चा सुरू आहे. त्यावेळी चीनने त्यास मान्यता दिली. त्यानंतर चीन सैन्य माघारी घेत असल्याचे वृत्त येत होते.
मात्र, चीनने प्रत्यक्षात सैन्य माघारी तर घेतले नाहीच याउलट 40 हजार सैन्य सीमेवर तैनात केले आहे. त्यांनी संरक्षण यंत्रणा, सशस्त्र सैनिकांच्या वाहतुकीची साधने आणि लांब पल्ल्याच्या तोफा तैनात करण्यास सुरुवात केली आहे.
चीनचे सैन्य पूर्व लडाखसह संपूर्ण सीमेवर पसरले आहे. त्यात ४० हजार सैनिकांची भर करण्यात आली आहे. हवाई संरक्षण योजना, सशस्त्र सैनिकांच्या वाहतुकीची साधनांसह तोफदळही मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहे. सीमेवर आणि त्यांना कव्हर देण्यासाठी त्यामागेही सैन्य तैनात करण्यात आल्याचे एएनआयच्या वृत्तात म्हटले आहे.
पिंगर पाच क्षेत्रात देखरेख चौकी स्थापन करावयाची असल्याने तेथून सैन्य माघारी घेण्यास चीनने नकार दिला होता. चीनने हॉट स्प्रिंग आणि गोग्रा भाग ताब्यात घेतला आहे. तेथून माघार घेतल्यास भारतीय फौजा तो भू प्रदेश हस्तगत करतील, असे सांगत तेथून काढता पाय घेण्यास अनिच्छा व्यक्त करीत असल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितल्याचे या बातमीत म्हटले आहे.
देशाचे राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे मंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत सैन्य मागे घेण्यास चीनने मान्यता दिली होती. त्यावेळी भारताने दोन्ही बाजूने सैन्य माघारी घेणे हाच तणाव निवळण्याचा एकमेव मार्ग असल्याचे स्पष्ट केले होते. चीनने नेहमीप्रमाणे हा शब्द फिरवल्याचे वास्तव समोर येत आहे.
मागील आठवड्यात भारत आणि चीनमध्ये कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतरही चीनच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनच्या कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांप्रमाणेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्येही चर्चा झाली होती. सुरवातीला माघारीची तयारी दर्शविणाऱ्या चीनच्या भूमिकेत आता मात्र बदल झाल्याचे दिसून येत आहे. चीनने फिंगर- ५ येथून माघार घ्यायला नकार दिला आहे. गोग्रा परिसरातही चीनने नव्याने बांधकाम केले आहे. माघार घेतली तर हा भाग भारताच्या ताब्यात जाईल, अशी चिंता चीनला सतावते आहे.