नवी दिल्ली : राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये राज्यसभा खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी साता-याचे उदयनराजे भोसले यांनी शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी‘ अशी घोषणा दिली. यावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. शपथ घेताना केलेल्या या गोष्टीमुळे व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त करत उदयनराजेंना समज दिली.
यात भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच खासदारकीची शपथ घेतली. इंग्रजीतून घेतलेल्या शपथेनंतर घोषणा दिल्याने उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना उदयनराजे यांना समज द्यावी लागली
अशी इंग्रजी भाषेत दमदार आवाजात शपथ घेण्यास उदयनराजेंनी सुरुवात केली.
‘तुम्ही सदनात नवीन आहात, त्यामुळे सांगतो की हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल. सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या’ अशा शब्दात व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली.
भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी आणि भाजपच्या भागवत कराड या महाराष्ट्रातील सहा खासदारांनी शपथ घेतली. आठवले आणि उदयनराजेंनी इंग्रजी, शरद पवारांनी हिंदी, तर कराड, सातव, चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतली.
सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे मोजक्याच सदस्यांना शपथ देण्यात आली. दयनराजेंनी शपथ घेताना दिलेल्या घोषणेवरून सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना यापुढे दक्षता घ्या, असा सल्ला दिला.
उदयनराजे भोसले यांनी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपचा झेंडा हाती धरला होता. त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक लागली, परंतु पक्ष बदलणाऱ्या उदयनराजेंना मतदारांनी नाकारलं आणि राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांना संसदेत पाठवलं. उदयनराजे भोसलेंचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजपने त्यांना वरच्या सभागृहात पाठवण्याचा निर्णय घेतला.